Tuesday, August 11, 2026
Homeदेश-विदेशसोनम वांगचुक यांच्या उपोषणाला सेलिब्रिटींचा भक्कम पाठिंबा; खालावलेल्या प्रकृतीबद्दल व्यक्त केली चिंता

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला सेलिब्रिटींचा भक्कम पाठिंबा; खालावलेल्या प्रकृतीबद्दल व्यक्त केली चिंता

नवी दिल्ली | प्रतिनिधी :-लडाखचे प्रसिद्ध अभियंता, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसुधारक सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या बेमुदत उपोषणामुळे त्यांच्या प्रकृतीची चिंता वाढली असून, देशभरातील अनेक नामवंत कलाकार आणि सेलिब्रिटींनी त्यांना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. शबाना आझमी, झीनत अमान, ओमी वैद्य, अनुराग कश्यप, दिया मिर्झा, अभय देओल आणि अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वांगचुक यांच्या आंदोलनाबाबत चिंता व्यक्त करत सरकारने त्यांच्याशी तातडीने संवाद साधावा, अशी मागणी केली आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी इन्स्टाग्रामवर वांगचुक यांचा उपोषणस्थळावरील फोटो शेअर करत भावनिक संदेश दिला. “देशाला तुमच्यासारख्या व्यक्तीची गरज आहे. तुम्ही अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहता. मात्र, हा लढा पुढे सुरू राहण्यासाठी तुमचे निरोगी राहणे तितकेच आवश्यक आहे. कृपया उपोषण मागे घ्या, आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत,” असे त्यांनी म्हटले.

अभिनेते अतुल कुलकर्णी यांनीही सोशल मीडिया पोस्टद्वारे वांगचुक यांच्या आंदोलनाला समर्थन देत तरुणांना प्रामाणिकपणा आणि करुणेच्या बळावर देश घडविण्याचे आवाहन केले. “उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. मला तरुणांकडून मोठ्या अपेक्षा आहेत,” असे त्यांनी आपल्या संदेशात नमूद केले.

अभिनेता अभय देओल यांनी वांगचुक यांचा व्हायरल फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत ‘ब्रोकन हार्ट’ इमोजीद्वारे त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली.

ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनीही सरकारला सोनम वांगचुक यांच्याशी शांततापूर्ण मार्गाने संवाद साधण्याचे आवाहन केले. त्यांनी इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये वांगचुक यांच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त करत त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याची गरज अधोरेखित केली. तसेच शिक्षण आणि समाजकारणातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाचाही गौरव केला.

‘३ इडियट्स’ चित्रपटातील ‘चतुर’ या भूमिकेमुळे प्रसिद्ध असलेले ओमी वैद्य यांनीही वांगचुक यांच्या समर्थनार्थ भावनिक व्हिडिओ शेअर केला. ‘फुंसुख वांगडू’ ही व्यक्तिरेखा प्रत्यक्षात सोनम वांगचुक यांच्या प्रेरणेवर आधारित असल्याची आठवण करून देत त्यांनी, “मला फुंसुख वांगडूचा मृत्यू नको आहे. मी सोनम वांगचुक यांना प्रत्यक्ष भेटलो आहे. ते अत्यंत नम्र, प्रेरणादायी आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व आहेत,” असे सांगत त्यांच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली.

दरम्यान, वांगचुक यांच्या उपोषणामुळे देशभरात चर्चेला उधाण आले असून, विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून सरकारने संवादाचा मार्ग स्वीकारून या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढावा, अशी मागणी अधिक जोर धरू लागली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments