Sunday, September 13, 2026
Homeसातारा१६ जानेवारी – छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन : शौर्य, विद्वत्ता आणि...

१६ जानेवारी – छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन : शौर्य, विद्वत्ता आणि स्वराज्यनिष्ठेचा तेजस्वी अध्याय


साहस Times :-  १६ जानेवारी हा दिवस मराठा साम्राज्याच्या इतिहासात अत्यंत गौरवशाली मानला जातो. या दिवशी, इ.स. १६८१ साली रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांचा विधीवत राज्याभिषेक झाला. या राज्याभिषेक दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात तसेच देशभरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर येथे झाला. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र असून, शौर्य, साहस, बुद्धिमत्ता आणि विद्वत्तेचे प्रतीक होते. संस्कृतसह १३ भाषांचे ज्ञान असलेले संभाजी महाराज उत्कृष्ट राजकारणी, कुशल सेनानी आणि प्रतिभावंत साहित्यिक होते.
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापर्यंत संभाजी महाराज राजकारणात व रणांगणात पूर्णतः परिपक्व झाले होते. मात्र दरबारी कारस्थानांमुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. कोकणातील शृंगारपूरची सुभेदारी, धर्मकार्यातील योगदान, संत-महात्म्यांप्रती असलेली निष्ठा आणि सक्तीच्या धर्मांतराविरोधातील ठाम भूमिका यातून त्यांचा कणखर स्वभाव दिसून येतो.
३ एप्रिल १६८० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्यात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले. या कठीण काळात, अनेक अडथळे पार करत संभाजी महाराजांनी २० जुलै १६८० रोजी सत्ता हाती घेतली. अखेर १६ जानेवारी १६८१ रोजी रायगडावर त्यांचा विधीवत राज्याभिषेक पार पडला आणि ते मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती बनले.
राज्याभिषेकानंतर त्यांनी अष्टप्रधान मंडळाची पुनर्रचना केली, कैद्यांना मुक्त केले आणि स्वराज्याची व्यवस्था पूर्वीप्रमाणेच चालू राहील, अशी हमी जनतेला दिली. त्यांच्या नावाची नाणी पाडण्यात आली तसेच स्वतंत्र राजमुद्राही वापरण्यात आली.
राज्याभिषेकानंतर अवघ्या काही दिवसांतच संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूरवर धडक मोहीम राबवून प्रचंड संपत्ती हस्तगत केली. या घटनेमुळे औरंगजेब संतप्त झाला आणि त्याने स्वतः मराठ्यांविरुद्ध मोहीम उघडली. अफाट मोगली सैन्याशी सामना करताना संभाजी महाराजांनी असामान्य धैर्य, युद्धकौशल्य आणि नेतृत्वगुण दाखवले. पोर्तुगीज, सिद्दी, म्हैसूरचा राजा यांसारख्या शत्रूंनाही त्यांनी रोखले.
संभाजी महाराज केवळ पराक्रमी योद्धेच नव्हे तर उत्तम साहित्यिकही होते. बुधभूषण, नायिकाभेद, नखशिख आणि सातसतक हे ग्रंथ त्यांच्या विद्वत्तेची साक्ष देतात. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी सुमारे १२० लढाया केल्या असून, एकाही लढाईत ते पराभूत झाले नाहीत.
असा हा पराक्रम, त्याग आणि स्वराज्यनिष्ठेचा तेजस्वी अध्याय असलेला १६ जानेवारी – छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन मराठा इतिहासात सदैव गौरवाने स्मरणात राहील. या पावन दिनानिमित्त छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार अभिवादन.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments