Thursday, June 25, 2026
Home Blog Page 5

आरपीआय नेते नंदकुमार केंगार यांचा प्रशासनावर गंभीर आरोप; २० जूनला अकलूजमध्ये ‘आत्मक्लेश’ आंदोलनाचा इशारा

0
आरपीआय नेते नंदकुमार केंगार यांचा प्रशासनावर गंभीर आरोप; २० जूनला अकलूजमध्ये ‘आत्मक्लेश’ आंदोलनाचा इशारा

आरपीआय नेते नंदकुमार केंगार यांचा प्रशासनावर गंभीर आरोप; २० जूनला अकलूजमध्ये ‘आत्मक्लेश’ आंदोलनाचा इशारा

अकलूज | प्रतिनिधी. अकलूज परिसरात प्रशासनाच्या कथित मनमानी कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे एक प्रकरण समोर आले आहे. अवैध दारूसाठ्याच्या संशयावरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार उर्फ पांडुरंग बयाजी केंगार यांच्या निवासस्थानी टाकण्यात आलेल्या धाडीबाबत त्यांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत.

केंगार यांनी अकलूज पोलिस ठाण्यात दिलेल्या लेखी तक्रारीनुसार, १५ जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास काही शासकीय अधिकारी अवैध दारूसाठ्याची माहिती मिळाल्याचे सांगत त्यांच्या घरी पोहोचले आणि कोणतीही पूर्वकल्पना न देता घराची झडती सुरू केली.

“घरात काहीच सापडले नाही, तरीही अपमान सहन करावा लागला”

या कारवाईदरम्यान घरातील महिलांशी अपमानास्पद वर्तन करण्यात आल्याचा तसेच संपूर्ण कुटुंबाला गुन्हेगारांप्रमाणे वागणूक देत मानसिक त्रास दिल्याचा आरोप केंगार यांनी केला आहे. झडतीदरम्यान कोणताही अवैध दारूसाठा अथवा आक्षेपार्ह साहित्य आढळून न आल्याने ही कारवाई केवळ बदनामीच्या हेतूने करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

केंगार कुटुंब हे मागासवर्गीय समाजात सामाजिक आणि सार्वजनिक कार्यासाठी परिचित असून, या कारवाईमुळे त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याचेही त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

प्रशासनाला विचारले थेट प्रश्न

या संपूर्ण घटनेनंतर केंगार यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत काही मुद्दे उपस्थित केले आहेत.

  • ही कारवाई नेमक्या कोणत्या गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली?
  • कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारांच्या मर्यादेत राहून काम केले का?
  • कोणतीही ठोस खात्री न करता एका सामाजिक कार्यकर्त्याच्या घरावर धाड का टाकण्यात आली?

दोषींवर कारवाईची मागणी

या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी केंगार यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.

२० जूनला ‘आत्मक्लेश’ उपोषण

या घटनेच्या निषेधार्थ आणि न्यायाच्या मागणीसाठी नंदकुमार केंगार यांनी २० जून रोजी अकलूज येथील क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर एकदिवसीय ‘आत्मक्लेश’ उपोषण व आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या घटनेमुळे मागासवर्गीय समाजामध्ये नाराजीची भावना व्यक्त होत असल्याचेही सांगितले जात आहे.

प्रशासनाची भूमिका अद्याप स्पष्ट नाही

दरम्यान, केंगार यांनी केलेल्या आरोपांबाबत संबंधित विभाग अथवा कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाकडे अकलूजसह संपूर्ण परिसराचे लक्ष लागले असून, पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

आले ठरते आरोग्याचा खजिना; पचनापासून वजन नियंत्रणापर्यंत अनेक फायदे

0
आले ठरते आरोग्याचा खजिना; पचनापासून वजन नियंत्रणापर्यंत अनेक फायदे

आले ठरते आरोग्याचा खजिना; पचनापासून वजन नियंत्रणापर्यंत अनेक फायदे

आरोग्य प्रतिनिधी | प्रत्येक घरातील स्वयंपाकघरात नियमितपणे वापरले जाणारे आले हे केवळ मसाल्यापुरते मर्यादित नसून आरोग्यासाठीही अत्यंत लाभदायक मानले जाते. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे पदार्थांची रुची वाढवणारे आले अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, जस्त यांसारख्या आवश्यक पोषक घटकांचा त्यात समावेश असल्याने ते एक प्रभावी नैसर्गिक औषध मानले जाते.

तज्ज्ञांच्या मते, आल्यामध्ये आढळणारे ‘जिंजरॉल’ हे घटक पचनसंस्था मजबूत करण्यास मदत करतात. त्यामुळे गॅस, आम्लपित्त, पोट फुगणे आणि अपचन यांसारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो. तसेच ‘शोगाव’ नावाचा घटक वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो.

सर्दी, खोकला आणि संसर्गजन्य आजारांवरही आल्याचा प्रभावी उपयोग होत असल्याचे मानले जाते. आल्यातील नैसर्गिक घटक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून विषाणू आणि संसर्गाशी लढण्यास मदत करतात.

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठीही आले फायदेशीर ठरू शकते. त्यामध्ये असलेले पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स शरीराचे आरोग्य जपण्यास मदत करतात. याशिवाय आल्याचे सेवन मानसिक तणाव कमी करण्यास, डोळ्यांचे आरोग्य राखण्यास आणि एकूणच शारीरिक तंदुरुस्ती सुधारण्यास सहाय्यक ठरते.

मधुमेह नियंत्रणासाठी आणि वजन कमी करण्यासाठीही आल्याचा उपयोग होऊ शकतो. नियमित सेवनामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते, तसेच चयापचय क्रिया सुधारून वजन नियंत्रणास हातभार लागतो.

आल्याचे सेवन कसे करावे?

  • ताजे आले वापरणे अधिक फायदेशीर मानले जाते.
  • चहा बनवताना आल्याचा वापर करून त्यात मध किंवा लिंबू मिसळू शकता.
  • आले चटणी किंवा लोणच्याच्या स्वरूपातही खाता येते.
  • सॅलडमध्ये आले घालून त्याची चव आणि पौष्टिकता वाढवता येते.
  • सकाळी रिकाम्या पोटी आल्याचा रस घेतल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळू शकते.

what’s app  वरून समभार


सातारा-सांगली विधान परिषद निवडणूक : धैर्यशील कदम यांच्या विजयासाठी शिवसेना पूर्ण ताकदीने मैदानात

0
सातारा-सांगली विधान परिषद निवडणूक : धैर्यशील कदम यांच्या विजयासाठी शिवसेना पूर्ण ताकदीने मैदानात

महायुतीचा धर्म पाळत प्रत्येक मत सुरक्षित ठेवण्यासाठी नियोजनबद्ध मोहीम; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची माहिती

सातारा :- सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांच्या विजयासाठी शिवसेना पूर्ण ताकदीने मैदानात उतरली असून, पक्षाचे एकही मत वाया जाऊ नये यासाठी नियोजनबद्ध मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

मा. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या स्पष्ट सूचनांनुसार शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते निवडणुकीच्या कामात सक्रिय झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर साताऱ्यातील ‘कोयना दौलत’ येथे उमेदवार धैर्यशील कदम यांच्यासमवेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा केली.

महायुतीतील समन्वय अधिक मजबूत करत सातारा-सांगली मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी सर्व घटक पक्ष एकजुटीने कार्यरत असल्याचे देसाई यांनी सांगितले. महायुतीचा धर्म पाळत प्रत्येक मताचे महत्त्व लक्षात घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला जात असून आवश्यक रणनीती आखण्यात येत आहे.

राज्यातील सर्व विधान परिषद जागांवर महायुतीला यश मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. बैठकीस शिवसेना संपर्कप्रमुख शरद कणसे उपस्थित होते.

जि. प प्राथमिक शाळा सासकल येथे प्रवेशोत्सव आनंदात साजरा

0
जि. प प्राथमिक शाळा सासकल येथे प्रवेशोत्सव आनंदात साजरा

जि. प प्राथमिक शाळा सासकल येथे प्रवेशोत्सव आनंदात साजरा

फलटण : सासकल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवीन शैक्षणिक वर्षानिमित्त प्रवेशोत्सव, नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत तसेच पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप सोहळा १५ जून रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शैक्षणिक गुढी उभारून आणि बैलगाडीतून मिरवणूक काढून नव्या विद्यार्थ्यांचे शाळेत जल्लोषात स्वागत करण्यात आले.

बैलगाडीतून विद्यार्थ्यांची मिरवणूक
पहिलीत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची गावातून बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात संस्मरणीय व्हावी यासाठी त्यांच्या पायांचे ठसे उमटवून शाळेत प्रवेश देण्यात आला. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

शालेय साहित्याचे वाटप
स्वरा स्टील फर्निचर उद्योग समूहाचे लहूराजे सावंत यांच्या पुढाकारातून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. याशिवाय शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेश वितरित करण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला ग्रामपंचायत प्रशासक सोनाली मदने, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा दीपाली निलेश चांगण तसेच लहूराजे सावंत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य हणमंत मुळीक, मंगेश मदने, सुधीर सोपान मुळीक, सोपान मुळीक, शंकर मुळीक, मोहन मुळीक, दिनेश मुळीक,उपाध्यक्ष, सदस्य निकिता घोरपडे, मुख्याध्यापक अरुण कांबळे,  संध्याकाळी जगदाळे यांच्यासह गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांसाठी आनंददायी, प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या प्रवेशोत्सवाने शाळा, पालक आणि ग्रामस्थ यांच्यातील स्नेहबंध अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.

निरा उजवा कालवा ४५ दिवस बंद; फलटणमध्ये १८ जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठासाठवण तलावातील पाणीसाठा अपुरा; नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरण्याचे प्रशासनाचे आवाहन

0
निरा उजवा कालवा ४५ दिवस बंद; फलटणमध्ये १८ जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठासाठवण तलावातील पाणीसाठा अपुरा; नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरण्याचे प्रशासनाचे आवाहन

फलटण | प्रतिनिधी :- फलटण शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. धरण क्षेत्रामध्ये अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे फलटण शहराला पाणीपुरवठा करणारा मुख्य स्त्रोत असलेला ‘निरा उजवा कालवा’ दिनांक १२ जून २०२६ पासून बंद करण्यात आला आहे. हा कालवा पुढील सुमारे ४५ दिवस बंद राहणार असल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सद्यस्थितीत फलटण नगरपरिषदेच्या साठवण तलावामध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा संपूर्ण शहराला पुढील ४५ दिवस नियमितपणे पुरेल इतका पुरेसा नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी फलटण नगरपरिषदेने शहरात पाणी कपात लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

नगरपरिषदेने जाहीर केलेल्या नव्या वेळापत्रकानुसार गुरुवार, दिनांक १८ जून २०२६ पासून शहरात ‘एक दिवसाआड’ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी प्रभागनिहाय स्वतंत्र वेळापत्रक तयार करण्यात आले असून नागरिकांनी त्यानुसार नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नगरपरिषदेच्या माहितीनुसार, पेठ सोमवार संपूर्ण भाग, पेठ मंगळवार संपूर्ण भाग तसेच पेठ महतपुरा व जिंती नाका परिसरात १८, २०, २२, २४, २६, २८ आणि ३० जून २०२६ या दिवशी पाणीपुरवठा केला जाणार आहे.

तर फलटण शहरातील उर्वरित सर्व भागांना १९, २१, २३, २५, २७ आणि २९ जून २०२६ रोजी पाणीपुरवठा करण्यात येईल. परिस्थितीनुसार पुढील महिन्यातही अशाच प्रकारचे वेळापत्रक लागू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

निरा उजवा कालवा बंद राहिल्याने निर्माण झालेली ही परिस्थिती नैसर्गिक कारणांमुळे उद्भवली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी मिळालेल्या दिवशी आवश्यक तेवढ्याच प्रमाणात साठवणूक करावी, नळांना तोट्या बसवून गळती रोखावी आणि कुठल्याही प्रकारे पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी केले आहे.

पुढील दीड महिना उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करून सर्व नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याने नागरिकांनीही सहकार्याची भूमिका घ्यावी, असेही प्रशासनाकडून नमूद करण्यात आले आहे.

DPDC निधी वाटपावर प्रश्नचिन्ह; पारदर्शक धोरणाची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

0
DPDC निधी वाटपावर प्रश्नचिन्ह; पारदर्शक धोरणाची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

DPDC निधी वाटपावर प्रश्नचिन्ह; पारदर्शक धोरणाची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

अकलूज | प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समिती (DPDC) निधी वाटपाच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, या संदर्भात इस्लामपूर ग्रामपंचायतीने उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेत जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राचा संदर्भ देण्यात आला असून, विकासकामांच्या निधी वाटपासाठी कोणतेही स्पष्ट, लिखित आणि सार्वजनिक धोरण अस्तित्वात नसल्याची बाब समोर आली आहे.

या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनाकडे पारदर्शक, न्याय्य आणि उत्तरदायी यंत्रणा उभारण्याची मागणी केली आहे.

जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणून विविध ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना अनेक गंभीर बाबी निदर्शनास आल्याचे खासदार मोहिते-पाटील यांनी सांगितले. विकासकामांसाठी प्रस्ताव सादर केल्यानंतर त्यांना प्रशासकीय किंवा तांत्रिक मान्यता मिळाली आहे की नाही, निविदा प्रक्रिया कोणत्या टप्प्यावर आहे किंवा कार्यादेश देण्यात आला आहे का, याची माहिती संबंधित संस्थांना उपलब्ध होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

त्यांच्या मते, जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर झालेली कामे जिल्हा परिषद किंवा इतर अंमलबजावणी यंत्रणांकडे गेल्यानंतर त्यांचा प्रभावी पाठपुरावा होत नाही. परिणामी अनेक विकासकामे प्रशासकीय मंजुरी, तांत्रिक मान्यता, निविदा प्रक्रिया किंवा प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यावर रखडलेली आहेत. कोणत्या अधिकाऱ्याकडे काम प्रलंबित आहे, विलंबाची कारणे काय आहेत आणि त्याबाबत कोणती कारवाई करण्यात आली आहे, याची माहिती जनतेसमोर येत नसल्याने निधी आणि विकासाच्या संधी वाया जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्र्यांच्या जबाबदारीचाही त्यांनी उल्लेख केला. पालकमंत्र्यांची भूमिका केवळ राजकीय कार्यक्रमांपुरती मर्यादित नसून विकासकामांचे नियोजन, अंमलबजावणी, देखरेख आणि नियमित आढावा घेणे हे त्यांचे मूलभूत कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“जर निधी वाटपासाठी स्पष्ट धोरणच अस्तित्वात नसेल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागत असतील, तर ही बाब प्रशासनासाठी चिंतेची आहे. यावर गांभीर्याने आत्मपरीक्षण होणे आवश्यक आहे,” असा इशाराही त्यांनी दिला.

स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी जनतेसमोर उत्तरदायी असतात. त्यामुळे विकास निधीचे वाटप करताना कोणत्याही गावाला, मतदारसंघाला किंवा संस्थेला दुय्यम वागणूक मिळता कामा नये, असे त्यांनी ठामपणे सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघ, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका आणि गावाला विकास निधीच्या बाबतीत समान व न्याय्य संधी मिळाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

विकासकामांच्या निवडीसाठी स्पष्ट धोरण जाहीर करणे, मंजूर कामांची माहिती सार्वजनिक करणे, अंमलबजावणीसाठी कालमर्यादा निश्चित करणे आणि विनाकारण विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करणे या उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणीही त्यांनी केली.

“विकास निधी हा कोणत्याही पक्षाचा किंवा व्यक्तीचा नसून तो जनतेचा आहे. त्यामुळे त्याचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत समानतेने पोहोचला पाहिजे,” असे सांगत त्यांनी राज्य शासन, जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा प्रशासनाने या याचिकेकडे टीकेच्या नव्हे तर सुधारण्याच्या संधीच्या दृष्टीने पाहावे, असे आवाहन केले.

सोलापूर जिल्ह्यात पारदर्शक, धोरणाधिष्ठित आणि उत्तरदायी जिल्हा नियोजन व्यवस्था उभारणे ही काळाची गरज असल्याचे सांगत खासदार मोहिते-पाटील यांनी विकास निधीवरील प्रत्येक नागरिकाचा समान हक्क अधोरेखित केला.

तेली गल्लीचा पाणीप्रश्न अखेर निकाली; महिनाभरात नवीन पाइपलाइन टाकून नगराध्यक्षांनी पाळला शब्द

0
तेली गल्लीचा पाणीप्रश्न अखेर निकाली; महिनाभरात नवीन पाइपलाइन टाकून नगराध्यक्षांनी पाळला शब्द

फलटण | प्रतिनिधी. :- फलटण शहरातील तेली गल्ली परिसरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला अनियमित पाणीपुरवठ्याचा प्रश्न अखेर कायमस्वरूपी मार्गी लागला आहे. नागरिकांना दिलेला शब्द पाळत नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या पुढाकारातून अवघ्या एका महिन्याच्या कालावधीत नवीन मुख्य जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यात आले असून परिसरातील घरांपर्यंत योग्य दाबाने पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

तेली गल्ली परिसरात अनेक वर्षांपासून अपुरा व कमी दाबाचा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना विशेषतः महिला वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. वारंवार दुरुस्ती आणि तात्पुरत्या उपाययोजना करूनही समस्या कायम राहत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.

ही गंभीर समस्या लक्षात घेऊन नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा यांनी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. नागरिकांच्या अडचणीची दखल घेत नगराध्यक्षांनी जुन्या व गळतीग्रस्त यंत्रणेऐवजी नवीन मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन टाकण्याचे निर्देश दिले.

यानंतर नगरपालिका प्रशासनाने तातडीने कामाला सुरुवात करून युद्धपातळीवर नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण केले. तसेच प्रत्येक घरापर्यंत नळजोडणी देण्याचे कामही यशस्वीरीत्या पार पडले. परिणामी आता परिसरातील नागरिकांना नियमित, स्वच्छ व पुरेशा दाबाने पाणी मिळू लागले आहे.

या कामासाठी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, पाणीपुरवठा सभापती राहुल निंबाळकर, मुख्याधिकारी निखिल जाधव तसेच संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याची माहिती नगरसेविका कु. सिद्धाली शहा यांनी दिली.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सक्षम व विकासाभिमुख नेतृत्वाची साथ लाभल्यास कोणतीही समस्या सोडविणे शक्य होते. भविष्यात प्रभागातील सर्व रस्त्यांच्या दुतर्फा स्वतंत्र पाणीपुरवठा पाइपलाइन उभारण्याचा मानस असून त्यामुळे पाण्यावरील ताण कमी होऊन प्रत्येक नागरिकाला पुरेशा दाबाने पाणी उपलब्ध होईल.”

दरम्यान, अनेक वर्षांपासूनचा जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न सोडवल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, माजी विरोधी पक्षनेते अनुप शहा आणि नगरसेविका कु. सिद्धाली शहा यांचे आभार मानले आहेत. जितेंद्र तेली, दिलीप तेली, रूपाली परदेशी, भगवान परदेशी, सचिन परदेशी, संतोष परदेशी यांच्यासह स्थानिक नागरिकांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीत तणाव; भाजपला शंभूराज देसाईंचा सूचक इशारा

0
सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीत तणाव; भाजपला शंभूराज देसाईंचा सूचक इशारा

कराड | प्रतिनिधी :- सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. भाजपकडून या निवडणुकीत स्वतंत्र शक्तिप्रदर्शनाची भूमिका घेतली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उत्पादन शुल्क व खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपला सूचक इशारा दिला आहे.

कराड येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देसाई म्हणाले की, “महायुतीतील समन्वयाला जर अपेक्षित प्रतिसाद मिळत नसेल, तर आम्हालाही पुढील राजकीय भूमिका ठरवावी लागेल. आमच्या पक्षातील स्थानिक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची भावना जाणून घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल.”

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपकडून नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांची स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येत असल्याची चर्चा आहे. यावर प्रतिक्रिया देताना देसाई म्हणाले की, “आमच्या कोअर कमिटीची बैठक नुकतीच पार पडली असून स्थानिक पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी स्वतंत्र बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीतील निष्कर्ष पक्षश्रेष्ठींना कळविण्यात येतील. त्यानंतर मुंबईत वरिष्ठ पातळीवर पुढील निर्णय घेतले जातील.”

कराड येथे नुकत्याच झालेल्या महायुतीच्या समन्वय बैठकीला शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. याबाबत विचारले असता देसाई म्हणाले, “पालकमंत्री म्हणून मी अनेकदा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. तुम्ही समन्वयासाठी पुढाकार घेत नसाल आणि त्याचवेळी समन्वयाची अपेक्षा करत असाल, तर आम्हालाही आमची भूमिका ठरवावी लागेल.”

महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे संकेत या घडामोडींमधून मिळत असून, आगामी विधान परिषद निवडणुकीत त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

दरम्यान, १३ जून रोजी कराड येथे झालेल्या महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या बैठकीस भाजपचे आमदार जयकुमार गोरे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, अमित कदम, तसेच भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील उपस्थित होते. मात्र शिंदे गटातील मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याने महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा अधिकच रंगली आहे.

मोबाईलचे व्यसन की सुदृढ जीवनशैली? निवडा तुमची वाट!मोबाईलच्या अतिरेकामुळे वाढत आहेत शारीरिक व मानसिक समस्या; व्यायाम आणि शिस्तबद्ध जीवनशैलीची गरज

0
मोबाईलचे व्यसन की सुदृढ जीवनशैली? निवडा तुमची वाट!मोबाईलच्या अतिरेकामुळे वाढत आहेत शारीरिक व मानसिक समस्या; व्यायाम आणि शिस्तबद्ध जीवनशैलीची गरज

शारीरिक व मानसिक समस्या; व्यायाम आणि शिस्तबद्ध जीवनशैलीची गरज

फलटण | प्रतिनिधी. मोबाईल हा आजच्या आधुनिक जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. संवाद साधणे, शिक्षण घेणे, बँकिंग व्यवहार करणे, मनोरंजनाचा आनंद घेणे अशा विविध गरजांसाठी मोबाईलचा वापर अत्यावश्यक ठरला आहे. मात्र, या उपयुक्त साधनाचा अतिरेक आता व्यसनाच्या स्वरूपात समोर येत असून लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच वयोगट त्याच्या विळख्यात अडकताना दिसत आहेत.

अलीकडच्या काळात अनेक घरांमध्ये एक चिंताजनक चित्र पाहायला मिळते. लहान मुलांना शांत ठेवण्यासाठी किंवा जेवण भरवण्यासाठी पालक मोबाईलचा आधार घेतात. परिणामी, अनेक मुले मोबाईलशिवाय जेवण करण्यासही तयार होत नाहीत. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्येही मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून सोशल मीडिया, ऑनलाइन गेम्स आणि विविध डिजिटल माध्यमांमध्ये तरुण पिढी अधिकाधिक गुंतत चालली आहे.

तज्ज्ञांच्या मते, मोबाईलच्या अतिवापरामुळे मानेच्या मणक्यांचे विकार, डोळ्यांचे त्रास, मानसिक तणाव, एकाग्रतेचा अभाव, निद्रानाश आणि नैराश्य यांसारख्या समस्या वाढत आहेत. याशिवाय कुटुंबातील प्रत्यक्ष संवाद कमी होत असून सामाजिक नातेसंबंधांवरही त्याचा परिणाम होत आहे. अनेक तरुणांच्या एक्स-रे तपासणीत त्यांच्या हाडांची स्थिती वयस्कर व्यक्तींप्रमाणे दिसून येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.

सध्या जगभरात मोबाईल वापराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. विकसित देशांमध्ये जवळपास ९७ टक्के लोक मोबाईलचा वापर करतात. त्यामुळे मोबाईलचा योग्य आणि मर्यादित वापर करणे ही काळाची गरज बनली आहे.

मोबाईलच्या वाढत्या व्यसनावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही साध्या पण प्रभावी उपायांचा अवलंब करणे आवश्यक आहे. जेवणाच्या वेळी मोबाईलचा वापर टाळणे, पालकांनी स्वतःच्या मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवणे, तसेच लहान मुलांना किमान पाच वर्षांपर्यंत मोबाईलपासून दूर ठेवणे महत्त्वाचे आहे. यासोबतच नियमित व्यायाम, मैदानी खेळ, धावणे, सायकलिंग किंवा जिममध्ये वर्कआउट यांसारख्या आरोग्यदायी सवयी अंगीकारणे गरजेचे आहे.

आज वाढत्या हृदयविकारामागे बदललेली जीवनशैली, कमी झालेली शारीरिक हालचाल आणि मोबाईलचा अतिरेक ही प्रमुख कारणे मानली जात आहेत. त्यामुळे निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी दैनंदिन सवयींमध्ये सकारात्मक बदल करणे आवश्यक आहे.

मोबाईलचा योग्य व मर्यादित वापर केल्यास अनेक शारीरिक व मानसिक आरोग्य समस्या टाळता येऊ शकतात. पुढील लेखांमध्ये विविध शारीरिक समस्यांवरील सोपे व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे फिजिओथेरपिस्ट डॉ. मोहन पवार यांनी सांगितले.

डॉ. मोहन पवार, फिजिओथेरपिस्ट
मो. ७५५७७११३११

शाळा प्रवेश उत्सव उत्साहात संपन्न; वैशालीताई कांबळे यांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत

0
शाळा प्रवेश उत्सव उत्साहात संपन्न; वैशालीताई कांबळे यांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत

बरड | प्रतिनिधी :- शाळा प्रवेश उत्सवानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बरड येथे नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला बरड जिल्हा परिषद गटाच्या सदस्या मा. सौ. वैशालीताई कांबळे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, शैक्षणिक साहित्य व शुभेच्छा देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी बरड गावचे प्रथम नागरिक सरपंच मा. श्री. प्रकाश लंगुटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. श्री. तुकाराम गावडे तसेच समितीचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान वैशालीताई कांबळे यांनी शाळेच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व शाळेच्या प्रगतीसाठी आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

सदर कार्यक्रमाला बरड गावातील पालक, ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. दत्ता टेंबरे यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून त्यांचा उत्साह वाढविला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. ढगे सर यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. उदयकुमार नाळे यांनी उपस्थित मान्यवर, पालक व ग्रामस्थांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

शाळा प्रवेश उत्सवामुळे नवागत विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षणाच्या प्रवासाची प्रेरणादायी सुरुवात झाली आहे.