Tuesday, August 11, 2026
Homeफलटणआषाढी पौर्णिमा त्याग, प्रज्ञा आणि मानवकल्याणाची प्रेरणा देणारी : आयु. सोमीनाथ घोरपडे

आषाढी पौर्णिमा त्याग, प्रज्ञा आणि मानवकल्याणाची प्रेरणा देणारी : आयु. सोमीनाथ घोरपडे

विडणी येथे वर्षावास मालिकेतील प्रथम धम्मदेसना उत्साहात; अक्षय जगताप यांचा सत्कार

विडणी : आषाढी पौर्णिमा ही केवळ धार्मिक तिथी नसून तथागत भगवान बुद्धांच्या जीवनातील गर्भमंगल दिन, महाभिनिष्क्रमण, धम्मचक्र प्रवर्तन आणि वर्षावास या चार महान घटनांची स्मृती जागविणारा ऐतिहासिक व प्रेरणादायी दिवस आहे. या दिवसातून त्याग, शांतता, प्रज्ञा, करुणा, समता आणि मानवकल्याणाची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा पूर्व शाखेचे संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे यांनी केले.

मौजे विडणी येथे आषाढी पौर्णिमेनिमित्त वर्षावास मालिकेतील प्रथम धम्मदेसनेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘आषाढी पौर्णिमेचे महत्त्व : गर्भमंगल दिन, महाभिनिष्क्रमण, धम्मचक्र प्रवर्तन आणि वर्षावास’ या विषयावर आयु. सोमीनाथ घोरपडे यांनी सविस्तर धम्मदेसना दिली.
आपल्या प्रवचनात त्यांनी आषाढी पौर्णिमेच्या विविध ऐतिहासिक संदर्भांवर प्रकाश टाकला. राणी महामायांना पडलेले स्वप्न व त्यातून सिद्धार्थ गौतमांच्या आगमनाची झालेली मंगल चाहूल, सिद्धार्थ गौतमांनी रोहिणी नदीच्या पाणीवाटपाच्या प्रश्नावर युद्धाला विरोध करून शांततामय मार्गाचा आग्रह धरला आणि मानवाच्या दुःखाचे मूळ शोधण्यासाठी केलेले महाभिनिष्क्रमण, याबाबत त्यांनी विवेचन केले.

सिद्धार्थ गौतमांनी आलार कालाम व उद्दक रामपुत्र यांच्याकडून साधना केली. त्यानंतर कठोर तपश्चर्येचा त्याग करून मध्यम मार्ग स्वीकारला आणि बोधगया येथे सम्यक संबोधी प्राप्त केली. पुढे सारनाथ येथील ऋषिपतन, मृगदाव येथे पंचवर्गीय परिव्राजकांना धम्मचक्कप्पवत्तन सुत्ताच्या माध्यमातून पहिले धम्मप्रवचन दिले. याच धम्मदेसनेतून चार आर्यसत्ये आणि आर्य अष्टांगिक मार्गाचा मानवकल्याणकारी संदेश जगासमोर आला, असे त्यांनी सांगितले.
“भगवान बुद्धांचा धम्म हा अतिरेकाचा नव्हे, तर विवेक, संतुलन आणि प्रज्ञेचा मार्ग आहे. धम्म केवळ ऐकण्यापुरता मर्यादित न ठेवता तो आपल्या विचारात, वाणीमध्ये आणि कृतीमध्ये उतरला पाहिजे,” असे आवाहन आयु. घोरपडे यांनी केले.

वर्षावासाचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, वर्षावास म्हणजे केवळ तीन महिने एका ठिकाणी राहण्याचा काळ नसून धम्माचा अभ्यास, चिंतन, साधना आणि आत्मपरीक्षणाचा काळ आहे. बाहेर पडणाऱ्या पावसामुळे जशी कोरडी जमीन हिरवीगार होते, त्याचप्रमाणे धम्माचा वर्षाव आपल्या मनावर होऊन त्यातून करुणा, मैत्री, प्रज्ञा, समता आणि विवेक विकसित झाला पाहिजे. राग, द्वेष, अहंकार, लोभ, मत्सर आणि तृष्णा यांचे आत्मपरीक्षण करून धम्म आचरणात आणण्याचा संकल्प या वर्षावासात करावा, असे त्यांनी सांगितले.

यावेळी संघमित्र तरुण मंडळाचे कैलास जगताप यांनी बुद्ध विहाराच्या स्वच्छतेबरोबरच धम्माचे सातत्यपूर्ण आचरण व धम्मकार्य अधिक प्रभावीपणे करण्याची गरज व्यक्त केली. भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी यासाठी सातत्याने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
त्यावर भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष आयु. महावीर भालेराव यांनी प्रतिक्रिया देताना, येत्या काळात तालुक्यातील प्रत्येक गावात बुद्धमूर्तीच्या परिसराची स्वच्छता व देखभाल तसेच धम्मकार्याला चालना देण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले.यावेळी अभिजीत जगताप यांनी अक्षय जगताप यांच्या प्रयत्नाबद्दल व त्यांनी घेतलेल्या मेहनती बद्दल माहिती दिली व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष आयु. महावीर भालेराव,  माजी कोषाध्यक्ष आयु विठ्ठल निकाळजे सर माजी सरचिटणीस आयु  बाबासाहेब जगताप, माजी संस्कार उपाध्यक्ष आयु. बजरंग गायकवाड, माजी प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष आयु. रामचंद्र मोरे, माजी पदाधिकारी आयु. राजेंद्रकुमार गायकवाड, संघटक आयु. आनंद जगताप, सामाजिक कार्यकर्ते कैलास जगताप, अभिजीत जगताप, विशाल जगताप, प्रेम जगताप, पत्रकार योगेश निकाळजे, भिवा जगताप सर व सर्व संघमित्र तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी धम्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात त्रिसरण, पंचशील, बुद्धपूजा, भीमस्मरण व भीमस्मृतीने झाली. कार्यक्रमाचे विहारातील सूत्रसंचालन प्रमोद जगताप यांनी केले तर बाहेरील सुचसंचालन आयु. बाबासाहेब जगताप यांनी केले.

आयु. अक्षय जगताप यांचा सत्कार
महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या लिपिक पदाच्या परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल आयु. अक्षय संजय जगताप यांचा भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पूर्व शाखा, संघमित्र तरुण मंडळ आणि भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुका शाखेच्या माजी कार्यकारिणीच्या वतीने शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी भगवान बुद्धांचा मध्यम मार्ग जीवनाचा मार्ग बनविणे, चार आर्यसत्यांच्या प्रकाशात जीवनाचे चिंतन करणे आणि आर्य अष्टांगिक मार्गाच्या आधारे वैयक्तिक तसेच सामाजिक जीवन घडविण्याचा संदेश देण्यात आला. “धम्म ऐकू, धम्म समजून घेऊ आणि धम्म आचरणात आणू,” या संकल्पाने वर्षावासाच्या पुढील धम्मकार्याला सुरुवात करण्याचे आवाहन करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments