
फलटण/पुणे | प्रतिनिधी : समाजाच्या वैचारिक जडणघडणीसाठी साहित्य, संस्कृती आणि बौद्धिक विचारांना चालना देणारे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असून अशा दर्जेदार साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना फलटणच्या नाईक निंबाळकर राजघराण्याचे भविष्यातही सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही फलटणचे युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
पुण्यातील सावरकर अध्यापन केंद्र येथे आयोजित करण्यात आलेल्या तरुण लेखक रविराज यांच्या ‘अर्जुनाचा गांडीव शोध’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमास ज्येष्ठ अभिनेते तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
या प्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी, आध्यात्मिक मार्गदर्शक प्रमोद पानसे, विद्या वैभव प्रकाशनचे प्रमुख बकुळ पराडकर आणि प्राचार्य रवींद्र येवले यांची विशेष उपस्थिती लाभली होती.
लेखक रविराज यांनी आयटी क्षेत्रातील नोकरीचा त्याग करून पूर्णवेळ लेखन क्षेत्राची निवड केली आहे. ‘अर्जुनाचा गांडीव शोध’ हे त्यांचे चौथे पुस्तक असून साहित्य क्षेत्रातील त्यांच्या धाडसी आणि प्रेरणादायी प्रवासाचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमात प्राचार्य रवींद्र येवले यांनी केलेल्या अभ्यासपूर्ण आणि प्रभावी भाषणाने उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या विचारांची दखल घेत योगेश सोमण यांनी समाजाला अशा प्रेरणादायी शिक्षकांची आज नितांत आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
या सोहळ्याचे नियोजन अनुबंध कला मंडळाचे अध्यक्ष बकुळ पराडकर यांनी केले होते. कार्यक्रमाच्या समारोपावेळी उपस्थित मान्यवरांना फलटणचे राजे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्यावर आधारित ‘अजिंक्य राजा’ हे पुस्तक भेट देण्यात आले.
यावेळी ॲड. विजय नेवसे, विजय जाधव, विष्णुपंत शिंदे, अरुण भोईटे यांच्यासह साहित्यप्रेमी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. साहित्य, संस्कृती आणि वैचारिक परंपरेचा गौरव करणारा हा सोहळा उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला.









