
दरे येथे सदिच्छा भेट; नैसर्गिक शेती, आधुनिक तंत्रज्ञान, निर्यातक्षम उत्पादन आणि गिरवीच्या कृषीक्रांतीची घेतली माहिती
फलटण | प्रतिनिधी : फलटण तालुक्यातील गिरवी येथील प्रगतशील फळबागायतदार तसेच महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठेच्या ‘उद्यान पंडित’ पुरस्काराने सन्मानित रामदास कदम यांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील दरे येथे सदिच्छा भेटीसाठी विशेष निमंत्रित केले होते. या भेटीदरम्यान राज्यातील फलोत्पादन, आधुनिक शेती, नैसर्गिक शेती, निर्यातक्षम उत्पादन तसेच सातारा जिल्ह्यातील विविध भागांमध्ये विकसित होणाऱ्या फळबागांबाबत दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महाबळेश्वर व दरे परिसरातील हवामान आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन कोणत्या प्रकारच्या फळपिकांची लागवड यशस्वी होऊ शकते, याविषयी रामदास कदम यांच्याकडून माहिती घेतली. विशेषतः पेरूच्या ‘जरवी रेड’ (Jervi Red) या जातीच्या लागवडीचे तंत्र, उत्पादन क्षमता, बाजारपेठ आणि निर्यातीच्या संधींबाबत त्यांनी सखोल चर्चा केली. याचवेळी लवकरच गिरवी येथील कदम यांच्या फळबागेला प्रत्यक्ष भेट देण्याची इच्छाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.
रामदास कदम हे गेल्या अनेक वर्षांपासून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहेत. त्यांच्या शेतात द्राक्ष, डाळिंब, पेरू, चिकू, बोरे, काकडी मंडप शेती तसेच विविध भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतले जाते. सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून दर्जेदार व निर्यातक्षम फळांचे उत्पादन करण्यावर त्यांचा विशेष भर असून त्यांच्या शेतातील उत्पादने देशांतर्गत बाजारपेठेसह परदेशातही निर्यात केली जातात. संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि गुणवत्ता यांचा प्रभावी संगम साधत त्यांनी शेती क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
यावेळी रामदास कदम यांनी गिरवी गावाच्या विकासाचा प्रवासही उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर उलगडला. पूर्वी दुष्काळी पट्ट्यात गणला जाणारा हा परिसर महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रयत्नांतून धोम-बलकवडी योजनेचे पाणी उपलब्ध झाल्यानंतर सुजलाम-सुफलाम झाला. सिंचनामुळे शेतीत मोठी क्रांती घडून आली असून आज गिरवी परिसर हा फलटण तालुक्यातील प्रगत फळबागांसाठी राज्यभरात ओळख निर्माण करत असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर आणि श्रीमंत रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन आणि प्रोत्साहनही या कृषी विकासात महत्त्वाचे ठरल्याचे कदम यांनी नमूद केले.
या भेटीत फलोत्पादनाचा विस्तार, नैसर्गिक शेतीला चालना, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, निर्यातक्षम दर्जेदार उत्पादन आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सकारात्मक चर्चा झाली. राज्यातील प्रगतशील शेतकऱ्यांच्या अनुभवाचा लाभ घेऊन कृषी क्षेत्र अधिक सक्षम आणि समृद्ध करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितल्याची माहिती उपस्थितांनी दिली.










