Wednesday, August 12, 2026
Homeफलटणराजर्षी शाहू छत्रपतींनी घडवली स्वाभिमानी इंदुमतीराणी; सासरा-सुनेच्या नात्याला दिला पित्याच्या प्रेमाचा स्पर्श

राजर्षी शाहू छत्रपतींनी घडवली स्वाभिमानी इंदुमतीराणी; सासरा-सुनेच्या नात्याला दिला पित्याच्या प्रेमाचा स्पर्श

राजर्षी शाहू छत्रपतींनी घडवली स्वाभिमानी इंदुमतीराणी; सासरा-सुनेच्या नात्याला दिला पित्याच्या प्रेमाचा स्पर्श

कोल्हापूर | प्रतिनिधी : राजर्षी शाहू छत्रपती महाराज हे सामाजिक न्याय, शिक्षण आणि स्त्रीसक्षमीकरणाचे प्रणेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या जीवनातील अनेक कार्यांपैकी एक प्रेरणादायी अध्याय म्हणजे त्यांच्या स्नुषा इंदुमतीराणीसाहेब यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्याचा. हे नाते केवळ सासरा-सुनेचे नव्हते, तर एका वडिलांनी आपल्या मुलीचे आयुष्य नव्याने उभे केल्याची प्रेरणादायी कहाणी होती.

सासवड येथील शंकरराव जगताप यांच्या कन्या जमना हिची बुद्धिमत्ता आणि गुण ओळखून शाहू महाराजांनी तिची निवड आपल्या द्वितीय पुत्र प्रिन्स शिवाजी यांच्यासाठी केली. विवाहानंतर तिचे नाव ‘इंदुमती’ ठेवण्यात आले. मात्र, विवाहानंतर अवघ्या वर्षभरातच शिकारीदरम्यान प्रिन्स शिवाजी यांचे अपघाती निधन झाले आणि अल्पवयीन इंदुमतीराणींवर वैधव्याचे दुःख कोसळले.

त्या काळातील सामाजिक प्रथेनुसार त्यांचे आयुष्य चार भिंतीतच बंदिस्त झाले असते; परंतु समाजसुधारक शाहू महाराजांनी हा अन्याय स्वीकारला नाही. त्यांनी इंदुमतीराणींना शिक्षण देण्याचा धाडसी निर्णय घेतला. अंतःपुरातून विरोध झाला, तरी महाराज आपल्या निर्णयावर ठाम राहिले.

सोनतळी कॅम्प येथे त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली. शिक्षणाबरोबरच घोडेस्वारी, रथ चालविणे, बंदूक हाताळणे, शिकार आणि मोटार ड्रायव्हिंग यांसारख्या कौशल्यांचेही प्रशिक्षण त्यांनी दिले. इंदुमतीराणीसाहेब या सर्व क्षेत्रांत पारंगत झाल्या. त्यांनी ‘दुःशिला’ नावाची वाघीणही पाळली होती, ज्याची त्या काळी देश-विदेशातही चर्चा झाली होती.

शाहू महाराज त्यांना आपल्या मुलीप्रमाणेच जपत होते. इंदुमतीराणींनीही महाराजांप्रती अपार कृतज्ञता व्यक्त केली. एका पत्रात त्यांनी लिहिले होते, “आबा, आपणच मला या सुमार्गाला लाविले. माझ्या प्रत्येक यशाचे श्रेय आपल्यालाच आहे.”

शाहू महाराजांची इच्छा इंदुमतीराणींनी डॉक्टर बनून रयतेची सेवा करावी अशी होती. त्यासाठी त्यांनी त्यांना दिल्लीतील मेडिकल कॉलेजमध्येही नेले होते. मात्र, महाराजांच्या अकाली निधनामुळे ही इच्छा अपुरी राहिली. तरीही इंदुमतीराणींनी शिक्षणाचा ध्यास सोडला नाही. १९२५ मध्ये त्यांनी मॅट्रिक परीक्षेत कोल्हापूर केंद्रातून द्वितीय क्रमांक मिळविला.

त्यांना वाचनाची विलक्षण आवड होती. विज्ञान, इतिहास, भूगोल, साहित्य, प्रवास, शिकार आणि आध्यात्मिक विषयांवरील समृद्ध ग्रंथसंग्रह त्यांनी उभारला होता.

पुढे शाहू महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी स्त्री शिक्षणासाठी ‘ललिताविहार’ संस्था सुरू केली. तसेच ‘शांतादेवी गायकवाड गृहशिक्षण संस्था’ स्थापन करून महिलांना गृहशास्त्र व स्वावलंबनाचे शिक्षण उपलब्ध करून दिले.

राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी इंदुमतीराणीसाहेबांना केवळ आधारच दिला नाही, तर त्यांना स्वाभिमानी, शिक्षित, सक्षम आणि समाजाभिमुख स्त्री म्हणून घडविले. सासरा-सुनेच्या नात्याला पित्याच्या प्रेमाची आणि स्त्रीसक्षमीकरणाची दिशा देणारे हे उदाहरण आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments