Tuesday, September 15, 2026
Homeसाताराडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती: संविधान, अर्थव्यवस्था आणि सामाजिक समतेच्या लढ्यातील...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती: संविधान, अर्थव्यवस्था आणि सामाजिक समतेच्या लढ्यातील आजची प्रासंगिकता

साहस टाईम्स :- देशभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी होत आहे. या निमित्ताने त्यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेबांच्या विचारांवर नव्याने प्रकाश टाकला. त्यांनी संविधानाची स्थिती, अर्थव्यवस्थेतील अनियमितता आणि सामाजिक भेदभावावर भाष्य करताना बाबासाहेबांचे विचार आज किती प्रासंगिक आहेत, याचे सखोल विश्लेषण केले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “डॉ. आंबेडकरांची प्रासंगिकता मी तीन भागांत विभागेन – संविधान, अर्थव्यवस्था आणि सामाजिक समता. बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य यासाठी समर्पित केले. मात्र आजही ही लढाई अपूर्ण आहे. संविधान, त्यातील मूल्ये आणि दलित समाजाच्या हक्कांसाठीची ही चळवळ आजही सुरू आहे.”

गेल्या वर्षीच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ‘संविधान वाचवा’ हा मुद्दा चर्चेत होता. मात्र प्रकाश आंबेडकर यांच्या मते, भाजपाच्या विजयाचा अर्थ ‘संविधान वाचवा’ च्या विरोधात जनादेश होता, असं म्हणता येणार नाही. विरोधकांच्या अपयशाने भाजपाला संधी मिळाली, हे लक्षात घेतलं पाहिजे, असे ते म्हणाले.

संविधान धोक्यात का?

प्रकाश आंबेडकर यांच्या मते, “भाजप आणि आरएसएस हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. आरक्षण संपवण्याचा प्रयत्नही दीर्घकालीन अजेंडाचा भाग आहे. हे संविधानातील मूलभूत तत्त्वांना आव्हान आहे. त्यामुळेच बाबासाहेबांचे विचार आज अधिक महत्त्वाचे ठरतात.”

अर्थव्यवस्था आणि संसदीय लोकशाही

बाबासाहेब संसदीय लोकशाहीचे खंदे समर्थक होते. अर्थविषयक निर्णय संसदेत होण्याचे त्यांनी समर्थन केले होते. आज मात्र संसदेला डावलून काही मूठभर कॉर्पोरेट कंपन्यांसाठी निर्णय घेतले जातात, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. बाबासाहेब भांडवलशाहीविरोधात होते, पण औद्योगिकीकरणाचे समर्थन करत त्यांनी कृषीवर अवलंबून असलेल्या समाजाला पर्याय सुचवले होते.

दलित समाजाची आजची स्थिती

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “बाबासाहेबांनी सामाजिक परिवर्तनासाठी जो लढा दिला, तो आजही अपूर्ण आहे. शारीरिक भेदभाव आढळत नसला, तरी मानसिक स्तरावर तो कायम आहे. पुढच्या पिढीला या व्यवस्थेपासून मुक्त करणे हे मोठे आव्हान आहे.”

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समतेच्या, बंधुतेच्या आणि न्यायाच्या मूल्यांची आठवण करून देणारी ही १३५ वी जयंती, देशातील प्रत्येक नागरिकासाठी संविधानाची मूल्यं जपण्याचे प्रेरणास्थान ठरावी, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments