
खोट्या राजकीय संघर्षात श्रीराम कारखान्याचा बळी देऊ नका; शेतकरी, कामगार आणि सहकार वाचवा – नंदकुमार मोरे
फलटण | प्रतिनिधी
फलटण तालुक्यातील श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या भवितव्यावरून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) फलटण तालुक्याचे पदाधिकारी नंदकुमार मोरे यांनी तीव्र भूमिका मांडली आहे. खोट्या राजकीय संघर्षात श्रीराम सहकारी साखर कारखान्याचा बळी देऊ नका, अन्यथा शेतकरी, ऊस उत्पादक, कामगार आणि सभासदांचे मोठे नुकसान होईल, असा इशारा त्यांनी दिला.
मोरे म्हणाले की, कारखान्याच्या संचालक मंडळावर किंवा व्यवस्थापनावर भ्रष्टाचाराचे आरोप असतील तर त्याची चौकशी न्यायालय, ईडी, सीबीआय किंवा अन्य सक्षम यंत्रणांकडून व्हावी. मात्र चौकशीच्या नावाखाली कारखाना बंद पडणार नाही, याची खबरदारी शासनाने घ्यावी.
श्रीराम सहकारी साखर कारखाना हा फलटण तालुक्यातील सहकार चळवळीचा आधारस्तंभ असून तो सक्षम नेतृत्वाखाली सुरू राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वपक्षीय नेत्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून आगामी गळीत हंगाम सुरळीत सुरू करण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
त्यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना अधिक सक्षमपणे चालू शकतो, असे मत मांडले. कारखान्याचे राजकारण न करता शेतकरी, कामगार आणि सभासदांचे हित जपणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तालुक्यातील चार साखर कारखान्यांपैकी श्रीराम हा एकमेव सहकारी साखर कारखाना असल्याने त्याचे अस्तित्व टिकवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पूर्वी काही वर्षे कारखाना बंद राहिल्यामुळे अनेक शेतकरी, कामगार आणि उद्योगधंद्यांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कारखान्याला राजकीय संघर्षाचे केंद्र बनवण्याऐवजी तालुक्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र काम करावे. संघर्षातूनच यश मिळते, त्यामुळे संयम ठेवून सहकाराचे हे मंदिर सुरक्षित, पारदर्शक आणि सक्षमपणे चालवण्यासाठी सर्वांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन नंदकुमार मोरे यांनी केले.










