नागपंचमीपूर्वी फलटण नगरपरिषदेचा इशारा; चायनीज व नायलॉन मांजाची विक्री टाळा, अन्यथा कारवाई

0
2
नागपंचमीपूर्वी फलटण नगरपरिषदेचा इशारा; चायनीज व नायलॉन मांजाची विक्री टाळा, अन्यथा कारवाई

नागपंचमीपूर्वी फलटण नगरपरिषदेचा इशारा; चायनीज व नायलॉन मांजाची विक्री टाळा, अन्यथा कारवाई

फलटण | प्रतिनिधी. आगामी नागपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर फलटण नगरपरिषदेने शहरातील सर्व व्यापारी, दुकानदार, गोदामधारक तसेच घरातून पतंग व मांजाची विक्री करणाऱ्या नागरिकांना चायनीज व नायलॉन मांजाची विक्री न करण्याचे स्पष्ट आवाहन केले आहे.

नगरपरिषदेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नागपंचमीच्या काळात मोठ्या प्रमाणावर पतंग उडविण्याची परंपरा आहे. मात्र, पतंग उडविण्यासाठी वापरला जाणारा चायनीज व नायलॉन मांजा नागरिक, दुचाकीस्वार, पक्षी आणि प्राण्यांच्या जीवितासाठी गंभीर धोका निर्माण करतो. अशा मांजामुळे अनेक अपघात घडून जीवितहानी व गंभीर दुखापती झाल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर शहरातील कोणत्याही व्यापाऱ्याने किंवा विक्रेत्याने चायनीज अथवा नायलॉन मांजाची विक्री करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. या सूचनेकडे दुर्लक्ष करून बंदी असलेल्या मांजाची विक्री केल्याचे आढळल्यास संबंधित दुकानाचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल. तसेच अशा मांजामुळे अपघात झाल्यास संबंधित विक्रेत्यावर कायदेशीर कारवाईही करण्यात येणार असल्याचा इशारा नगरपरिषदेने दिला आहे.

फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी ही सूचना जारी केली असून, सर्व व्यापारी व नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करून सुरक्षित आणि पर्यावरणपूरक नागपंचमी साजरी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.