आषाढी पौर्णिमेचे महत्त्व : गर्भमंगल दिन, महाभिनिष्क्रमण, धम्मचक्र प्रवर्तन आणि वर्षावास

0
4
आषाढी पौर्णिमेचे महत्त्व : गर्भमंगल दिन, महाभिनिष्क्रमण, धम्मचक्र प्रवर्तन आणि वर्षावास

वर्षावास मालिकेतील प्रथम धम्मदेसना
आयु.सोमीनाथ घोरपडे
आषाढी पौर्णिमेचे महत्त्व : गर्भमंगल दिन, महाभिनिष्क्रमण, धम्मचक्र प्रवर्तन आणि वर्षावास

नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासंबुद्धस्स।
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासंबुद्धस्स।
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासंबुद्धस्स।

साहस Times : महाकारुणिक, जगद्गुरु तथागत भगवान गौतम बुद्ध, प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक आणि भारतरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना त्रिवार वंदन! भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष, चैत्यभूमीचे शिल्पकार, बौद्धाचार्यांचे जनक सूर्यपुत्र यशवंतराव उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षिका ममतासागर महापासिका मीराताई आंबेडकर, समता सैनिक दलाचे प्रमुख तथा भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर आणि संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय अॅड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या धम्ममंगल कार्यास वंदन!
पूजनीय भिक्खुसंघ, उपासक-उपासिका, उपस्थित सर्व मान्यवर, बालक-बालिका आणि धम्मप्रेमी सज्जनहो, आपल्या सर्वांना माझा सविनय जयभीम! नमो बुद्धाय!
आजच्या वर्षावास मालिकेतील प्रथम धम्मदेसनेचा विषय आहे- “आषाढी पौर्णिमेचे महत्त्व : गर्भमंगल दिन, महाभिनिष्क्रमण, धम्मचक्र प्रवर्तन आणि वर्षावास.”

बौद्ध धम्मात पौर्णिमेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. तथागत भगवान बुद्धांच्या जीवनातील अनेक मंगल, ऐतिहासिक आणि मानवजातीच्या कल्याणाशी संबंधित घटना पौर्णिमेच्या दिवशी घडल्या आहेत. त्यामध्ये आषाढी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या एका पौर्णिमेशी भगवान बुद्धांच्या जीवनातील चार महान घटनांची परंपरा जोडली जाते- महामायेला गर्भधारणा होणे, सिद्धार्थ गौतमांचे महाभिनिष्क्रमण, सारनाथ येथे भगवान बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तित करणे आणि वर्षावासाची सुरुवात. म्हणून आषाढी पौर्णिमा ही केवळ एक धार्मिक तिथी नसून बौद्ध धम्माच्या इतिहासातील अत्यंत पवित्र, प्रेरणादायी आणि मानवकल्याणाच्या महान प्रवासाची स्मृती जपणारी पौर्णिमा आहे.
आषाढ पौर्णिमा, धम्मचक्र प्रवर्तन आणि वर्षावासाची गौरवशाली परंपरा
बौद्ध संस्कृतीमध्ये आषाढ पौर्णिमा हा अत्यंत पवित्र, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी दिवस मानला जातो. भगवान तथागत बुद्धांनी बोधगया येथे सम्यक संबोधी प्राप्त केल्यानंतर सारनाथच्या ऋषिपत्तन (मृगदाव) येथे आपल्या पूर्वसहकारी पंचवर्गीय परिव्राजक कौंडीण्य, वप्प, भद्दीय, अस्सजीत, महानाम यांना धम्मचक्कप्पवत्तन सुत्त या स्वरूपात धम्माचे पहिले प्रवचन दिले. या ऐतिहासिक घटनेला धम्मचक्र प्रवर्तन असे संबोधले जाते. याच दिवशी बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांच्या परंपरेचा प्रारंभ झाला आणि मानवजातीला दुःखमुक्ती, प्रज्ञा, करुणा, मैत्री व समतेचा सनातन मार्ग प्राप्त झाला.
भगवान बुद्धांनी प्रथमच मानवी जीवनातील दुःख, त्याची कारणे, त्यावरील उपाय आणि दुःखनिरोधाकडे नेणारा आर्य अष्टांगिक मार्ग अत्यंत तर्कसंगत, अनुभवाधिष्ठित आणि वैज्ञानिक पद्धतीने स्पष्ट केला. निर्वाण ही कोणतीही गूढ किंवा अलौकिक अवस्था नसून लोभ, द्वेष आणि मोह यांच्या पूर्ण क्षयातून प्राप्त होणारी परमशांती आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले. मानवी कल्याण, नैतिकता, विवेक, आत्मसंयमन, प्रज्ञा आणि करुणा यांवर आधारलेली ही शिकवण जगाच्या इतिहासातील वैचारिक क्रांती मानली जाते. म्हणूनच भगवान बुद्धांना ‘जगतगुरू’ म्हणून सर्वोच्च मान प्राप्त झाला आहे.
आषाढ पौर्णिमेच्या या पवित्र दिवशी भगवान बुद्धांनी धम्मचक्र गतिमान करून मानवजातीच्या मुक्तीचा मार्ग खुला केला. त्यामुळे हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. बुद्ध हेच खरे आद्य गुरु असल्याने हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो. याच दिवशी भगवान बुद्धांनी भिक्खुसंघासाठी वर्षावासाची परंपरा निश्चित केली. आषाढ पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंतच्या तीन महिन्यांच्या वर्षाकाळात भिक्खूंनी एका ठिकाणी राहून धम्माचा अभ्यास, साधना, चिंतन आणि लोकांना धम्मोपदेश करावा, असा विनय नियम त्यांनी निर्धारित केला. वर्षावासामुळे धम्माचा अभ्यास अधिक सखोल झाला, संघाची शिस्त दृढ झाली आणि समाजामध्ये नैतिक मूल्यांचा व्यापक प्रसार झाला.
या महान परंपरेचा वारसा जपत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने देशभरात आषाढ पौर्णिमेनिमित्त वर्षावास प्रवचनमालांचे आयोजन केले जाते. भिक्खुसंघ, केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य आणि धम्मप्रचारक यांच्या माध्यमातून भगवान बुद्धांचा तर्कनिष्ठ, विज्ञाननिष्ठ आणि मानवतावादी धम्म समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य सातत्याने केले जाते. या वर्षावास काळात धम्म, विनय, सुत्त, त्रिपिटक, पंचशील, अष्टांगिक मार्ग, प्रतीत्यसमुत्पाद, चार आर्यसत्ये आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतिपादित नवयान बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करून वैयक्तिक आणि सामाजिक परिवर्तनाचा संकल्प करूया.
गर्भमंगल दिन
इ.स.पूर्व ५६३ च्या सुमारास कपिलवस्तूचे राज्य शाक्यकुलातील राजा शुद्धोदन यांच्या अधिपत्याखाली होते. राजा शुद्धोदन अत्यंत संपन्न आणि वैभवशाली होते. त्यांच्याकडे राजवाडे, महाल, सेवक-चाकर आणि मोठ्या प्रमाणावर संपत्ती होती. त्या काळातील परंपरेनुसार राजा स्वतः शेतात जाऊन शेतीच्या कामात सहभागी होत असे. राजा शुद्धोदन यांच्या दोन राण्या होत्या- पहिल्या महामाया आणि महाप्रजापती गौतमी. सिद्धार्थाच्या जन्मानंतर सहा दिवसांनी मरण पावल्यानंतर . सिद्धार्थाची मावशी महाप्रजापती गौतमी यांच्याशी विवाह केला. राजा शुद्धोदन व महामाया यांना अनेक वर्षे अपत्यप्राप्ती झालेली नव्हती. राजघराण्यातील ही एक मोठी उणीव मानली जात होती.
आषाढी पौर्णिमेच्या निमित्ताने कपिलवस्तूमध्ये मोठा उत्सव साजरा करण्यात आला. राजवाडा स्वच्छ करण्यात आला. गोडधोड पदार्थ तयार करण्यात आले. गरीब, गरजू आणि भिक्षूंना दानधर्म करण्यात आला. संपूर्ण राजवाड्यात आणि नगरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्या रात्री राणी महामाया निद्रिस्त झाल्या असताना त्यांना एक अद्भुत स्वप्न पडले. चार देवगणांनी त्यांचा पलंग उचलून हिमालयाच्या प्रदेशात एका विशाल शालवृक्षाखाली नेऊन ठेवला. त्यानंतर देवांगनांनी त्यांना मानससरोवरात स्नान घातले, सुगंधी द्रव्यांनी अभ्यंग केला आणि सुंदर वस्त्रे व अलंकारांनी सजविले. तेवढ्यात सुमेध नावाचा बोधिसत्त्व पांढऱ्या हत्तीच्या रूपात त्यांच्या समोर आला. त्याच्या सोंडेत शुभ्र कमळ होते. त्याने जणू राणी महामायांना संदेश दिला-“माते, मी माझा अंतिम जन्म घेण्यासाठी तुझ्या कुशीत येणार आहे.” त्यानंतर तो बोधिसत्त्व त्यांच्या शरीरात विलीन झाला आणि राणी महामाया जाग्या झाल्या.
या स्वप्नाचा अर्थ राणी महामायांना समजला नाही. त्यांनी राजा शुद्धोदनांना स्वप्नाची माहिती दिली. राजा शुद्धोदनांनी स्वप्नविद्येत पारंगत असलेल्या विद्वानांना बोलावले. त्यांनी स्वप्नाचा अर्थ सांगितला- “राजन्, राणी महामाया पुत्राला जन्म देतील. हा पुत्र भविष्यात चक्रवर्ती सम्राट होईल किंवा संसाराचा त्याग करून महान बुद्ध बनेल.” पुढे इतिहासाने या भविष्यवाणीची सत्यता सिद्ध केली. राणी महामायांच्या पोटी सिद्धार्थ गौतमांचा जन्म झाला आणि त्यांनी संपूर्ण मानवजातीला दुःखमुक्तीचा मार्ग दाखविला. म्हणून आषाढी पौर्णिमेला गर्भमंगल दिन म्हणूनही स्मरण केले जाते. ही पौर्णिमा मानवजातीच्या कल्याणासाठी जन्म घेणाऱ्या महामानवाच्या आगमनाची मंगल चाहूल देणारी पौर्णिमा आहे.
महाभिनिष्क्रमण : शांततेच्या मार्गासाठी केलेला महान त्याग
आषाढी पौर्णिमेचे दुसरे महत्त्व म्हणजे सिद्धार्थ गौतमांचे महाभिनिष्क्रमण. राजकुमार सिद्धार्थ राजवैभवात वाढले होते. त्यांच्या जीवनात संपत्ती, सुखसोयी, राजवाडे आणि ऐश्वर्याची कोणतीही कमतरता नव्हती. त्यांच्या जीवनात पत्नी यशोधरा आणि पुत्र राहुल होते. परंतु मानवी जीवनातील दुःखाचा प्रश्न त्यांच्या मनाला सतत अस्वस्थ करीत होता. जन्म, जरा, व्याधी आणि मृत्यू या जीवनाच्या वास्तवाने त्यांच्या मनात गंभीर चिंतन निर्माण झाले होते.
याच काळात शाक्य आणि कोलीय या दोन गणराज्यांमध्ये रोहिणी नदीच्या पाण्याच्या वाटपावरून गंभीर वाद निर्माण झाला. हा वाद वाढत गेला आणि शाक्य संघाने कोलीयांविरुद्ध युद्ध करण्याचा निर्णय घेतला. सिद्धार्थ गौतमांनी या निर्णयाला ठाम विरोध केला. त्यांनी युद्धाऐवजी संवाद, चर्चा आणि शांततापूर्ण मार्गाने प्रश्न सोडविण्याचा आग्रह धरला. त्यांनी दोन्ही बाजूंनी प्रतिनिधी निवडून समिती स्थापन करावी आणि त्या समितीने हा वाद सोडवावा, असा प्रस्ताव मांडला. परंतु त्यांच्या प्रस्तावाला संघाचा पाठिंबा मिळाला नाही.
संघाच्या निर्णयाविरुद्ध जाणाऱ्या सदस्यासाठी कठोर शिक्षा होती. सिद्धार्थ गौतमांसमोर देहदंड, कुटुंबाची संपत्ती जप्त करणे, कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकणे किंवा सैन्यात भरती होऊन युद्ध करणे असे पर्याय ठेवण्यात आले. सिद्धार्थ गौतमांनी अत्यंत विवेकाने विचार केला. त्यांनी संघाला सांगितले- “माझ्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला असेल तर शिक्षा मला द्या. माझ्या कुटुंबाची संपत्ती जप्त करू नका. त्यांच्या उपजीविकेचे साधन हिरावून घेऊ नका. माझ्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकू नका; कारण ते निरपराध आहेत.” शेवटी त्यांनी स्वतःच परिव्राजक होऊन देशत्याग करण्याचा निर्णय घेतला.
सिद्धार्थ गौतमांनी युद्धात सहभागी होण्याऐवजी सत्यशोधक जीवन स्वीकारले. राजवैभव, संपत्ती, कुटुंब आणि सुखसोयींचा त्याग करून ते मानवाच्या दुःखाचे मूळ शोधण्यासाठी निघाले. हा गृहत्याग पलायन नव्हता. हा पराभव नव्हता. हा संपूर्ण मानवजातीच्या दुःखनिवारणासाठी केलेला महान त्याग होता. म्हणून सिद्धार्थ गौतमांच्या या त्यागाला महाभिनिष्क्रमण असे म्हणतात. आषाढी पौर्णिमा आपल्याला या महाभिनिष्क्रमणाची आठवण करून देते आणि त्याग, अहिंसा, विवेक, शांतता आणि मानवकल्याणासाठी जीवन अर्पण करण्याची प्रेरणा देते.आपला सेवक छन्न आणि कंथक हा विश्वासू आणि प्रिय घोडा यांच्यासह कपिलवस्तू बाहेर पडले व अनोमा नदी काठावर आपली वस्त्रे,अलंकार यांचा त्याग करून सत्याच्या शोधासाठी ते परिव्राजक म्हणून नव्या जीवनाची सुरवात त्यांनी केली.
सम्यक संबोधी आणि धम्मचक्र प्रवर्तन
महाभिनिष्क्रमणानंतर सिद्धार्थ गौतमांनी सत्याच्या शोधासाठी विविध आचार्यांकडून ज्ञान प्राप्त केले. त्यांनी आलार कालाम आणि उद्दक रामपुत्र यांच्याकडे साधना केली. त्यानंतर उरुवेला येथे सहा वर्षे कठोर तपश्चर्या केली. परंतु शरीराला अनावश्यक क्लेश देऊन सत्याची प्राप्ती होत नाही, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी अतिरेकाचा त्याग केला आणि मध्यम मार्गाचा स्वीकार केला. इ.स.पूर्व ५२८ मध्ये वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बोधगया येथे बोधिवृक्षाखाली त्यांना सम्यक संबोधी प्राप्त झाली आणि सिद्धार्थ गौतम भगवान बुद्ध झाले.
संबोधी प्राप्तीनंतर भगवान बुद्धांनी तात्काळ धम्मोपदेश सुरू केला नाही. त्यांनी प्राप्त झालेल्या ज्ञानाचे चिंतन केले. त्यांनी अनुभवलेला धम्म अत्यंत सूक्ष्म, गहन आणि प्रज्ञेने जाणण्यासारखा होता. सामान्य लोकांना हा धम्म समजेल का, असा विचार त्यांच्या मनात आला. परंतु अपरंपार करुणेने प्रेरित होऊन त्यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी धम्माचा उपदेश करण्याचा निर्णय घेतला. प्रथम त्यांनी आपले पूर्वीचे गुरु आलार कालाम आणि उद्दक रामपुत्र यांना धम्म सांगण्याचा विचार केला; परंतु ते दोघेही निधन पावले असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी पूर्वी आपली सेवा करणाऱ्या पंचवर्गीय परिव्राजकांना धम्म सांगण्याचा निर्णय घेतला. कौंडिण्य, वप्प, भद्दीय, महानाम आणि अश्वजित हे ते पाच परिव्राजक होते.
भगवान बुद्ध बोधगयेहून सारनाथच्या दिशेने निघाले. अखेर ते सारनाथ येथील ऋषिपतन, मृगदाव येथे पोहोचले. सुरुवातीला पंचवर्गीय परिव्राजकांनी त्यांचा आदर न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु भगवान बुद्ध जवळ येताच त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील तेज, शांतता आणि करुणा पाहून त्यांचा दृष्टिकोन बदलला. त्यांनी भगवान बुद्धांचे स्वागत केले. आषाढी पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धांनी पंचवर्गीय परिव्राजकांना आपले पहिले प्रवचन दिले. हे प्रवचन धम्मचक्कप्पवत्तन सुत्त या नावाने प्रसिद्ध आहे. याच दिवशी भगवान बुद्धांनी जगात प्रथमच धम्मचक्र प्रवर्तित केले. कौंडिण्यांना धम्माचा साक्षात्कार झाला आणि पुढे भिक्खू संघाची स्थापना झाली. त्यामुळे आषाढी पौर्णिमा ही धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि संघस्थापना दिन म्हणूनही अत्यंत महत्त्वाची आहे.
भगवान बुद्धांनी आपल्या पहिल्या धम्मोपदेशात मानवजातीसमोर मध्यम मार्ग, चार आर्यसत्ये आणि आर्य अष्टांगिक मार्ग मांडला. भगवान बुद्धांचा धम्म हा कोणत्याही प्रकारच्या अतिरेकाचा धम्म नाही. तो विवेकाचा, संतुलनाचा आणि प्रज्ञेचा धम्म आहे. त्यांनी दोन टोकांचा त्याग करण्याचा उपदेश केला- एक म्हणजे कामसुखात अतिरेकी रमणे आणि दुसरे म्हणजे शरीराला अनावश्यक क्लेश देणारी कठोर तपश्चर्या. या दोन्ही टोकांचा त्याग करून मध्यम मार्ग स्वीकारणे, हाच भगवान बुद्धांचा संदेश आहे.
मध्यम मार्गाचे सुंदर उदाहरण भगवान बुद्धांनी सोण थेरांना दिलेल्या उपदेशातून समजते. सोण थेर अत्यंत कठोर साधना करीत होते. चालत ध्यान करताना त्यांच्या पायातून रक्त येत असे. तरीही त्यांना अपेक्षित आध्यात्मिक प्रगती होत नव्हती. त्यांच्या मनात गृहस्थाश्रमात परत जाण्याचा विचार आला. भगवान बुद्धांनी त्यांच्या मनातील विचार जाणून विचारले, “सोण, तू गृहस्थ असताना वीणा वाजवत होतास का?” सोण म्हणाले, “होय, भंते.” भगवान बुद्धांनी विचारले, “वीणेची तार अतिशय ताणली तर काय होते?” सोण म्हणाले, “स्वर लागत नाही.” “आणि ती अतिशय सैल ठेवली तर?” “तेव्हाही स्वर लागत नाही.” “मग योग्य स्वर कधी लागतो?” सोण म्हणाले, “जेव्हा तार योग्य प्रमाणात ताणलेली असते.” तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले, “सोण, साधनाही अशीच आहे. अतिप्रयत्न अस्थिरता निर्माण करतो आणि कमी प्रयत्न आळस निर्माण करतो. म्हणून संतुलित, सातत्यपूर्ण आणि जागरूक प्रयत्न कर.” हा मध्यम मार्गाचा अत्यंत सुंदर आणि जीवनाला लागू पडणारा संदेश आहे.
भगवान बुद्धांनी आपल्या पहिल्या प्रवचनात चार आर्यसत्यांचा उपदेश केला. पहिले आर्यसत्य म्हणजे दुःख. जीवनात दुःख आहे. जन्म, वार्धक्य, आजार, मृत्यू, प्रिय व्यक्तींपासून वियोग, अप्रिय गोष्टींचा संयोग आणि इच्छित गोष्ट न मिळणे ही दुःखाची विविध रूपे आहेत. दुसरे आर्यसत्य म्हणजे दुःखसमुदय. दुःखाला कारण आहे. तृष्णा, आसक्ती, लालसा आणि अज्ञान ही दुःखाची मूळ कारणे आहेत. तिसरे आर्यसत्य म्हणजे दुःखनिरोध. तृष्णेचा क्षय झाला की दुःखाचा अंत होतो. या अवस्थेला निर्वाण म्हणतात. चौथे आर्यसत्य म्हणजे दुःखनिरोधगामिनी प्रतिपदा. दुःखाच्या अंताकडे नेणारा मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग.
भगवान बुद्धांनी सांगितलेला आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. या आठ अंगांचे प्रज्ञा, शील आणि समाधी असे तीन विभाग केले जातात. सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प ही प्रज्ञेची अंगे आहेत. सम्यक वाचा, सम्यक कर्म आणि सम्यक आजीविका ही शीलाची अंगे आहेत. सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी ही समाधीची अंगे आहेत. प्रज्ञेमुळे योग्य दृष्टी निर्माण होते. शीलामुळे व्यक्तीचे आचरण शुद्ध आणि समाजहितकारी बनते. समाधीमुळे मन स्थिर, शांत आणि निर्मळ होते. म्हणून बुद्धधम्म हा केवळ श्रद्धेवर आधारित नाही; तो योग्य विचार, योग्य आचरण आणि जागरूक साधनेवर आधारित आहे.
वर्षावासाचे महत्त्व
आषाढी पौर्णिमेचे आणखी एक महत्त्व म्हणजे वर्षावासाचा प्रारंभ. पावसाळ्याच्या काळात भिक्खूंनी एका ठिकाणी राहून ध्यान, साधना, धम्माचा अभ्यास आणि उपासक-उपासिकांना धम्मदेशन करावे, तसेच सतत भ्रमण करताना लहान जीवांना इजा होऊ नये, या उद्देशाने वर्षावासाची परंपरा सुरू झाली. परंतु वर्षावास म्हणजे केवळ तीन महिने एका ठिकाणी राहणे नव्हे. वर्षावास म्हणजे अंतर्मुख होण्याचा काळ आहे. स्वतःच्या विचारांकडे पाहण्याचा काळ आहे. आपल्या वाणीचे, आचरणाचे आणि मनाचे परीक्षण करण्याचा काळ आहे. धम्म ऐकण्याचा, धम्म समजून घेण्याचा आणि धम्म आचरणात आणण्याचा काळ आहे.
बाहेर पावसाचे पाणी पडते आणि कोरडी जमीन हिरवीगार होते. त्याचप्रमाणे धम्माचा पाऊस आपल्या मनावर पडला तर आपल्या मनात करुणा, मैत्री, प्रज्ञा, समता आणि विवेक निर्माण झाला पाहिजे. मनात राग आहे का, द्वेष आहे का, अहंकार आहे का, लोभ आहे का, मत्सर आहे का, तृष्णा आहे का, याचे परीक्षण करण्याचा काळ म्हणजे वर्षावास. बाहेरची स्वच्छता आपण करतो; परंतु आपल्या मनाची स्वच्छता करण्याची गरज आपण अनेकदा विसरतो. भगवान बुद्धांचा धम्म आपल्याला प्रथम आपल्या मनाकडे पाहण्यास शिकवतो.
आजच्या धावपळीच्या, स्पर्धेच्या आणि तणावपूर्ण जीवनात भगवान बुद्धांचा मध्यम मार्ग अधिकच महत्त्वाचा ठरतो. माणूस बाह्य जगावर विजय मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे; परंतु स्वतःच्या मनावर विजय मिळविणे विसरत आहे. संपत्ती वाढत आहे; परंतु समाधान कमी होत आहे. साधने वाढत आहेत; परंतु शांतता कमी होत आहे. संपर्काची साधने वाढली आहेत; परंतु माणसामाणसांतील संवाद कमी होत आहे. अशा काळात भगवान बुद्धांचा धम्म आपल्याला सांगतो की, दुःखाचे मूळ बाहेर शोधण्यापूर्वी स्वतःच्या मनाकडे पाहा. तृष्णा, आसक्ती, द्वेष आणि अज्ञान यांचा शोध घ्या. प्रज्ञा, शील आणि समाधीच्या आधारे स्वतःचे जीवन घडवा.
म्हणून आषाढी पौर्णिमा ही केवळ एक धार्मिक तिथी नाही. ती त्यागाची आठवण आहे. ती शांततेचा संदेश आहे. ती मध्यम मार्गाची शिकवण आहे. ती दुःखाचे स्वरूप समजून घेण्याची प्रज्ञा आहे. ती दुःखाच्या कारणांचा शोध घेण्याची प्रेरणा आहे. ती दुःखाच्या अंताची शक्यता दाखविणारी आशा आहे आणि आर्य अष्टांगिक मार्गाने मुक्तीकडे जाण्याचा व्यवहार्य मार्ग आहे.
प्रिय धम्मबंधूंनो, या वर्षावासात आपण केवळ धम्म ऐकण्यापुरते मर्यादित राहू नये. धम्म आपल्या विचारात उतरला पाहिजे. आपल्या वाणीमध्ये उतरला पाहिजे. आपल्या कृतीमध्ये उतरला पाहिजे. आपल्या कुटुंबात, समाजात आणि सार्वजनिक जीवनात करुणा, मैत्री, समता, प्रज्ञा आणि विवेक निर्माण झाला पाहिजे. भगवान बुद्धांनी सांगितलेला मध्यम मार्ग आपल्या जीवनाचा मार्ग बनवूया. चार आर्यसत्यांच्या प्रकाशात आपल्या दुःखाचे स्वरूप समजून घेऊया. आर्य अष्टांगिक मार्गाच्या आधारे आपले जीवन घडवूया. प्रज्ञा, शील आणि समाधी यांच्या साहाय्याने स्वतःचे व्यक्तिमत्त्व विकसित करूया.
या वर्षावासात आपण एक संकल्प करूया – धम्म ऐकू, धम्म समजून घेऊ आणि धम्म आचरणात आणू. अंधश्रद्धेपेक्षा प्रज्ञेला महत्त्व देऊ. द्वेषाऐवजी मैत्री स्वीकारू. हिंसेऐवजी करुणा स्वीकारू. अतिरेकाऐवजी मध्यम मार्ग स्वीकारू. स्वतःच्या कल्याणासोबत समाजाच्या कल्याणासाठीही कार्य करू.
आषाढी पौर्णिमा आपल्याला चार महान संदेश देते – महामायांच्या गर्भातून मानवकल्याणाची सुरुवात झाली; सिद्धार्थ गौतमांनी सत्याच्या शोधासाठी महाभिनिष्क्रमण केले; भगवान बुद्धांनी सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तित केले; आणि वर्षावासाच्या माध्यमातून धम्मचिंतन, साधना आणि आत्मपरीक्षणाची परंपरा निर्माण झाली. या महान परंपरेचे स्मरण करून आपण आपल्या जीवनात भगवान बुद्धांचा धम्म अधिकाधिक आचरणात आणण्याचा संकल्प करूया.
भगवान बुद्धांचा मध्यम मार्ग आपल्या जीवनाचा मार्ग बनो. चार आर्यसत्ये आपल्या जीवनाचे चिंतन बनोत. आर्य अष्टांगिक मार्ग आपल्या आचरणाचा मार्ग बनो. प्रज्ञा, शील आणि समाधी आपल्या जीवनाचे आधारस्तंभ बनोत. आपल्या जीवनात करुणा, मैत्री, समता आणि विवेक वाढो. आपल्या कुटुंबाचे, समाजाचे आणि संपूर्ण मानवजातीचे कल्याण होवो.
याच मंगल भावनेने आजची धम्मदेसना येथे पूर्ण करीत आहे.

सर्वांचे मंगल होवो! सर्वांचे कल्याण होवो! सर्व प्राणी सुखी होवोत!
भवतु सब्बमंगलं!
नमो बुद्धाय! जय भीम! जय भारत! जय संविधान!

आयु. सोमीनाथ घोरपडे, संस्कार सचिव
भारतीय बौध्द महासभा शाखा – सातारा जिल्हा पूर्व
मो.नं 9284658690