
लैंगिक शोषण, आर्थिक गैरफायदा आणि धमकावल्याचा आरोप; सर्व आरोप फिर्यादीच्या तक्रारीवर आधारित असून तपास सुरू
बारामती | प्रतिनिधी लग्नाचे आश्वासन देऊन एका महिला वकिलीची फसवणूक, दीर्घकाळ लैंगिक शोषण, आर्थिक गैरफायदा घेत धमकावल्याचा आरोप करत पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी रमेश मोहन जाधव (पोलीस हवालदार) यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक 297/2026 नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 69, 81, 351(2), 351(3) आणि 318 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बारामती शहर पोलीस करत आहेत.
फिर्यादी महिला व्यवसायाने वकील असून, न्यायालयीन कामकाजादरम्यान 2024 मध्ये तिची आरोपीशी ओळख झाली. त्यानंतर आरोपीने विवाहाचे आश्वासन देत तिचा विश्वास संपादन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, 28 डिसेंबर 2024 रोजी बारामतीतील एका लॉजमध्ये विवाहाचे आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आले.
तक्रारीत पुढे नमूद केल्याप्रमाणे, आरोपीने नंतर नातेवाईकांसह फिर्यादीच्या घरी जाऊन विवाहाबाबत चर्चा केली. तसेच एका मंदिरात साखळी मंगळसूत्र म्हणून गळ्यात घालून तिला पत्नी असल्याचे सांगितले. त्यानंतर काही काळ दोघे सहजीवनात राहत होते, असा दावाही फिर्यादीने केला आहे.
सहजीवनादरम्यान फिर्यादी गर्भवती राहिली असून, 20 डिसेंबर 2025 रोजी तिने एका कन्येला जन्म दिला. मात्र, मुलीचा स्वीकार करण्यास आरोपीने नकार दिला, संगोपनासाठी कोणतीही आर्थिक मदत केली नाही तसेच मानसिक त्रास देत धमक्या दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
याशिवाय आरोपीने फिर्यादी तसेच तिच्या नातेवाईकांकडून रोख रक्कम आणि ऑनलाइन व्यवहाराद्वारे पैसे घेतले, मात्र ते परत केले नाहीत, असाही आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणात मोबाईल कॉल रेकॉर्ड, व्हॉट्सअॅप चॅट, सीसीटीव्ही फुटेज, लॉजची नोंद, वैद्यकीय कागदपत्रे, बँक व्यवहार आणि इतर डिजिटल तसेच दस्तऐवजीय पुराव्यांची तपासणी करण्यात येणार असून बारामती शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









