Tuesday, August 11, 2026
HomeUncategorizedबनावट सही-शिक्क्याच्या आधारे बांधकाम परवाना? बारामतीतील डॉक्टर प्रकरणात मुख्याधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी

बनावट सही-शिक्क्याच्या आधारे बांधकाम परवाना? बारामतीतील डॉक्टर प्रकरणात मुख्याधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी

बारामती | प्रतिनिधी :- बारामती शहरातील एका डॉक्टरने भूमी अभिलेख विभागाचा कथित बनावट शिक्का आणि सही वापरून बांधकाम परवाना मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले असतानाच बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी संबंधित बांधकामाला सुधारित परवानगी दिल्याची बाब उघड झाली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मोहसीन पठाण यांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बारामती येथील डॉ. निखिल दिलीप लोंढे यांनी रुग्णालयाच्या बांधकामासाठी २ सप्टेंबर २०२२ रोजी बारामती नगरपरिषदेकडून बांधकाम परवाना प्राप्त केला होता. मात्र, परवान्यासाठी सादर करण्यात आलेल्या नकाशावर भूमी अभिलेख कार्यालयाचा बनावट शिक्का वापरण्यात आल्याचे नंतरच्या तपासात उघड झाले. यामुळे शासनासह बारामती नगरपरिषदेची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या संदर्भात मोहसीन पठाण यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार दाखल करून संबंधित डॉक्टरविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची आणि बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली होती. तक्रारीची दखल घेत बावनकुळे यांनी जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षकांना आवश्यक कार्यवाहीचे आदेश दिले होते.

यानंतर भूमी अभिलेख विभागाने तपासणी करून नगरपरिषदेला लेखी पत्राद्वारे संबंधित प्रकरणात फसवणुकीचा प्रकार झाल्याचे कळवले. तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याबाबतही सूचना करण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र, अद्याप नगरपरिषदेकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप आहे.

विशेष म्हणजे, बनावट नकाशा सादर केल्याचे निष्पन्न झाल्यानंतरही मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी डॉ. लोंढे यांना सुधारित बांधकाम परवानगी दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही परवानगी कोणत्या आधारावर देण्यात आली, असा सवाल मोहसीन पठाण यांनी उपस्थित केला आहे.

या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही तक्रार दाखल केली असून, मुख्याधिकारी पंकज भुसे यांचे निलंबन करून संबंधित डॉक्टर व इतर जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे बारामतीतील या प्रकरणाकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून पुढील प्रशासकीय कारवाईकडे उत्सुकता वाढली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments