
फलटणात बंदी असलेल्या चायनीज मांजाचा पुन्हा कहर; गळा कापल्याने नागरिक गंभीर जखमी
फलटण प्रतिनिधी : फलटण शहरात बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे आणखी एक गंभीर अपघात घडला असून, फलटण येथील शिवाजी मुगुटराव बुधावले हे गंभीर जखमी झाले आहेत. डेक्कन चौक परिसरातून जात असताना त्यांच्या गळ्याला चायनीज मांजा लागल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली.
घटनेनंतर परिसरातील सतर्क युवकांनी तत्काळ धाव घेत बुधावले यांना फलटणमधील रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे, शासनाने चायनीज मांजाच्या विक्री व वापरावर बंदी घातलेली असतानाही फलटण शहरातील काही भागांत हा जीवघेणा मांजा सर्रासपणे विकला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणा आणि पोलिस प्रशासनाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरवर्षी चायनीज मांजामुळे दुचाकीस्वार, पादचारी तसेच पक्ष्यांना गंभीर इजा होण्याच्या घटना घडत असताना प्रतिबंधित मांजाची विक्री रोखण्यात अपयश येत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
या घटनेनंतर नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत, “एखाद्या निष्पाप व्यक्तीचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच शहरात सुरू असलेल्या बंदी असलेल्या चायनीज मांजाच्या विक्रीवर तातडीने धाडसत्र राबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
याशिवाय पोलिस प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि संबंधित विभागांनी संयुक्त मोहीम राबवून बंदी असलेल्या चायनीज मांजाची विक्री व वापर पूर्णपणे बंद करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.









