पंढरपूरसाठी ‘चंद्रभागा एक्सप्रेस’ची मागणी; खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचा रेल्वेमंत्र्यांकडे सर्वंकष पाठपुरावा

0
1
पंढरपूरसाठी ‘चंद्रभागा एक्सप्रेस’ची मागणी; खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचा रेल्वेमंत्र्यांकडे सर्वंकष पाठपुरावा


४२ खासदारांच्या सह्यांसह केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन; पंढरपूर-देहू मेमू, नवीन स्थानके, किसान रेल्वे व प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती देण्याची मागणी

अकलूज | प्रतिनिधी :- पंढरपूर येथे आषाढी, कार्तिकी वारीसह वर्षभर दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकरी आणि भाविकांच्या प्रवासाची सोय अधिक सुलभ व्हावी, यासाठी दादर-पंढरपूर-दादर दररोज धावणारी रेल्वे सेवा सुरू करून तिला “चंद्रभागा एक्सप्रेस” असे नाव देण्यात यावे, तसेच पंढरपूर-देहू मेमू रेल्वे सेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली.

या मागणीला अधिक बळ मिळावे म्हणून महाराष्ट्रातील विविध पक्षांच्या ४२ खासदारांच्या सह्यांसह सविस्तर निवेदन रेल्वेमंत्र्यांना सादर करण्यात आले. यावेळी सोलापूर जिल्हा आणि परिसरातील रेल्वे विकासाशी संबंधित अनेक प्रलंबित प्रश्नांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.

खासदार मोहिते-पाटील यांनी पंढरपूर-लोणंद रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षण व भूमी अधिग्रहण प्रक्रियेला गती देण्यासाठी वरिष्ठ स्तरावरील तातडीची बैठक आयोजित करावी, अशी मागणी केली. तसेच माढा तालुक्यातील मोडनिंब येथे ‘गतीशक्ती मल्टी-मॉडेल कार्गो टर्मिनल’ (GCT) उभारणीचे काम त्वरित सुरू करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरलेली आणि सध्या बंद असलेली दिल्ली-कोलकत्ता-मुजफ्फरनगर-शालिमार किसान रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्याचीही त्यांनी विनंती केली. यामुळे कृषी मालाची वाहतूक अधिक सुलभ होऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे त्यांनी सांगितले.

याशिवाय लातूर-कुडूवाडी-सोलापूर तसेच मिरज-कुडूवाडी-दौंड कॉर्ड लाईन प्रकल्पांना गती देण्याची मागणी करण्यात आली. मिरज-कुडूवाडी-लातूर रोड या सुमारे ३७५ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी आवश्यक जमीन अधिग्रहण तातडीने पूर्ण करून कामाला वेग देण्याचीही मागणी करण्यात आली.

वारकऱ्यांची वाढती संख्या आणि सोलापूर रेल्वे विभागातील वाढती प्रवासी वाहतूक लक्षात घेऊन सांगोला तालुक्यातील जवळा व बामणी, पंढरपूर तालुक्यातील बाभुळगाव तसेच माढा तालुक्यातील म्हैसगाव व लऊळ येथे नवीन रेल्वे स्थानके मंजूर करावीत, अशी मागणीही करण्यात आली.

तसेच कुडूवाडी-पंढरपूर मार्गावरील वापरात नसलेल्या जुन्या मीटरगेज रेल्वेमार्गालगतची रिक्त जमीन विकासासाठी वापरून व्यापारी संकुले उभारण्याचा प्रस्ताव देखील रेल्वेमंत्र्यांसमोर मांडण्यात आला.

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मांडलेल्या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्याची माहिती देण्यात आली.