अजितदादांच्या मृत्यूला सहा महिने; अंतिम चौकशी अहवाल अद्याप नाही, युगेंद्र पवार यांची तीव्र नाराजी

0
3
अजितदादांच्या मृत्यूला सहा महिने; अंतिम चौकशी अहवाल अद्याप नाही, युगेंद्र पवार यांची तीव्र नाराजी

“आमचा संयम सुटत चालला आहे; सत्य समोर यावे आणि जबाबदारांवर कारवाई व्हावी,” अशी ठाम मागणी

बारामती | प्रतिनिधी

दिवंगत अजितदादांच्या निधनाला सहा महिने पूर्ण होऊनही संबंधित चौकशीचा अंतिम अहवाल अद्याप जाहीर झालेला नसल्याने युगेंद्र पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणातील सत्य समोर यावे आणि चौकशीचा निष्कर्ष लवकरात लवकर जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली.

युगेंद्र पवार म्हणाले की, “दादांना जाऊन सहा महिने झाले, मात्र आजही त्या दिवशी नेमके काय घडले, याचे स्पष्ट उत्तर मिळालेले नाही. आम्ही इतका काळ संयम बाळगला, पण आता तो सुटत चालला आहे. या प्रकरणातील सत्य जनतेसमोर येणे आवश्यक आहे.”

त्यांनी सांगितले की, अजूनही अनेक महत्त्वाच्या बाबींचा उलगडा झालेला नाही. “साधे सीसीटीव्ही फुटेजदेखील अद्याप उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत,” असे त्यांनी नमूद केले.

युगेंद्र पवार यांच्या मते, या प्रकरणाची चौकशी सध्या सीआयडी आणि डीजीसीएकडून सुरू असली तरी अद्याप कोणताही अंतिम किंवा ठोस अहवाल सार्वजनिक करण्यात आलेला नाही. तसेच संबंधित व्हीएसआरच्या मालकावरही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

“सहा महिने आम्ही संयम ठेवला. आता दुसरा अहवाल समोर यायला हवा. आम्हाला केवळ सत्य जाणून घ्यायचे आहे. चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण होऊन जबाबदारांवर कारवाई झाली पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

युगेंद्र पवार यांनी पुढे सांगितले की, “साहेबांना देशाच्या राजकारणाचा मोठा अनुभव आहे. ते या प्रकरणासंदर्भात पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. योग्य पातळीवर पाठपुरावा करून या प्रकरणातही आवश्यक ती कारवाई व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे.”

दरम्यान, अजितदादांच्या निधनानंतर विविध स्तरांवर चौकशी सुरू असली तरी अद्याप अंतिम निष्कर्ष समोर न आल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आणि कुटुंबीयांमध्ये अस्वस्थता वाढत असल्याचे चित्र आहे. चौकशी यंत्रणांनी लवकरात लवकर अहवाल सादर करून सर्व शंकांचे निरसन करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.