Tuesday, August 11, 2026
Homeदेश-विदेशनिवडून आलेल्या लोकांना माज आला असेल तर त्यांना जाणीव करून दिली पाहिजे"...

निवडून आलेल्या लोकांना माज आला असेल तर त्यांना जाणीव करून दिली पाहिजे” – मनोज जरांगे पाटील; दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला जंतर-मंतरवर ठाम पाठिंबा

साहस Times  | दिल्लीतील जंतर-मंतर येथे विविध शैक्षणिक प्रश्न, परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून ठाम पाठिंबा दिला. त्यांच्या उपस्थितीमुळे आंदोलनस्थळी मोठा उत्साह संचारला असून देशभरातून आलेल्या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत त्यांचे स्वागत केले.

यावेळी आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत, “निवडून आलेल्या लोकांना जर माज आला असेल तर त्यांना त्याची जाणीव करून दिली पाहिजे. लोकशाहीमध्ये जनता हीच सर्वात मोठी ताकद आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही,” असे स्पष्टपणे सांगितले.

त्यांनी पुढे सांगितले की, देशातील तरुणाई आपल्या भवितव्यासाठी रस्त्यावर उतरली आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न हे केवळ शिक्षणापुरते मर्यादित नसून देशाच्या भविष्यासंदर्भातील आहेत. त्यामुळे त्यांच्या आवाजाला दडपण्याऐवजी सरकारने सकारात्मक भूमिका घेत तातडीने संवाद साधावा.

जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनात विविध राज्यांतील विद्यार्थी, युवक संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, न्याय्य भरती, शैक्षणिक सुधारणांसह विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडले असून या आंदोलनाला अनेक सामाजिक आणि राजकीय नेत्यांनी पाठिंबा दर्शविला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमुळे आंदोलनकर्त्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यांच्या भाषणानंतर विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा देत लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला देशभरातून वाढता प्रतिसाद मिळत असल्याचेही यावेळी दिसून आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments