Sunday, September 20, 2026
Homeफलटणगोविंद मिल्कचे ६५० दूध संकलन कर्मचाऱ्यांसाठी विशेष उजळणी शिबिर; गुणवत्ता व स्वच्छतेवर...

गोविंद मिल्कचे ६५० दूध संकलन कर्मचाऱ्यांसाठी विशेष उजळणी शिबिर; गुणवत्ता व स्वच्छतेवर भर

गोविंद मिल्कचे ६५० दूध संकलन कर्मचाऱ्यांसाठी विशेष उजळणी शिबिर; गुणवत्ता व स्वच्छतेवर भर

फलटण | प्रतिनिधी : दूध संकलन प्रक्रियेत अधिक गुणवत्ता, स्वच्छता आणि पारदर्शकता निर्माण करण्याच्या उद्देशाने गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स, फलटण यांच्या वतीने विशेष उजळणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. कोळकी (ता. फलटण) येथील अनंत मंगल कार्यालयात पार पडलेल्या या शिबिरात गोविंदच्या सर्व दूध बल्क कुलर चालक, सेंटर चालक तसेच संबंधित कर्मचारी अशा सुमारे ६५० जणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे १२ जून रोजी झालेल्या बैठकीनंतर राज्यभर दूध संकलन प्रक्रियेत गुणवत्ता सुधारणा आणि अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन यावर भर देण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर गोविंद मिल्कने हे विशेष प्रशिक्षण व उजळणी शिबिर आयोजित केले.

या उपक्रमासाठी गोविंद मिल्कचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), संचालिका श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी धर्मेंद्र भल्ला यांनी विशेष पुढाकार घेतला.

शिबिरात दूध संकलन विभाग प्रमुख डॉ. गणेश सपकळ, बापूसाहेब हिप्परकर आणि ज्ञानेश्वर शिंदे यांनी उपस्थितांना दूध संकलनातील स्वच्छतेचे निकष, गुणवत्ता नियंत्रण, अन्न सुरक्षा नियम तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी दूध संकलन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

गेल्या तीन दशकांपासून गोविंद मिल्क सातत्याने स्वच्छ, ताजे आणि उच्च दर्जाचे दूध संकलन करत असून आज ३५ हजारांहून अधिक दूध उत्पादक शेतकरी या संस्थेशी जोडले गेले आहेत. पारदर्शक व्यवहार, विश्वासार्ह यंत्रणा आणि शेतकरी हिताला प्राधान्य देणाऱ्या धोरणांमुळे गोविंदने दुग्ध व्यवसाय क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

शेतकऱ्यांचा दुग्ध व्यवसाय अधिक आधुनिक, किफायतशीर आणि तंत्रज्ञानाधिष्ठित व्हावा यासाठी गोविंदच्या दुग्ध व्यवसाय विकास प्रशिक्षण विभागामार्फत गोठे व बल्क कुलर केंद्रांवर नियमित प्रशिक्षण दिले जाते. डॉ. शांताराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा विभाग शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक दुग्ध व्यवस्थापनाचे तंत्र पोहोचवत आहे.

गोविंद डेअरीमध्ये संकलित होणाऱ्या उच्च दर्जाच्या कच्च्या दुधाच्या बळावर पिशवीबंद दूध आणि विविध दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीतही संस्थेने राज्यासह देशभरात नावलौकिक मिळविला आहे. या यशामागे चेअरमन संजीवराजे नाईक निंबाळकर, संचालिका शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी धर्मेंद्र भल्ला तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे मानले जाते.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नियमांचे पालन करून गुणवत्तापूर्ण दूध संकलनाची प्रक्रिया गोविंदमध्ये आधीपासूनच राबविली जात असली तरी या उजळणी शिबिरामुळे गुणवत्ता आणि स्वच्छतेच्या मानकांमध्ये आणखी सुधारणा होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments