
माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; उद्योग, पर्यटन व कृषी क्षेत्राला मिळणार नवी उभारी
फलटण | प्रतिनिधी :- फलटण तालुक्याच्या विकासाला नवे पंख देणाऱ्या नियोजित विमानतळ प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फलटण दौऱ्यादरम्यान पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र विमान प्राधिकरणाचे अधिकारी कुणाल देसाई यांनी नियोजित फलटण विमानतळाचा सविस्तर आराखडा आणि प्रकल्पाचे सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर केले.
फलटणला हवाई वाहतूक व्यवस्थेशी जोडण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात असून, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या विमानतळाला मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात आले. विमानतळाच्या उभारणीसाठी आवश्यक नियोजन, पायाभूत सुविधा आणि पुढील कार्यवाहीचा आराखडा यावेळी सादर करण्यात आला.
या बैठकीस पंचायत राज व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार सचिन पाटील, आमदार धैर्यशील कदम, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते, सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत तसेच विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी विमानतळ प्रकल्पामुळे फलटणसह परिसरातील उद्योग, कृषी निर्यात, पर्यटन आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळणार असल्याचे सांगितले. या प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण व्हावीत यासाठी आवश्यक सर्व शासकीय परवानग्या आणि प्रशासकीय सहकार्य मिळावे, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी असलेल्या तळमळीचे कौतुक करत, फलटण विमानतळ प्रकल्पाला शासनाकडून आवश्यक ते सहकार्य दिले जाईल आणि फलटण लवकरच महाराष्ट्राच्या हवाई नकाशावर झळकेल, अशी ग्वाही दिली.
फलटण विमानतळ प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर या भागातील औद्योगिक विकास, कृषी उत्पादनांची निर्यात, पर्यटनवाढ आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळणार असून, फलटणच्या सर्वांगीण विकासासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
साहस Times न्यूज पोर्टल










