Thursday, September 10, 2026
Homeफलटणमामाच्या गावाला निघालेल्या तीन भावंडांवर काळाचा घाला; दोन सख्या बहिणींचा जागीच मृत्यू

मामाच्या गावाला निघालेल्या तीन भावंडांवर काळाचा घाला; दोन सख्या बहिणींचा जागीच मृत्यू


फलटण : मामाच्या गावाला जाण्यासाठी आनंदाने घराबाहेर पडलेल्या तीन भावंडांवर नियतीने काळाचा घाला घातला. निरा–मोरगाव राज्य मार्गावरील चौधरवाडी फाटा येथे शनिवारी (दि. ६) सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन सख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा लहान भाऊ गंभीर जखमी झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे फलटण तालुक्यातील मुरूम गावासह संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरूम (ता. फलटण) येथील सेजल ज्ञानेश्वर बोडरे (वय १७), अक्षरा ज्ञानेश्वर बोडरे (वय १५) आणि त्यांचा भाऊ पवन ज्ञानेश्वर बोडरे (वय १२) हे बारामती तालुक्यातील मुर्टी या मामाच्या गावाला जाण्यासाठी इलेक्ट्रिक स्कुटीवरून निघाले होते. चौधरवाडी फाट्याजवळ त्यांच्या स्कुटीची आयशर टेम्पो (क्र. DD-01-G-9343) सोबत समोरासमोर भीषण धडक झाली.
धडक इतकी भीषण होती की स्कुटीचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर टेम्पोने स्कुटीला काही अंतर फरपटत नेल्याने दुर्घटनेची तीव्रता अधिक वाढली. या अपघातात सेजल व अक्षरा या दोन्ही बहिणींचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर पवन गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने बारामती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला पुण्यातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघाताचे भीषण स्वरूप पाहून उपस्थित नागरिकही हादरून गेले. काही काळ निरा–मोरगाव मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
घटनेची माहिती मिळताच वडगाव निंबाळकर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संबंधित टेम्पो चालकाला ताब्यात घेत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
या दुर्दैवी अपघातामुळे मुरूम येथील बोडरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रविवारी दुपारी १२ वाजता मुरूम गावातील स्मशानभूमीत सेजल व अक्षरा यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
रविवारी सकाळी बारामती शासकीय रुग्णालयाच्या शववाहिकेतून दोन्ही बहिणींचे मृतदेह त्यांच्या ४ सर्कल, मुरूम येथील राहत्या घरी आणण्यात आले. यावेळी आई नीलम बोडरे व कुटुंबीयांनी केलेला आक्रोश उपस्थितांच्या काळजाला भिडणारा होता. साखरवाडी विद्यालयातील शिक्षक-शिक्षिका, ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिकांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले.
हुशार विद्यार्थिनींची स्वप्ने अधुरीच
सेजल ही बारावीमध्ये शिक्षण घेत होती, तर अक्षरा दहावीत गेली होती. दोघीही अभ्यासात अत्यंत हुशार, चुणचुणीत आणि सर्वांच्या आवडत्या विद्यार्थिनी होत्या. भविष्यात एअर होस्टेस बनण्याचे त्यांचे स्वप्न होते. मात्र नियतीच्या एका घावाने त्यांची सर्व स्वप्ने कायमची अधुरी राहिली.
पवन यंदा सहावीत गेला असून त्याच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत. एका क्षणात झालेल्या या अपघाताने बोडरे कुटुंबाचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले असून संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments