
जयवंत केंगार यांच्या आंदोलनाला बळ; निधी मंजूर करून तातडीने बांधकाम सुरू करण्याची शासनाकडे मागणी
अकलूज | प्रतिनिधी : अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रस्तावित १०० खाटांच्या नवीन इमारतीसाठी आवश्यक प्रशासकीय व आर्थिक मंजुरी देऊन तात्काळ बांधकाम सुरू करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाला बहुजन सत्यशोधक संघाने जाहीर पाठिंबा दिला आहे. यासंदर्भातील निवेदन उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी), सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक तसेच वैद्यकीय अधीक्षक यांना सादर करण्यात आले.
निवेदनात संघटनेने नमूद केले आहे की, अकलूज उपजिल्हा रुग्णालयाचे ५० खाटांवरून १०० खाटांमध्ये श्रेणीवर्धन करण्यात आले असले, तरी नवीन इमारतीच्या उभारणीसाठी आवश्यक निधी अद्याप मंजूर झालेला नाही. त्यामुळे रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम रखडले असून अकलूज शहरासह संपूर्ण माळशिरस तालुक्यातील नागरिकांना आधुनिक व दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
या मागणीसाठी जयवंत केंगार यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस असून, शासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे त्यांच्या न्याय्य मागण्यांना बहुजन सत्यशोधक संघाने संपूर्ण पाठिंबा जाहीर करत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.
प्रमुख मागण्या
- अकलूज उपजिल्हा रुग्णालयाच्या १०० खाटांच्या नवीन इमारतीस तात्काळ प्रशासकीय व आर्थिक मंजुरी द्यावी.
- आवश्यक निधी मंजूर करून नवीन इमारतीचे बांधकाम तातडीने सुरू करावे.
- उपोषणकर्ते जयवंत केंगार यांच्याशी तातडीने चर्चा करून त्यांच्या न्याय्य मागण्या मान्य कराव्यात.
- माळशिरस तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक सर्व प्रशासकीय प्रक्रिया त्वरीत पूर्ण कराव्यात.
संघटनेने इशारा दिला आहे की, उपोषणाचा कालावधी वाढत असतानाही शासनाने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर जनहितासाठी उभारण्यात येणाऱ्या पुढील तीव्र आंदोलनास शासनच पूर्णपणे जबाबदार राहील.
यावेळी हेमंत भाऊ कांबळे, अविनाश गायकवाड, मोहम्मदभाई शेख, रवींद्र काकडे, त्यार केंगार (पत्रकार) तसेच बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.








