
ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद; शांततेत आंदोलन करत निष्पक्ष चौकशी व कठोर कारवाईची मागणी
फलटण : दिल्लीतील जंतर-मंतर येथे विविध शैक्षणिक व विद्यार्थी प्रश्नांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला फलटण शहरात मोठा प्रतिसाद मिळाला. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विद्यार्थी, व्यापारी आणि नागरिकांनी एकत्र येत शांततेत बंद पाळून विद्यार्थ्यांप्रती ऐक्य व्यक्त केले.
आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विद्यार्थ्यांना लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार असून त्यांच्यावर करण्यात आलेली कारवाई निषेधार्ह असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हा (पूर्व) उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, तालुकाध्यक्ष संदीपभाऊ काकडे, शहराध्यक्ष उमेश कांबळे, पँथरचे महादेव गायकवाड (आप्पा), भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य चंद्रकांत मोहिते, भीम आर्मीचे तालुकाध्यक्ष अजित मोरे, तालुका उपाध्यक्ष सुनील पवार, सचिन माने, फिरोज शेख, गोविंद मोरे, युवा पँथरच्या जाधव मॅडम, महिला पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा चित्रा गायकवाड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, तालुकाध्यक्ष नितीन यादव, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाध्यक्ष विकास नाळे, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष ताजुद्दीनभाई बागवान, सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले, सिद्धार्थ अहीवळे, अतुल मोहोळकर, अमीरभाई शेख यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, विद्यार्थी, व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
बंददरम्यान शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. शहरातील प्रमुख मार्गांवर शांततेच्या वातावरणात निदर्शने करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कारवाईची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
फलटण शहरातील बंद कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडला. विविध राजकीय, सामाजिक आणि विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ एकजूट दाखवत लोकशाही मूल्यांच्या संरक्षणाचा संदेश दिला.










