वर्षावास म्हणजे धम्म आचरणातून जीवन समृद्ध करण्याचा काळ : बाबासाहेब जगताप

0
5
वर्षावास म्हणजे धम्म आचरणातून जीवन समृद्ध करण्याचा काळ : बाबासाहेब जगताप

फलटण : वर्षावास प्रवचन मालिकेचे पहिले पुष्प मौजे समतानगर (मठाचीवाडी), ता. फलटण येथे उत्साहपूर्ण व धम्ममय वातावरणात गुंफण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष तथा बौद्धाचार्य आयु. महावीर भालेराव यांनी केले. त्रिसरण व पंचशील ग्रहण, बुद्धपूजा तसेच भीमस्मरण व भीमस्तुतीने प्रवचन मालिकेची सुरुवात करण्यात आली.

यावेळी प्रवचनकार आयु. बाबासाहेब जगताप सर यांनी ‘वर्षावास म्हणजे काय? त्याची सुरुवात कुठे आणि कशामुळे झाली?’ या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. राजा शुद्धोदन आणि महामाया यांच्या पोटी जन्मलेल्या सिद्धार्थ गौतम यांच्या जीवनप्रवासापासून त्यांनी आपल्या विषयाची मांडणी सुरू केली. सिद्धार्थाचा गृहत्याग, ज्ञानप्राप्ती आणि त्यानंतर मानवकल्याणासाठी धम्माचा मार्ग स्वीकारत त्यांनी दिलेला प्रथम धम्मोपदेश यांचा प्रेरणादायी प्रवास त्यांनी उपस्थितांसमोर उलगडून सांगितला.

ज्ञानप्राप्तीनंतर तथागत भगवान बुद्धांनी सारनाथ येथे पंचवर्गीय भिक्खूंना दिलेल्या प्रथम धम्मोपदेशाचा संदर्भ देत वर्षावास परंपरेची सुरुवात कशी झाली, याचे त्यांनी सविस्तर विवेचन केले. वर्षावास हा केवळ एका विशिष्ट कालखंडापुरता मर्यादित नसून धम्माचे चिंतन, मनन आणि आचरण करून जीवन अधिक विवेकी, नैतिक व समताधिष्ठित बनविण्याची संधी आहे, असे आयु. बाबासाहेब जगताप यांनी स्पष्ट केले.

त्यांच्या ओघवत्या, अभ्यासपूर्ण आणि प्रभावी शैलीतील प्रवचनामुळे उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले. वर्षावासाचे महत्त्व, त्यामागील धम्मविचार आणि भगवान बुद्धांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांची सांगड घालत त्यांनी विषय अत्यंत सुंदर पद्धतीने मांडला.

कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभा, फलटण तालुक्याचे माजी संस्कार सचिव आयु. अमोल भोसले सर, माजी संघटक आयु. आनंद जगताप सर तसेच पंचशील मित्र मंडळाचे सर्व सदस्य आणि महिला भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पंचशील मित्र मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे वर्षावास प्रवचन मालिकेचे पहिले पुष्प उत्साहपूर्ण व धम्ममय वातावरणात संपन्न झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here