
पत्रकारांना_धमकी : मुख्यमंत्री फडणवीस आता खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कारवाई करणार का?
मुंबई | प्रतिनिधी :-शिवसेना खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना वापरलेली आक्रमक भाषा आणि पत्रकारांना दिल्याचा आरोप असलेली मारहाणीची धमकी यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या घटनेनंतर पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांवर हल्ला करणे, धमकावणे किंवा त्यांच्या कामात अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा दिला होता. पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांच्यावर होणारे हल्ले म्हणजे लोकशाहीवरील हल्ले असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
अशा पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना धमकी दिल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजकीय व पत्रकारिता क्षेत्रात अशी चर्चा सुरू आहे की, मुख्यमंत्री यांनी दिलेला कठोर इशारा सर्वांसाठी समान आहे का, की सत्ताधारी पक्षातील लोकांनाही त्याच निकषांवर कारवाईला सामोरे जावे लागेल? यामुळे आता मुख्यमंत्री फडणवीस पत्रकारांना धमकी दिल्याच्या आरोपांप्रकरणी संजय दिना पाटील यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी पत्रकार संघटना आणि विविध स्तरांतून होत आहे. या घटनेवर राज्य सरकार कोणती भूमिका घेते, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.










