
फलटण (प्रतिनिधी) – फलटण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे अर्ज स्वीकारण्याच्या पहिल्या दिवशीची पाटी कोरीच राहिली आहे.
यावर्षी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवली जात आहे. नगरपरिषद कार्यालयात अर्जांची ऑफलाईन विक्री बंद करण्यात आली असून इच्छूक उमेदवारांना राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज भरावे लागणार आहेत.
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुलभता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निखील जाधव यांनी सांगितले. त्यांनी माहिती दिली की, पहिल्या दिवशी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही.
राजकीय पक्षांकडून अद्याप अधिकृत उमेदवारांच्या याद्या जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे इच्छूक उमेदवार पक्षाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. एकदा याद्या जाहीर झाल्या की अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग येईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
निवडणूक आयोगाने अर्ज भरण्यासाठी पुरेसा कालावधी दिला असला तरी शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी उमेदवारांनी वेळेत अर्ज भरावेत, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. तसेच ऑनलाईन प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येऊ नयेत यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याचे सूचित करण्यात आले आहे.
आगामी काही दिवसांत फलटणमधील निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता असून राजकीय हालचालींना वेग येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.








