फलटण | प्रतिनिधी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी व काँग्रेस सेवा दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सांगली ते दिल्ली सायकलवारीचे फलटण शहरात उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. देशात सामाजिक ऐक्य, संविधानिक मूल्यांचा प्रचार आणि जनजागृतीचा संदेश घेऊन निघालेल्या या सायकलवारीतील सायकलवीरांचे फलटण शहर काँग्रेसचे अध्यक्ष तथा नगरसेवक पंकज पवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी पंकज पवार यांनी सायकलवारीत सहभागी झालेल्या सायकलवीरांचे अभिनंदन करत त्यांच्या धाडसी आणि प्रेरणादायी उपक्रमाचे कौतुक केले. शेकडो किलोमीटरचा प्रवास सायकलद्वारे करत समाजात सकारात्मक संदेश पोहोचविण्याचे कार्य निश्चितच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सायकलवीरांना पुढील दिल्लीपर्यंतच्या प्रवासासाठी शुभेच्छा देत त्यांचा हा जनजागृतीचा प्रवास यशस्वी होवो, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली. स्वागत कार्यक्रमावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सायकलवारीच्या माध्यमातून युवकांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी, लोकशाही मूल्ये आणि संविधानाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
बहुजन समाज पक्षाचे शहराध्यक्ष विद्याधर किरतावडे यांचा वाढदिवस दुधेबावी येथे उत्साहात साजरा
दुधेबावी (प्रतिनिधी) : बहुजन समाज पक्षाचे मीरा-भाईंदर शहराध्यक्ष तथा सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले आयु. विद्याधर किरतावडे यांचा वाढदिवस दुधेबावी येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महामानवांना वंदन करून तसेच दीप, धूप व पुष्प अर्पण करून करण्यात आली. यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष तथा बौद्धाचार्य आयुष्यमान महावीर भालेराव यांच्या हस्ते बुद्धपूजा घेण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात त्रिसरण, पंचशील, बुद्ध पूजा भिमस्मरण, भीमस्तुती ने झाली.कार्यक्रमात विविध मान्यवरांनी किरतावडे यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “विद्याधर किरतावडे हे अत्यंत मनमिळावू, मोकळ्या मनाचे आणि सर्वसामान्यांशी सहज संवाद साधणारे व्यक्तिमत्त्व आहे. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात ते सातत्याने कार्यरत असून समाजातील लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी ते झटत असतात. कोणत्याही पदाचा गर्व न बाळगता ते सर्वसामान्य कार्यकर्त्याप्रमाणे वावरतात. त्यांची विनम्रता आणि संवेदनशीलता ही त्यांची विशेष ओळख आहे.”
भारतीय बौद्ध महासभेचे प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे यांनी शुभेच्छा देताना सांगितले की, “किरतावडे हे बौद्ध धम्माच्या आचार-विचारांनुसार निर्मळ जीवन जगत आहेत. कोणताही कार्यक्रम शिस्तबद्ध आणि सुनियोजित पद्धतीने पार पडावा यासाठी त्यांचा विशेष आग्रह असतो. झालेल्या चुकांबाबत ते प्रांजळपणे मत व्यक्त करून त्या दुरुस्त करण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करतात. त्यांच्या दिलदार आणि मोकळ्या स्वभावामुळे ते सर्वांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून आहेत.”
भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे सरचिटणीस आयु. बाबासाहेब जगताप यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “आमचे बंधू विद्याधर किरतावडे हे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व असून बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांवर त्यांची अपार श्रद्धा आहे. महापुरुषांच्या विचारांनुसार ते आपले जीवन व्यतीत करीत आहेत. त्यांच्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत आणि त्यांना उत्तम आरोग्यासह दीर्घायुष्य लाभो, ही तथागत चरणी प्रार्थना आहे.”
बौद्धाचार्य आयुष्यमान महावीर भालेराव यांनी किरतावडे यांच्या गुणवैशिष्ट्यांवर प्रकाश टाकताना सांगितले की, “बुद्धबल, धम्मबल आणि संघबलाच्या आधारे किरतावडे सरांच्या मनातील सर्व सदिच्छा पूर्ण होवोत आणि त्यांचे सामाजिक कार्य अधिक व्यापक व्हावे.” कार्यक्रमाची सांगता सरणतय घेऊन करण्यात आली. यावेळी ॲड. चंद्रशेखर मोरे परिवार, जगताप परिवार, किरतावडे परिवार तसेच भारतीय बौद्ध महासभा परिवार (BBM Family) मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी आयु. विद्याधर किरतावडे यांना वाढदिवसानिमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
फलटण | प्रतिनिधी. महाराष्ट्र शासनाच्या महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी लागू असलेल्या एसटी प्रवास सवलत योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक पप्पूभाई तानुद्दीन शेख यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. त्यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक ४ मधील महिला व ज्येष्ठ नागरिकांना केवळ २२० रुपयांत एनसीएमसी (NCMC) कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे लाभार्थ्यांच्या घरी जाऊन कार्ड तयार करून देण्याची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार १२ वर्षांवरील सर्व महिला प्रवासी तसेच ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बस प्रवासात अर्ध्या तिकिटाची सवलत दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्ड आवश्यक असून अनेक नागरिकांना कार्ड काढताना होणारी गैरसोय लक्षात घेऊन हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.
कार्ड नोंदणीसाठी लाभार्थ्यांनी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक आणि स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे. कार्डचे शुल्क फक्त २२० रुपये ठेवण्यात आले असून नागरिकांच्या सोयीसाठी घरपोच सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे प्रभागातील महिला भगिनी आणि ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या एसटी प्रवास सवलतीचा लाभ सहज मिळणार असून नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेवक पप्पूभाई शेख यांनी केले आहे.
एनसीएमसी स्मार्ट कार्ड व एसटी पास कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद; राहिलेल्यांसाठी बुधवारी पुन्हा विशेष कॅम्प
अकलूज | प्रतिनिधी :- अकलूज नगर परिषद प्रभाग क्रमांक १० मध्ये महिलांसाठी व जेष्ठ नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एनसीएमसी स्मार्ट कार्ड व एसटी पास विशेष कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सोमवारी झालेल्या या कॅम्पमध्ये मोठ्या संख्येने महिलांनी व जेष्ठ नागरिकांनी सहभाग घेत विविध सुविधांचा लाभ घेतला.
मात्र, नागरिकांची मोठी गर्दी झाल्यामुळे अनेक नागरिकांना वेळेअभावी परत जावे लागले. त्यामुळे राहिलेल्या नागरिकांच्या सोयीसाठी बुधवारी सकाळी ९ वाजता पुन्हा विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला असल्याची माहिती नगरसेविका मनिषाताई मोहन तिकोटे यांनी दिली.
आपल्या गावचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील (बाबा) तसेच नगराध्यक्षा रेश्माताई आडगळे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या नगरसेविका मनिषाताई मोहन तिकोटे यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या कॅम्पमध्ये महिलांसाठी एसटी पास, एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी तसेच संबंधित मार्गदर्शन करण्यात येत आहे. विशेषतः महिला व जेष्ठ नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
नगरसेविका मनिषाताई तिकोटे यांनी सांगितले की, “ज्या नागरिकांना सोमवारी कॅम्पचा लाभ घेता आला नाही, त्यांनी बुधवारी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पला उपस्थित राहून सुविधांचा लाभ घ्यावा.”
फलटण | प्रतिनिध फलटण नगर परिषद प्रशासनाकडून शहरातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम सध्या मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत असून, या मोहिमेत कोणतीही गय न करता धडक कारवाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील श्रीमंत मालोजीराजे पुतळा परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) जागेवर झालेल्या अतिक्रमणावरही तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार संभाजी मोरे यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. मोरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, पालखी महामार्गावरील श्रीमंत मालोजीराजे पुतळा परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले असून त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. परिणामी वाहनचालक व पादचाऱ्यांना वाहतुकीदरम्यान मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. दरम्यान, नगर परिषद प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग देत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील उपअभियंत्यांच्या निवासस्थानावरील वॉल कंपाऊंडवरही कारवाई केली. रस्त्याच्या काही भागात अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर नगरपालिकेने जेसीबीच्या साहाय्याने संबंधित कंपाऊंड पाडून टाकले. विशेष म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानावरही कारवाई करण्यात आल्याने शहरात या मोहिमेची मोठी चर्चा रंगली आहे. या कारवाईमुळे श्रीमंत मालोजीराजे पुतळा ते माळजाई मार्ग अतिक्रमणमुक्त होण्यास मोठी मदत होणार असून रस्त्याची रुंदी वाढणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन वाहनचालक व नागरिकांना दिलासा मिळणार आहे. अनेक दिवसांपासून अतिक्रमणामुळे संकुचित झालेला हा मार्ग आता मोकळा होत असल्याने “रस्त्याने मोकळा श्वास घेतला” अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत
श्रीराम साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होणार का? तालुक्यात उत्सुकता आणि चिंतेचे वातावरण
फलटण | प्रतिनिधी. श्रीराम सहकारी साखर कारखाना दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, साखरवाडी यांना भाडेतत्त्वावर चालविण्याच्या प्रक्रियेबाबत फलटण तालुक्यात सध्या विविध चर्चांना उधाण आले आहे. राज्य शासनाने या निर्णयाला स्थगिती दिल्याची चर्चा रंगत असली तरी त्यासंदर्भात कोणताही अधिकृत लेखी आदेश अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे यंदाचा गळीत हंगाम वेळेत सुरू होणार की नाही, याबाबत शेतकरी, कामगार आणि व्यापारी वर्गामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार कारखाना प्रशासनाने बोलावलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, साखरवाडी या कंपनीला कारखाना चालविण्यास सभासदांनी एकमताने मंजुरी दिली होती. या निर्णयामुळे कारखाना सुरू करण्याच्या प्रक्रियेला सभासदांचा स्पष्ट पाठिंबा मिळाल्याचे मानले जात आहे. त्यानंतर दुरुस्तीची कामे, यंत्रसामग्रीची देखभाल, आवश्यक करार आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून चालू गळीत हंगामात कारखाना कार्यान्वित करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती मिळत आहे.
श्रीराम सहकारी साखर कारखाना हा फलटण तालुक्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. हजारो ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, वाहतूक व्यावसायिक, व्यापारी आणि अनेक कुटुंबांची उपजीविका या कारखान्यावर अवलंबून आहे. त्यामुळे कारखान्याबाबत निर्माण झालेली अनिश्चितता ही संपूर्ण तालुक्यासाठी चिंतेची बाब ठरत आहे.
दरम्यान, जव्हार समूहाचा कारखाना चालविण्याचा करार संपुष्टात आल्यानंतर काही प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याची चर्चा सुरू आहे. मागील गळीत हंगामातील काही शेतकऱ्यांची ऊसबिले तसेच इतर आर्थिक देणी अद्याप बाकी असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय काही कामगारांचे दोन महिन्यांचे वेतनही थकीत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकरी आणि कामगार वर्गामध्ये अस्वस्थता वाढली आहे.
अशा परिस्थितीत नवीन व्यवस्थापनाखाली कारखाना सुरू होऊन आर्थिक व्यवहारांना गती मिळणे आवश्यक असल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा करार प्रत्यक्षात येऊन कारखाना सुरू झाल्यास प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल, तसेच शेतकरी, कामगार आणि स्थानिक बाजारपेठेला नव्याने आर्थिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, कारखान्याचे कर्मचारी लवकरच साखर आयुक्तांची भेट घेण्याच्या तयारीत आहेत. गळीत हंगाम वेळेत सुरू व्हावा आणि कारखान्याच्या प्रश्नावर सकारात्मक तोडगा निघावा यासाठी कर्मचारी वर्ग प्रयत्नशील असल्याचे समजते.
सध्या वाढती महागाई, शेतीसमोरील संकटे आणि दुष्काळाचे संभाव्य सावट यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था दबावाखाली आहे. अशा परिस्थितीत श्रीराम सहकारी साखर कारखाना सुरू न झाल्यास त्याचा परिणाम केवळ शेतकऱ्यांवरच नव्हे, तर फलटणच्या संपूर्ण बाजारपेठेवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. व्यापार, वाहतूक, रोजगार आणि स्थानिक आर्थिक उलाढालीवर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
शेतकरी सभासद, कामगार आणि व्यापाऱ्यांचे मत आहे की कारखान्याच्या प्रश्नात कोणत्याही प्रकारचे राजकारण आणू नये. भविष्यात कारखान्याची निवडणूक होईल, त्यावेळी सभासद योग्य निर्णय घेतील. मात्र सध्याच्या घडीला सर्वांनी एकत्र येऊन कारखाना सुरू करण्याला प्राधान्य द्यावे आणि तालुक्याच्या आर्थिक हिताला अग्रक्रम द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
फलटण तालुक्याच्या आर्थिक विकासाशी आणि हजारो कुटुंबांच्या उपजीविकेशी निगडित असलेल्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम वेळेत सुरू होणे ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे प्रशासन, सत्ताधारी, विरोधक आणि संबंधित सर्व घटकांनी एकत्रितपणे पुढाकार घेऊन कारखान्याचे भवितव्य सुरक्षित करावे, अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.
फलटण | प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) महिलांसाठी ५० टक्के प्रवास सवलत योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या एनसीएमसी कार्ड नोंदणी अभियानाचा शुभारंभ शिवसेनेचे नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, शिवसेना सातारा जिल्हा समन्वयक विराज खराडे, शिवसैनिक तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक ८ मध्ये नगरसेवक विशाल तेली यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून आतापर्यंत तब्बल ४१० महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे. महिलांना सुरक्षित, परवडणारा आणि सशक्त प्रवास उपलब्ध करून देणाऱ्या या योजनेची माहिती तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने विशेष नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटनप्रसंगी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. नगरसेवक विशाल तेली यांनी आयोजित केलेल्या विशेष शिबिरात सुरुवातीला १९० महिलांची नोंदणी करण्यात आली. त्यानंतर हा उपक्रम अधिक व्यापक करत त्यांनी घरोघरी जाऊन महिलांना योजनेची माहिती देत नोंदणी प्रक्रिया सुरू ठेवली. या घरपोच मोहिमेद्वारे आणखी २२० महिलांची नोंदणी करण्यात आली असून एकूण आकडा ४१० वर पोहोचला आहे. याबाबत बोलताना विशाल तेली यांनी सांगितले की, “प्रभागातील एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. अनेक महिलांना नोंदणी केंद्रावर येणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांच्या घरी जाऊन नोंदणी करण्याचा उपक्रम राबवला जात आहे.” अद्याप ज्या महिलांची नोंदणी झालेली नाही, त्यांनी ८१४९०४९००५ या क्रमांकावर संपर्क साधावा. संपर्कानंतर संबंधित लाभार्थ्यांच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती विशाल तेली यांनी दिली. या उपक्रमामुळे प्रभाग क्रमांक ८ मधील महिलांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून शासनाच्या योजनेचा लाभ थेट नागरिकांच्या दारी पोहोचविणाऱ्या या अभिनव मोहिमेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
फलटण : नेपाळची राजधानी काठमांडू येथे पार पडलेल्या पहिल्या साऊथ एशियन सॉफ्ट हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय पुरुष सॉफ्ट हॉकी संघाने पाकिस्तानवर ७-० अशी दणदणीत मात करत ऐतिहासिक विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व महाराष्ट्राचे सुपुत्र लखन नंदकुमार मोरे यांनी कर्णधार म्हणून अत्यंत यशस्वीपणे केले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत शानदार कामगिरी करत दक्षिण आशियातील सर्वोच्च किताब आपल्या नावावर केला. भारतीय संघाच्या या अभूतपूर्व यशाबद्दल कर्णधार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. समूहाचे संचालक व युवाउद्योजक मा. श्री. सचिन यादव यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचे कौतुक करण्यात आले तसेच भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी बोलताना सचिन यादव म्हणाले, “खेळ हा केवळ स्पर्धेचा विषय नसून तो शिस्त, नेतृत्व, समर्पण आणि देशभक्तीची भावना रुजवणारे प्रभावी माध्यम आहे. लखन मोरे यांनी भारतीय संघाचे नेतृत्व करत देशाला अभिमानास्पद यश मिळवून दिले आहे. त्यांचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास युवा पिढीसाठी आदर्श आहे.” के. बी. उद्योग समूह सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण, कला, संस्कृती, सामाजिक कार्य तसेच क्रीडा क्षेत्रातील गुणवंतांना प्रोत्साहन देण्याचे कार्य सातत्याने करत आहे. विविध खेळांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आर्थिक आणि नैतिक पाठबळ देऊन त्यांचा उत्साह वाढवण्याचे कार्यही समूहामार्फत केले जाते. भारतीय संघाच्या या ऐतिहासिक यशामुळे देशासह महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल झाले असून कर्णधार लखन मोरे यांच्या नेतृत्वाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. उपस्थित मान्यवरांनी भारतीय संघाला आणि लखन मोरे यांना भविष्यात आणखी मोठे यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे सॉफ्ट हॉकी हा पूर्णपणे भारतात विकसित झालेला खेळ असून दक्षिण आशियाई देशांमध्ये त्याची लोकप्रियता वेगाने वाढत आहे. पहिल्याच स्पर्धेत भारताने विजेतेपद मिळवत या खेळातील आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
पांथस्थ आयोजित एक दिवसीय छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई अभ्यास दौरा; सहभागींसाठी सुवर्णसंधी
फलटण : इतिहास, संस्कृती आणि बौद्ध स्थापत्य कलेचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासक, विद्यार्थी आणि इतिहासप्रेमींसाठी “पांथस्थ” संस्थेच्या वतीने एक दिवसीय अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा अभ्यास दौरा मुंबई येथील प्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय येथे आयोजित करण्यात आला असून हा दौरा पूर्णपणे निशुल्क असणार आहे. या अभ्यास दौऱ्याचा मुख्य उद्देश छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयामध्ये जतन करण्यात आलेल्या बौद्ध स्थापत्याशी संबंधित शिल्पकला, प्राचीन शिलालेख आणि ऐतिहासिक अवशेषांची माहिती सहभागींपर्यंत पोहोचवणे हा आहे. इतिहास अभ्यासकांच्या मार्गदर्शनाखाली या वस्तूंविषयी सविस्तर माहिती दिली जाणार असून बौद्ध संस्कृतीचा समृद्ध वारसा जवळून अनुभवण्याची संधी सहभागीांना मिळणार आहे. संस्थेच्या वतीने इच्छुकांनी या अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी आगाऊ नाव नोंदणी करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी इच्छुकांनी खालील लिंकद्वारे व्हॉट्सअॅप समूहात सहभागी होऊन आपली नोंदणी पूर्ण करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नाव नोंदणी लिंक : https://chat.whatsapp.com/GjpeecZLrK03BuVob6TtbD?s=cl&p=a&mlu=0 इतिहास, पुरातत्त्व आणि बौद्ध स्थापत्याचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हा अभ्यास दौरा अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
फलटण : मामाच्या गावाला जाण्यासाठी आनंदाने घराबाहेर पडलेल्या तीन भावंडांवर नियतीने काळाचा घाला घातला. निरा–मोरगाव राज्य मार्गावरील चौधरवाडी फाटा येथे शनिवारी (दि. ६) सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन सख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा लहान भाऊ गंभीर जखमी झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे फलटण तालुक्यातील मुरूम गावासह संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुरूम (ता. फलटण) येथील सेजल ज्ञानेश्वर बोडरे (वय १७), अक्षरा ज्ञानेश्वर बोडरे (वय १५) आणि त्यांचा भाऊ पवन ज्ञानेश्वर बोडरे (वय १२) हे बारामती तालुक्यातील मुर्टी या मामाच्या गावाला जाण्यासाठी इलेक्ट्रिक स्कुटीवरून निघाले होते. चौधरवाडी फाट्याजवळ त्यांच्या स्कुटीची आयशर टेम्पो (क्र. DD-01-G-9343) सोबत समोरासमोर भीषण धडक झाली. धडक इतकी भीषण होती की स्कुटीचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर टेम्पोने स्कुटीला काही अंतर फरपटत नेल्याने दुर्घटनेची तीव्रता अधिक वाढली. या अपघातात सेजल व अक्षरा या दोन्ही बहिणींचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर पवन गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने बारामती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला पुण्यातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघाताचे भीषण स्वरूप पाहून उपस्थित नागरिकही हादरून गेले. काही काळ निरा–मोरगाव मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच वडगाव निंबाळकर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संबंधित टेम्पो चालकाला ताब्यात घेत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. कुटुंबावर दुःखाचा डोंगर या दुर्दैवी अपघातामुळे मुरूम येथील बोडरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रविवारी दुपारी १२ वाजता मुरूम गावातील स्मशानभूमीत सेजल व अक्षरा यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी सकाळी बारामती शासकीय रुग्णालयाच्या शववाहिकेतून दोन्ही बहिणींचे मृतदेह त्यांच्या ४ सर्कल, मुरूम येथील राहत्या घरी आणण्यात आले. यावेळी आई नीलम बोडरे व कुटुंबीयांनी केलेला आक्रोश उपस्थितांच्या काळजाला भिडणारा होता. साखरवाडी विद्यालयातील शिक्षक-शिक्षिका, ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिकांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले. हुशार विद्यार्थिनींची स्वप्ने अधुरीच सेजल ही बारावीमध्ये शिक्षण घेत होती, तर अक्षरा दहावीत गेली होती. दोघीही अभ्यासात अत्यंत हुशार, चुणचुणीत आणि सर्वांच्या आवडत्या विद्यार्थिनी होत्या. भविष्यात एअर होस्टेस बनण्याचे त्यांचे स्वप्न होते. मात्र नियतीच्या एका घावाने त्यांची सर्व स्वप्ने कायमची अधुरी राहिली. पवन यंदा सहावीत गेला असून त्याच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत. एका क्षणात झालेल्या या अपघाताने बोडरे कुटुंबाचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले असून संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.