फलटणजवळ भीषण कार अपघात; कमिन्स कंपनीतील तीन कामगारांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर जखमी

0
4
फलटणजवळ भीषण कार अपघात; कमिन्स कंपनीतील तीन कामगारांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर जखमी

वाठार निंबाळकर हद्दीत भरधाव कार नाल्याच्या कठड्यावर आदळून पलटी; फलटण ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल

फलटण : फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर हद्दीत पुसेगाव–फलटण मार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात सुरवडी येथील कमिन्स कंपनीत कार्यरत असलेल्या तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले. भरधाव वेगातील कार चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यालगतच्या नाल्याच्या कठड्यावर जोरदार धडक देत वाहन पलटी झाल्याने हा भीषण अपघात घडला.

या अपघातात मोहम्मद हुसेन (रा. अयोध्या, उत्तर प्रदेश), अनिल हेबरम आणि सदानंद पुर्ती (दोघे रा. जमशेदपूर, झारखंड) यांचा मृत्यू झाला. तर नयन लोंगाणी, सौरभ कुमार (झारखंड) आणि एम. डी. मितारे (बिहार) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जुलै रोजी काम आटोपल्यानंतर सर्व सहकारी वाठार निंबाळकर येथील त्यांच्या वसतिगृहात परतले. त्यानंतर रात्री ते एमएच १६ एटी १७५६ क्रमांकाच्या कारमधून फलटण–लोणंद पालखी महामार्गावरील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले. जेवण झाल्यानंतर ताथवडे घाट परिसरात फेरफटका मारून परत येत असताना मोहम्मद हुसेन यांनी वाहन चालवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार वाहनाचा ताबा त्यांच्याकडे देण्यात आला.

वाठार निंबाळकर हद्दीतील एका वळणावर कार भरधाव वेगात असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कार रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊन नाल्याच्या कठड्यावर जोरदार आदळली आणि पलटी झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना रुग्णवाहिकेतून फलटण येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी मोहम्मद हुसेन, अनिल हेबरम आणि सदानंद पुर्ती यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

जखमींपैकी सौरभ कुमार यांना पुढील उपचारासाठी बारामती येथे हलविण्यात आले असून एम. डी. मितारे यांच्यावर फलटणमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अन्य जखमींवरही वैद्यकीय उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

या प्रकरणी निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवून अपघात घडवल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अपघाताच्या नेमक्या कारणांचा अधिक तपास सुरू आहे.