
तांदूळवाडी विहीर दुर्घटना प्रकरण : ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी; विधानसभेत आ. उत्तमराव जानकर यांचा सरकारला जाब
मुंबई/माळशिरस | प्रतिनिधी :- माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी येथे घडलेल्या भीषण विहीर दुर्घटनेचे पडसाद आता राज्य विधानसभेत उमटले असून, या प्रकरणातील जबाबदार ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार उत्तमराव जानकर यांनी सभागृहात जोरदारपणे लावून धरली. निष्पाप भाविकांचा बळी गेलेल्या या दुर्घटनेमागील निष्काळजीपणा उघडकीस आणत सरकारने दोषींना अभय देऊ नये, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
तांदूळवाडी परिसरात रस्त्यालगत असलेल्या उघड्या विहिरीत भाविकांची पिकअप गाडी कोसळून अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेत महिला व लहान मुलांचाही मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्य हळहळले होते. दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले होते.
विधानसभेत बोलताना आ. उत्तमराव जानकर यांनी संबंधित रस्त्यावरील सुरक्षा उपाययोजनांचा अभाव, संरक्षक कठडे नसणे, तसेच कामाच्या दर्जाबाबत गंभीर शंका उपस्थित केल्या. या अपघातासाठी केवळ चालकाला जबाबदार धरून चालणार नाही, तर रस्त्याच्या कामात झालेल्या त्रुटी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाचीही सखोल चौकशी झाली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबांना न्याय मिळावा, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत आणि संबंधित विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली. तसेच राज्यातील अशा धोकादायक ठिकाणांचे सर्वेक्षण करून तत्काळ सुरक्षाविषयक उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरू असून दुर्घटनेमागील नेमकी कारणे शोधण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. मात्र, या घटनेमुळे ग्रामीण भागातील रस्ते सुरक्षा, सार्वजनिक बांधकामांची गुणवत्ता आणि प्रशासनाच्या जबाबदारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
तांदूळवाडी दुर्घटनेतील मृतांना न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आता सर्व स्तरांतून होत आहे.










