
बारामती न्यायालयाबाहेर वकील बांधवांची एकजूट; विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध
बारामती : दिल्ली येथे आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ बारामती वकील संघटनेच्या वतीने शुक्रवारी (दि. २४ जुलै २०२६) आंदोलन करण्यात आले. बारामती न्यायालयाच्या गेट क्रमांक १ येथे सकाळी १०.३० वाजता वकील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने एकत्र आले आणि विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध व्यक्त केला.
यावेळी उपस्थित वकिलांनी विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या अधिकाराचे समर्थन करत, आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. आंदोलनानंतर प्रतिनिधी मंडळाने प्रांताधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. सचिन सुधाकर वाघ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यामध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक ज्येष्ठ व युवा वकील सहभागी झाले. विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
आंदोलन शांततापूर्ण वातावरणात पार पडले असून, उपस्थितांनी लोकशाही मूल्यांचे संरक्षण आणि नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचा सन्मान राखण्याचे आवाहन केले.










