Tuesday, August 11, 2026
Homeफलटणपंचायत समिती फलटणच्या नव्या निवासस्थानाच्या उद्घाटनावरून श्रेयवाद; राजकीय चर्चा रंगल्या

पंचायत समिती फलटणच्या नव्या निवासस्थानाच्या उद्घाटनावरून श्रेयवाद; राजकीय चर्चा रंगल्या

फलटण : पंचायत समिती फलटणच्या सभापती निवासस्थान व कर्मचारी निवासस्थानाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनानंतर श्रेयाच्या मुद्द्यावरून फलटणच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. या प्रकल्पासाठी शासनस्तरावर पाठपुरावा, प्रशासकीय मंजुरी आणि निधी मिळविण्यात माजी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची महत्त्वाची भूमिका असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत असून, यासंदर्भातील २३ मार्च २०२० रोजीचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

माहितीनुसार, फलटण पंचायत समितीचे सभापती निवासस्थान आणि कर्मचारी निवासस्थाने अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत होती. या इमारतींच्या पुनर्बांधणीची गरज लक्षात घेऊन तत्कालीन आमदार तथा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी ग्रामविकास मंत्र्यांना पत्र पाठवून नव्या इमारतीसाठी पाठपुरावा केला होता. संबंधित प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आल्याचा उल्लेखही त्या पत्रात करण्यात आला आहे.

समर्थकांच्या म्हणण्यानुसार, या प्रकल्पासाठी शासनस्तरावरील पाठपुरावा, प्रशासकीय मंजुरी मिळविणे आणि निधी मंजूर करून घेणे या तीन महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये सातत्याने प्रयत्न करण्यात आले. त्यानंतरच प्रत्यक्ष बांधकामाला गती मिळाली आणि इमारत पूर्णत्वास आली.

दरम्यान, नव्या इमारतीच्या उद्घाटनानंतर श्रेय कोणाचे, यावरून राजकीय वातावरण तापले आहे. “उद्घाटन करणे सोपे, मंजुरी मिळवणे कठीण” असा संदेश देत रामराजे समर्थकांनी सोशल मीडियावर भूमिका मांडली आहे. कामासाठी पाठपुरावा करणाऱ्यांना योग्य श्रेय मिळावे, अशी त्यांची मागणी आहे.

दुसरीकडे, यापूर्वी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही संबंधित काम लवकर पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे या प्रकल्पाच्या श्रेयावरून निंबाळकर घराण्यातील दोन राजकीय गटांमध्ये अप्रत्यक्ष श्रेयवाद रंगल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

एकूणच, विकासकामांच्या उद्घाटनापेक्षा त्या कामाचे श्रेय कोणाला मिळणार, हा मुद्दाच सध्या फलटणच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments