Monday, September 14, 2026
Homeसातारामौजे जिंतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; मा. सोमिनाथ घोरपडे यांचे विचारप्रवर्तक...

मौजे जिंतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; मा. सोमिनाथ घोरपडे यांचे विचारप्रवर्तक मार्गदर्शन

फलटण : मौजे जिंती येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे संपूर्ण गावात जयंतीचे उत्साही आणि प्रेरणादायी वातावरण अनुभवायला मिळाले.

या कार्यक्रमास मा. सोमिनाथ घोरपडे सर, बौद्धाचार्य चंद्रकांत मोहिते सर, शर्मिला रणवरे, विश्वास रणवरे, मा. उपसरपंच अमित रणवरे, अध्यक्ष सागर रणवरे तसेच भिमशक्ती तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहकार्य केले. तसेच विविध तरुण मंडळांनी ठिकठिकाणी जयंती मिरवणुकीचे जल्लोषात स्वागत करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

यावेळी मा. सोमिनाथ घोरपडे सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर सखोल व अभ्यासपूर्ण मांडणी करत उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. आपल्या व्याख्यानात त्यांनी बाबासाहेबांच्या बहुआयामी कार्याचा व्यापक आढावा घेतला. ते म्हणाले, “बाबासाहेबांनी केवळ एका समाजासाठी नव्हे, तर संपूर्ण देशाच्या उन्नतीसाठी कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची जाणीव ठेवून कृतज्ञता व्यक्त करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.”

औद्योगिक व आर्थिक क्षेत्रातील योगदान स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, सार्वजनिक क्षेत्राच्या विकासासाठी बाबासाहेबांनी दूरदृष्टीने दिशा दिली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांसारख्या संस्थांच्या उभारणीमागील विचार त्यांनी अधोरेखित केला. खाणी, विमा व पायाभूत उद्योगांच्या राष्ट्रीयीकरणाची संकल्पना मांडून देशाच्या आर्थिक प्रगतीचा पाया त्यांनी मजबूत केला.

जल व ऊर्जा क्षेत्रातील योगदानावर भाष्य करताना त्यांनी नमूद केले की, सेंट्रल वॉटर कमिशनसारख्या संस्थांची पायाभरणी बाबासाहेबांच्या विचारांतून झाली. दामोदर व हिराकूड प्रकल्पांसह केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या स्थापनेद्वारे राष्ट्रीय विद्युत ग्रीडची संकल्पना साकार झाली.

शेतकरी व कामगारांच्या हक्कांसाठीच्या लढ्याचा उल्लेख करताना त्यांनी १९३८ मधील खोतीप्रथा विरोधातील आंदोलन, “कसेल त्याची जमीन” ही भूमिका, तसेच कुळ कायदा आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे महत्त्व स्पष्ट केले. कामगार मंत्री म्हणून ८ तासांचा कामाचा दिवस, पगारी रजा, महागाई भत्ता आणि कामगार हक्कांचे संरक्षण यांसारखे ऐतिहासिक निर्णय बाबासाहेबांनी घेतले, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बौद्धाचार्य चंद्रकांत मोहिते यांनी केले. त्यांनी वंदना व सूत्रपठण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भिमशक्ती तरुण मंडळाचे कार्यकर्ते व गावातील नागरिकांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments