भारताचा ऐतिहासिक विजय; कर्णधार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून सत्कार

0
2
भारताचा ऐतिहासिक विजय; कर्णधार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून सत्कार

फलटण : नेपाळची राजधानी काठमांडू येथे पार पडलेल्या पहिल्या साऊथ एशियन सॉफ्ट हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय पुरुष सॉफ्ट हॉकी संघाने पाकिस्तानवर ७-० अशी दणदणीत मात करत ऐतिहासिक विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व महाराष्ट्राचे सुपुत्र लखन नंदकुमार मोरे यांनी कर्णधार म्हणून अत्यंत यशस्वीपणे केले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत शानदार कामगिरी करत दक्षिण आशियातील सर्वोच्च किताब आपल्या नावावर केला.
भारतीय संघाच्या या अभूतपूर्व यशाबद्दल कर्णधार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. समूहाचे संचालक व युवाउद्योजक मा. श्री. सचिन यादव यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचे कौतुक करण्यात आले तसेच भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना सचिन यादव म्हणाले, “खेळ हा केवळ स्पर्धेचा विषय नसून तो शिस्त, नेतृत्व, समर्पण आणि देशभक्तीची भावना रुजवणारे प्रभावी माध्यम आहे. लखन मोरे यांनी भारतीय संघाचे नेतृत्व करत देशाला अभिमानास्पद यश मिळवून दिले आहे. त्यांचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास युवा पिढीसाठी आदर्श आहे.”
के. बी. उद्योग समूह सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण, कला, संस्कृती, सामाजिक कार्य तसेच क्रीडा क्षेत्रातील गुणवंतांना प्रोत्साहन देण्याचे कार्य सातत्याने करत आहे. विविध खेळांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आर्थिक आणि नैतिक पाठबळ देऊन त्यांचा उत्साह वाढवण्याचे कार्यही समूहामार्फत केले जाते.
भारतीय संघाच्या या ऐतिहासिक यशामुळे देशासह महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल झाले असून कर्णधार लखन मोरे यांच्या नेतृत्वाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. उपस्थित मान्यवरांनी भारतीय संघाला आणि लखन मोरे यांना भविष्यात आणखी मोठे यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
विशेष म्हणजे सॉफ्ट हॉकी हा पूर्णपणे भारतात विकसित झालेला खेळ असून दक्षिण आशियाई देशांमध्ये त्याची लोकप्रियता वेगाने वाढत आहे. पहिल्याच स्पर्धेत भारताने विजेतेपद मिळवत या खेळातील आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.