Wednesday, August 12, 2026
Homeसाताराराजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हास्तरीय मेळावा उत्साहात

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हास्तरीय मेळावा उत्साहात

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हास्तरीय मेळावा उत्साहात

कोरेगाव, दि. २६ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा (पूर्व) यांच्या वतीने बीएसआय मिशन-२५ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा जिल्हास्तरीय भव्य मेळावा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह, कोरेगाव येथे उत्साहात संपन्न झाला.

मेळाव्यास भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्याचे संघटक तथा समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर आयु. दादासाहेब भोसले, भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्याचे संघटक तथा पुणे व सातारा जिल्हा निरीक्षक आयु. विजय ओव्हाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा जिल्हा (पूर्व) चे अध्यक्ष आयु. नानासो मोहिते होते, तर संस्कार उपाध्यक्ष आयु. अविनाश बारसिंग यांनी उद्घाटक म्हणून प्रास्ताविक केले.

मेळाव्याची सुरुवात सामूहिक त्रिशरण-पंचशील ग्रहणाने झाली. प्रास्ताविकात आयु. अविनाश बारसिंग यांनी राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक, शैक्षणिक व मानवतावादी कार्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी असलेले त्यांचे संबंध तसेच सन १९२० मध्ये ‘मूकनायक’ पाक्षिकाला दिलेल्या आर्थिक मदतीचा उल्लेख करत समता, शिक्षण आणि जातिभेद निर्मूलनाच्या कार्यावर प्रकाश टाकला.
प्रमुख मार्गदर्शक आयु. दादासाहेब भोसले यांनी ‘गाव तिथे शाखा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले. बीएसआय मिशन-२५, सदस्य नोंदणी, समता सैनिक दलाची उभारणी, बौद्धाचार्य व केंद्रीय शिक्षकांचे प्रशिक्षण, तसेच प्रत्येक तालुक्यात सक्षम सैनिक तयार करून आगामी महाड येथील कार्यक्रमासाठी नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

राज्य संघटक आयु. विजय ओव्हाळ यांनी धम्मप्रचार, संघटनात्मक शिस्त, त्रिशरण-पंचशील, बुद्धवंदना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आचरण यावर भर देत प्रत्येक गावात नियमित धम्मकार्य, अध्ययनवर्ग व सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले.

जिल्हा कोषाध्यक्ष आयु. नंदकुमार शिंदे यांनी बीएसआय मिशन-२५ मधील २५ कलमी कृती आराखड्याचे सविस्तर विश्लेषण करत तालुकानिहाय कामाचा आढावा घेतला. शाखा विस्तार, सदस्य नोंदणी, बुद्ध विहारांशी समन्वय, प्रशिक्षण शिबिरे, समता सैनिक दल, महिला सक्षमीकरण, संविधान जनजागृती आदी उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक व पदाधिकाऱ्यांची नोंदणी करण्यात आली. तसेच बौद्धाचार्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या १२ बौद्धाचार्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

अध्यक्षांच्या सूचनेनुसार आयु. अविनाश बारसिंग यांनी अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विषयावर भूमिका मांडत ३० जुलै रोजी मुंबई येथे होणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. यासंदर्भात जिल्हा सरचिटणीस आयु. सुनील कदम यांनीही तालुका व जिल्हास्तरावर नियोजन करून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

अध्यक्षीय समारोपात आयु. नानासो मोहिते यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांची आचारसंहिता, संघटनात्मक शिस्त, बौद्धाचार्यांची जबाबदारी आणि धम्मप्रचाराचे महत्त्व स्पष्ट केले. संस्थेच्या कार्यपद्धतीनुसार निष्ठेने कार्य करून समाजात समतावादी व वैज्ञानिक विचारांचा प्रसार करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस आयु. सुनील कदम यांनी केले, तर कार्यालयीन सचिव आयु. धनसिंग सोनवणे यांनी आभार मानले. या मेळाव्यास मेळाव्यास भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्याचे संघटक तथा समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर, पुणे व सातारा जिल्हा प्रभारी आयु. दादासाहेब भोसले, महाराष्ट्र राज्याचे संघटक तथा पुणे व सातारा जिल्हा निरीक्षक आयु. विजय ओव्हाळ, भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा (पूर्व) चे अध्यक्ष आयु. नानासो मोहिते, जिल्हा सरचिटणीस आयु. सुनील कदम,जिल्हा कोषाध्यक्ष आयु. नंदकुमार शिंदे, जिल्हा हिशोब तपासणीस आयु. बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष दिलिप टिळक, कार्यालयीन सचिव धनसिंग सोनवणे, संस्थेचे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे, अनिल शंकर कांबळे, आबासाहेब बनसोडे, संदेश सहदेव कांबळे, सुधाकर शिलवंत, संघटक अर्जुन ननावरे, उत्तम मस्के हे जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते.
यासाठी माण चे अरविंद बनसोडे, फलटणचे भिमराव लोंढे, खंडाळा संजय जाधव, कोरेगाव चे राजाराम कांबळे उपस्थित होते. यांच्यासह जिल्हा व तालुका पदाधिकारी, बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक आणि माण, खटाव, फलटण, कोरेगाव व खंडाळा तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments