श्रीराम साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होणार का? तालुक्यात उत्सुकता आणि चिंतेचे वातावरण

0
34
श्रीराम साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होणार का? तालुक्यात उत्सुकता आणि चिंतेचे वातावरण

श्रीराम साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होणार का? तालुक्यात उत्सुकता आणि चिंतेचे वातावरण

फलटण | प्रतिनिधी. श्रीराम सहकारी साखर कारखाना दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, साखरवाडी यांना भाडेतत्त्वावर चालविण्याच्या प्रक्रियेबाबत फलटण तालुक्यात सध्या विविध चर्चांना उधाण आले आहे. राज्य शासनाने या निर्णयाला स्थगिती दिल्याची चर्चा रंगत असली तरी त्यासंदर्भात कोणताही अधिकृत लेखी आदेश अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे यंदाचा गळीत हंगाम वेळेत सुरू होणार की नाही, याबाबत शेतकरी, कामगार आणि व्यापारी वर्गामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार कारखाना प्रशासनाने बोलावलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, साखरवाडी या कंपनीला कारखाना चालविण्यास सभासदांनी एकमताने मंजुरी दिली होती. या निर्णयामुळे कारखाना सुरू करण्याच्या प्रक्रियेला सभासदांचा स्पष्ट पाठिंबा मिळाल्याचे मानले जात आहे. त्यानंतर दुरुस्तीची कामे, यंत्रसामग्रीची देखभाल, आवश्यक करार आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून चालू गळीत हंगामात कारखाना कार्यान्वित करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती मिळत आहे.

श्रीराम सहकारी साखर कारखाना हा फलटण तालुक्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. हजारो ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, वाहतूक व्यावसायिक, व्यापारी आणि अनेक कुटुंबांची उपजीविका या कारखान्यावर अवलंबून आहे. त्यामुळे कारखान्याबाबत निर्माण झालेली अनिश्चितता ही संपूर्ण तालुक्यासाठी चिंतेची बाब ठरत आहे.

दरम्यान, जव्हार समूहाचा कारखाना चालविण्याचा करार संपुष्टात आल्यानंतर काही प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याची चर्चा सुरू आहे. मागील गळीत हंगामातील काही शेतकऱ्यांची ऊसबिले तसेच इतर आर्थिक देणी अद्याप बाकी असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय काही कामगारांचे दोन महिन्यांचे वेतनही थकीत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकरी आणि कामगार वर्गामध्ये अस्वस्थता वाढली आहे.

अशा परिस्थितीत नवीन व्यवस्थापनाखाली कारखाना सुरू होऊन आर्थिक व्यवहारांना गती मिळणे आवश्यक असल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा करार प्रत्यक्षात येऊन कारखाना सुरू झाल्यास प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल, तसेच शेतकरी, कामगार आणि स्थानिक बाजारपेठेला नव्याने आर्थिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, कारखान्याचे कर्मचारी लवकरच साखर आयुक्तांची भेट घेण्याच्या तयारीत आहेत. गळीत हंगाम वेळेत सुरू व्हावा आणि कारखान्याच्या प्रश्नावर सकारात्मक तोडगा निघावा यासाठी कर्मचारी वर्ग प्रयत्नशील असल्याचे समजते.

सध्या वाढती महागाई, शेतीसमोरील संकटे आणि दुष्काळाचे संभाव्य सावट यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था दबावाखाली आहे. अशा परिस्थितीत श्रीराम सहकारी साखर कारखाना सुरू न झाल्यास त्याचा परिणाम केवळ शेतकऱ्यांवरच नव्हे, तर फलटणच्या संपूर्ण बाजारपेठेवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. व्यापार, वाहतूक, रोजगार आणि स्थानिक आर्थिक उलाढालीवर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

शेतकरी सभासद, कामगार आणि व्यापाऱ्यांचे मत आहे की कारखान्याच्या प्रश्नात कोणत्याही प्रकारचे राजकारण आणू नये. भविष्यात कारखान्याची निवडणूक होईल, त्यावेळी सभासद योग्य निर्णय घेतील. मात्र सध्याच्या घडीला सर्वांनी एकत्र येऊन कारखाना सुरू करण्याला प्राधान्य द्यावे आणि तालुक्याच्या आर्थिक हिताला अग्रक्रम द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

फलटण तालुक्याच्या आर्थिक विकासाशी आणि हजारो कुटुंबांच्या उपजीविकेशी निगडित असलेल्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम वेळेत सुरू होणे ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे प्रशासन, सत्ताधारी, विरोधक आणि संबंधित सर्व घटकांनी एकत्रितपणे पुढाकार घेऊन कारखान्याचे भवितव्य सुरक्षित करावे, अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.