Thursday, June 25, 2026
Home Blog Page 4

दर्जेदार साहित्यिक व सांस्कृतिक चळवळींना राजघराण्याचा पाठिंबा कायम; युवराज अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांची ग्वाही

0
दर्जेदार साहित्यिक व सांस्कृतिक चळवळींना राजघराण्याचा पाठिंबा कायम; युवराज अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांची ग्वाही

फलटण/पुणे | प्रतिनिधी : समाजाच्या वैचारिक जडणघडणीसाठी साहित्य, संस्कृती आणि बौद्धिक विचारांना चालना देणारे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असून अशा दर्जेदार साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना फलटणच्या नाईक निंबाळकर राजघराण्याचे भविष्यातही सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही फलटणचे युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

पुण्यातील सावरकर अध्यापन केंद्र येथे आयोजित करण्यात आलेल्या तरुण लेखक रविराज यांच्या ‘अर्जुनाचा गांडीव शोध’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमास ज्येष्ठ अभिनेते तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

या प्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी, आध्यात्मिक मार्गदर्शक प्रमोद पानसे, विद्या वैभव प्रकाशनचे प्रमुख बकुळ पराडकर आणि प्राचार्य रवींद्र येवले यांची विशेष उपस्थिती लाभली होती.

लेखक रविराज यांनी आयटी क्षेत्रातील नोकरीचा त्याग करून पूर्णवेळ लेखन क्षेत्राची निवड केली आहे. ‘अर्जुनाचा गांडीव शोध’ हे त्यांचे चौथे पुस्तक असून साहित्य क्षेत्रातील त्यांच्या धाडसी आणि प्रेरणादायी प्रवासाचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.

कार्यक्रमात प्राचार्य रवींद्र येवले यांनी केलेल्या अभ्यासपूर्ण आणि प्रभावी भाषणाने उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या विचारांची दखल घेत योगेश सोमण यांनी समाजाला अशा प्रेरणादायी शिक्षकांची आज नितांत आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.

या सोहळ्याचे नियोजन अनुबंध कला मंडळाचे अध्यक्ष बकुळ पराडकर यांनी केले होते. कार्यक्रमाच्या समारोपावेळी उपस्थित मान्यवरांना फलटणचे राजे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्यावर आधारित ‘अजिंक्य राजा’ हे पुस्तक भेट देण्यात आले.

यावेळी ॲड. विजय नेवसे, विजय जाधव, विष्णुपंत शिंदे, अरुण भोईटे यांच्यासह साहित्यप्रेमी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. साहित्य, संस्कृती आणि वैचारिक परंपरेचा गौरव करणारा हा सोहळा उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला.

आमदार सचिन कांबळे पाटील यांच्या नावाचा गैरवापर; अज्ञात व्यक्तीविरोधात कारवाईची मागणी

0
आमदार सचिन कांबळे पाटील यांच्या नावाचा गैरवापर; अज्ञात व्यक्तीविरोधात कारवाईची मागणी

आमदार सचिन कांबळे पाटील यांच्या नावाचा गैरवापर; अज्ञात व्यक्तीविरोधात कारवाईची मागणी

फलटण | प्रतिनिधी :- फलटण–कोरेगाव मतदारसंघाचे आमदार सचिन कांबळे पाटील यांच्या नावाचा गैरवापर करून नागरिकांना फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) शहराध्यक्ष राहुल अशोक निंबाळकर यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून एक अज्ञात व्यक्ती स्वतःला “आमदारांचा पुतण्या” असल्याचे भासवत फलटण तालुक्यातील विविध नागरिकांना फोन करत आहे. संबंधित व्यक्ती आमदार सचिन कांबळे पाटील यांच्या नावाचा वापर करून नागरिकांशी संवाद साधत असल्याने त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

राहुल निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने अनेक प्रतिष्ठित नागरिक तसेच महिलांनाही फोन करून अर्वाच्य भाषेचा वापर केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. काही महिलांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करत तक्रारी नोंदवल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे समाजात संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, अज्ञात व्यक्तीचे हे कृत्य केवळ नागरिकांना त्रासदायक नसून आमदार सचिन कांबळे पाटील यांची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न आहे. तसेच या प्रकारामागे एखादी व्यक्ती किंवा संघटित गट कार्यरत आहे का, याचीही सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याप्रकरणी संबंधित मोबाईल क्रमांक व कॉल रेकॉर्डच्या आधारे तपास करून आरोपीचा शोध घ्यावा आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राहुल निंबाळकर यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.

दरम्यान, फलटण शहर पोलीस ठाण्याने तक्रार स्वीकारली असून या प्रकरणी पुढील चौकशी व आवश्यक कार्यवाही सुरू होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यास फलटणच्या नगरसेवकांची उत्स्फूर्त उपस्थिती

0
शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यास फलटणच्या नगरसेवकांची उत्स्फूर्त उपस्थिती

शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यास फलटणच्या नगरसेवकांची उत्स्फूर्त उपस्थिती

मुंबई | प्रतिनिधी

शिवसेनेच्या हिरक महोत्सवी (६० व्या) वर्धापन दिनानिमित्त मुंबई येथील गोरेगाव परिसरातील नेस्को सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य सोहळ्यास फलटण येथील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शविली.

या ऐतिहासिक कार्यक्रमास फलटण नगर परिषदेचे नगरसेवक विकास वसंतराव काकडे (सर), विशाल तेली, किशोर तारळकर, मुधोजी हायस्कूलचे माजी प्राचार्य सुधीर अहिवळे सर तसेच सिकंदर डांगे यांनी उपस्थित राहून शिवसेनेच्या ६० वर्षांच्या राजकीय, सामाजिक आणि जनहितकारी कार्याचा गौरव केला.

या वर्धापन दिन सोहळ्यात राज्यभरातून आलेल्या शिवसैनिकांचा मोठा जनसागर पाहायला मिळाला. पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला. तसेच महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

फलटणमधील मान्यवरांनी या सोहळ्यात सहभाग घेत पक्षाच्या विचारांप्रती आपली निष्ठा व्यक्त केली. कार्यक्रमात विविध सांस्कृतिक सादरीकरणांसह पक्षाच्या इतिहासावर आधारित विशेष  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कार्यकर्त्यांमुळे नेस्को सेंटर परिसर शिवसेनामय झाला होता.

शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित हा सोहळा उत्साह, जल्लोष आणि पक्षनिष्ठेचे दर्शन घडविणारा ठरला.

भक्त निवास परिसरातील सार्वजनिक विहिरीला संरक्षण; लोखंडी जाळी बसवून स्वच्छता मोहीम पूर्ण

0
भक्त निवास परिसरातील सार्वजनिक विहिरीला संरक्षण; लोखंडी जाळी बसवून स्वच्छता मोहीम पूर्ण

भक्त निवास परिसरातील सार्वजनिक विहिरीला संरक्षण; लोखंडी जाळी बसवून स्वच्छता मोहीम पूर्ण

अकलूज | प्रतिनिधी : अकलूज नगर परिषदेच्या  प्रभाग क्रमांक २ मधील नागरिकांच्या आरोग्याचा व सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन करण्यात आलेल्या मागणीची दखल घेत अकलूज नगरपरिषदेच्या वतीने भक्त निवासच्या पाठीमागे असलेल्या सार्वजनिक विहिरीवर लोखंडी जाळी बसविण्याचे तसेच परिसरातील स्वच्छतेचे काम पूर्ण करण्यात आले आहे. उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका सौ. प्रियंका लखन गायकवाड व नगरसेवक सचिन रामचंद्र देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे ही कामे मार्गी लागली.

सदर विहिरीचे पाणी परिसरातील अनेक नागरिक पिण्यासाठी तसेच दैनंदिन वापरासाठी घेतात. मात्र विहिरीच्या शेजारी असलेल्या झाडांमधून मोठ्या प्रमाणात पाला-पाचोळा विहिरीत पडत होता. याशिवाय काही समाजकंटकांकडून परिसरात कचरा टाकणे, जुने कपडे फेकणे तसेच इतर घाण टाकण्याचे प्रकार घडत असल्याने विहिरीचे पाणी दूषित होण्याचा धोका निर्माण झाला होता. याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर नगरपरिषदेकडे निवेदन देण्यात आले होते.

या निवेदनाची दखल घेत अकलूज नगरपरिषदेने तातडीने कार्यवाही करत विहिरीवर लोखंडी जाळी बसविली. तसेच परिसरातील कचरा हटवून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. झाडांच्या आवश्यक फांद्यांची छाटणी करून परिसर अधिक सुरक्षित व स्वच्छ करण्यात आला.

या कामामुळे विहिरीचे पाणी दूषित होण्याचा धोका कमी झाला असून परिसरातील नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तसेच विहिरीमध्ये कचरा टाकण्याचे प्रकारही आळा बसण्यास मदत होणार आहे.

नगरसेविका सौ. प्रियंका लखन गायकवाड यांनी सांगितले की, नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे ही स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी आहे. नगरपरिषदेने तातडीने कार्यवाही करून जाळी बसविणे व स्वच्छतेची कामे पूर्ण केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

या उपक्रमामुळे प्रभाग क्रमांक २ मधील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून नगरपरिषदेच्या या तत्पर कार्यवाहीचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

प्रभाग क्र. १० मधील वादळग्रस्त नागरिकांना मदत मिळवून देण्यासाठी नगरसेविका मनिषा तिकोटे यांची पुढाकार

0
प्रभाग क्र. १० मधील वादळग्रस्त नागरिकांना मदत मिळवून देण्यासाठी नगरसेविका मनिषा तिकोटे यांची पुढाकार

प्रभाग क्र. १० मधील वादळग्रस्त नागरिकांना मदत मिळवून देण्यासाठी नगरसेविका मनिषा तिकोटे यांची पुढाकार

अकलूज | प्रतिनिधी

अकलूज नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष शिवतेसिंह मोहिते-पाटील व नगराध्यक्षा रेश्मा अडगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक १० मधील वादळ व जोरदार वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या घरांच्या पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करून संबंधित नागरिकांना शासनाकडून मदत मिळावी यासाठी नगरसेविका मनिषा ताई मोहन तिकोटे यांनी विशेष पुढाकार घेतला.

प्रभागातील नुकसानग्रस्त नागरिकांच्या घरांचे पंचनामे, जबाब व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तलाठी कार्यालय तसेच नगर परिषद प्रशासनाशी समन्वय साधण्यात आला. नगरसेविका मनिषा तिकोटे यांनी स्वतः उपस्थित राहून तलाठी व नगर परिषद अधिकाऱ्यांकडून सर्व आवश्यक कागदपत्रे पूर्ण करून घेतली.

त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी ही सर्व कागदपत्रे अकलूजचे तलाठी शिंदे साहेब यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी मोहन तिकोटे, लखन गायकवाड तसेच प्रभाग क्रमांक १० मधील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाकडून आर्थिक मदत व आवश्यक सवलती मिळाव्यात, यासाठी करण्यात आलेल्या या प्रयत्नांमुळे प्रभागातील नागरिकांनी नगरसेविका मनिषा ताई मोहन तिकोटे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. नागरिकांच्या अडचणीच्या काळात तत्परतेने मदतीसाठी धावून जाणाऱ्या लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

गोविंद मिल्कचे ६५० दूध संकलन कर्मचाऱ्यांसाठी विशेष उजळणी शिबिर; गुणवत्ता व स्वच्छतेवर भर

0
गोविंद मिल्कचे ६५० दूध संकलन कर्मचाऱ्यांसाठी विशेष उजळणी शिबिर; गुणवत्ता व स्वच्छतेवर भर

गोविंद मिल्कचे ६५० दूध संकलन कर्मचाऱ्यांसाठी विशेष उजळणी शिबिर; गुणवत्ता व स्वच्छतेवर भर

फलटण | प्रतिनिधी : दूध संकलन प्रक्रियेत अधिक गुणवत्ता, स्वच्छता आणि पारदर्शकता निर्माण करण्याच्या उद्देशाने गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स, फलटण यांच्या वतीने विशेष उजळणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. कोळकी (ता. फलटण) येथील अनंत मंगल कार्यालयात पार पडलेल्या या शिबिरात गोविंदच्या सर्व दूध बल्क कुलर चालक, सेंटर चालक तसेच संबंधित कर्मचारी अशा सुमारे ६५० जणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे १२ जून रोजी झालेल्या बैठकीनंतर राज्यभर दूध संकलन प्रक्रियेत गुणवत्ता सुधारणा आणि अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन यावर भर देण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर गोविंद मिल्कने हे विशेष प्रशिक्षण व उजळणी शिबिर आयोजित केले.

या उपक्रमासाठी गोविंद मिल्कचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), संचालिका श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी धर्मेंद्र भल्ला यांनी विशेष पुढाकार घेतला.

शिबिरात दूध संकलन विभाग प्रमुख डॉ. गणेश सपकळ, बापूसाहेब हिप्परकर आणि ज्ञानेश्वर शिंदे यांनी उपस्थितांना दूध संकलनातील स्वच्छतेचे निकष, गुणवत्ता नियंत्रण, अन्न सुरक्षा नियम तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी दूध संकलन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

गेल्या तीन दशकांपासून गोविंद मिल्क सातत्याने स्वच्छ, ताजे आणि उच्च दर्जाचे दूध संकलन करत असून आज ३५ हजारांहून अधिक दूध उत्पादक शेतकरी या संस्थेशी जोडले गेले आहेत. पारदर्शक व्यवहार, विश्वासार्ह यंत्रणा आणि शेतकरी हिताला प्राधान्य देणाऱ्या धोरणांमुळे गोविंदने दुग्ध व्यवसाय क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

शेतकऱ्यांचा दुग्ध व्यवसाय अधिक आधुनिक, किफायतशीर आणि तंत्रज्ञानाधिष्ठित व्हावा यासाठी गोविंदच्या दुग्ध व्यवसाय विकास प्रशिक्षण विभागामार्फत गोठे व बल्क कुलर केंद्रांवर नियमित प्रशिक्षण दिले जाते. डॉ. शांताराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा विभाग शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक दुग्ध व्यवस्थापनाचे तंत्र पोहोचवत आहे.

गोविंद डेअरीमध्ये संकलित होणाऱ्या उच्च दर्जाच्या कच्च्या दुधाच्या बळावर पिशवीबंद दूध आणि विविध दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीतही संस्थेने राज्यासह देशभरात नावलौकिक मिळविला आहे. या यशामागे चेअरमन संजीवराजे नाईक निंबाळकर, संचालिका शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी धर्मेंद्र भल्ला तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे मानले जाते.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नियमांचे पालन करून गुणवत्तापूर्ण दूध संकलनाची प्रक्रिया गोविंदमध्ये आधीपासूनच राबविली जात असली तरी या उजळणी शिबिरामुळे गुणवत्ता आणि स्वच्छतेच्या मानकांमध्ये आणखी सुधारणा होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

वसंतराव देशमुख यांना अकलूजमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचा ठाम पाठिंबा; नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क

0
वसंतराव देशमुख यांना अकलूजमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचा ठाम पाठिंबा; नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क

वसंतराव देशमुख यांना अकलूजमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचा ठाम पाठिंबा; नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क

अकलूज | प्रतिनिधी. :- सोलापूर विधानपरिषद द्विवार्षिक निवडणूक – २०२६ च्या पार्श्वभूमीवर अकलूज येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात मतदान प्रक्रिया उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अधिकृत उमेदवार वसंतराव दौलतराव देशमुख यांना पाठिंबा दर्शवत पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

मतदानासाठी अकलूज नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील, नगरसेवक सयाजीराजे मोहिते-पाटील, क्रांतिसिंह माने-पाटील, नगराध्यक्षा रेश्माताई अडगळे यांच्यासह नगरपरिषदेतील सर्व नगरसेवक उपस्थित होते. सर्वांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विजयासाठी निर्धार व्यक्त केला.

यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मतदान केंद्र परिसरात शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांमध्ये निवडणुकीबाबत उत्सुकता असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वसंतराव देशमुख यांच्या उमेदवारीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न प्रभावीपणे विधानपरिषदेत मांडले जातील, असा विश्वास व्यक्त केला. मतदानानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी उमेदवाराच्या विजयासाठी शुभेच्छा देत आगामी निकालाबाबत आशावाद व्यक्त केला.

फलटण मतदान केंद्रावर शंभर टक्के मतदान; सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीत सर्व ३१ मतदारांनी बजावला हक्क

0
फलटण मतदान केंद्रावर शंभर टक्के मतदान; सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीत सर्व ३१ मतदारांनी बजावला हक्क

फलटण प्रतिनिधी :- सातारा-सांगली स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी फलटण येथील मतदान केंद्रावर गुरुवारी शांततापूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. केंद्रावरील नोंदणीकृत सर्व ३१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने येथे शंभर टक्के मतदानाची नोंद झाली.

फलटण तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर सकाळी ८ वाजता मतदानास सुरुवात झाली. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शिवसेनेचे १० नगरसेवक मतदार अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या समवेत मतदान केंद्रावर दाखल झाले. त्यांनी नियमानुसार मतदान करून आपला लोकशाही हक्क बजावला.

त्यानंतर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे २१ मतदार नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली मतदान केंद्रावर आले. त्यांनीही मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवत आपले मतदान केले.

फलटण मतदान केंद्रावर एकूण ३१ मतदारांची नोंद होती. विशेष म्हणजे सर्वच मतदारांनी मतदान केल्याने केंद्रावर शंभर टक्के मतदानाची नोंद झाली. संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडल्याचे प्रशासनाने सांगितले.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली. यानंतर तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी फलटण केंद्रावर शंभर टक्के मतदान झाल्याची अधिकृत माहिती दिली.

बनावट सही-शिक्क्याच्या आधारे बांधकाम परवाना? बारामतीतील डॉक्टर प्रकरणात मुख्याधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी

0
बनावट सही-शिक्क्याच्या आधारे बांधकाम परवाना? बारामतीतील डॉक्टर प्रकरणात मुख्याधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी

बारामती | प्रतिनिधी :- बारामती शहरातील एका डॉक्टरने भूमी अभिलेख विभागाचा कथित बनावट शिक्का आणि सही वापरून बांधकाम परवाना मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले असतानाच बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी संबंधित बांधकामाला सुधारित परवानगी दिल्याची बाब उघड झाली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मोहसीन पठाण यांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बारामती येथील डॉ. निखिल दिलीप लोंढे यांनी रुग्णालयाच्या बांधकामासाठी २ सप्टेंबर २०२२ रोजी बारामती नगरपरिषदेकडून बांधकाम परवाना प्राप्त केला होता. मात्र, परवान्यासाठी सादर करण्यात आलेल्या नकाशावर भूमी अभिलेख कार्यालयाचा बनावट शिक्का वापरण्यात आल्याचे नंतरच्या तपासात उघड झाले. यामुळे शासनासह बारामती नगरपरिषदेची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या संदर्भात मोहसीन पठाण यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार दाखल करून संबंधित डॉक्टरविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची आणि बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली होती. तक्रारीची दखल घेत बावनकुळे यांनी जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षकांना आवश्यक कार्यवाहीचे आदेश दिले होते.

यानंतर भूमी अभिलेख विभागाने तपासणी करून नगरपरिषदेला लेखी पत्राद्वारे संबंधित प्रकरणात फसवणुकीचा प्रकार झाल्याचे कळवले. तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याबाबतही सूचना करण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र, अद्याप नगरपरिषदेकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप आहे.

विशेष म्हणजे, बनावट नकाशा सादर केल्याचे निष्पन्न झाल्यानंतरही मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी डॉ. लोंढे यांना सुधारित बांधकाम परवानगी दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही परवानगी कोणत्या आधारावर देण्यात आली, असा सवाल मोहसीन पठाण यांनी उपस्थित केला आहे.

या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही तक्रार दाखल केली असून, मुख्याधिकारी पंकज भुसे यांचे निलंबन करून संबंधित डॉक्टर व इतर जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे बारामतीतील या प्रकरणाकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून पुढील प्रशासकीय कारवाईकडे उत्सुकता वाढली आहे.

गुटखा, पानमसाला आणि तंबाखूचा साठा जप्त; संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

0
गुटखा, पानमसाला आणि तंबाखूचा साठा जप्त; संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

फलटण | प्रतिनिधी :-  फलटण शहरातील कोळकी परिसरात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत एकूण ३७ हजार ९६५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून संबंधित संशयिताविरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सातारा अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी रुपाली खापणे यांना कोळकी येथील मोनिता संस्कृती अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक २ मध्ये प्रतिबंधित गुटख्याचा साठा करण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे १७ जून रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पोलीस कर्मचारी आणि पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत छापा टाकण्यात आला.

या कारवाईदरम्यान विमल पानमसाला, आरएमडी पानमसाला, रजनीगंधा, तुलसी जर्दा तसेच सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या या मालाची एकूण किंमत ३७ हजार ९६५ रुपये इतकी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी रुपाली खापणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किरण शशिकांत दोषी (रा. कोळकी, फलटण) याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय विविध गुटखा उत्पादक कंपन्यांचे मालक आणि भागीदार यांचाही संशयितांमध्ये समावेश करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या उत्पादन, साठवणूक व विक्रीवर बंदी असतानाही छुप्या मार्गाने हा व्यवसाय सुरू असल्याचे या कारवाईतून पुन्हा अधोरेखित झाले आहे. त्यामुळे या अवैध व्यवसायामागील संपूर्ण साखळी उघडकीस आणण्यासाठी आणि संघटित गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी संबंधितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई होणार का, याकडे नागरिकांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास फलटण शहर पोलीस करत आहेत.