Monday, September 14, 2026
Homeसाताराफलटणचे खरे पालकमंत्री रणजितदादा निंबाळकरच; सरकार आणि मुख्यमंत्री त्यांच्या पाठीशी – मंत्री...

फलटणचे खरे पालकमंत्री रणजितदादा निंबाळकरच; सरकार आणि मुख्यमंत्री त्यांच्या पाठीशी – मंत्री जयकुमार गोरे


फलटण, दि. १६ (प्रतिनिधी). फलटणमध्ये कोणीही येऊ द्या, कोणताही पालकमंत्री असू द्या; मात्र फलटणचे खरे पालकमंत्री रणजितदादा निंबाळकरच आहेत. त्यांच्या पाठीशी संपूर्ण राज्य सरकार आणि मुख्यमंत्री स्वतः ठामपणे उभे आहेत, असा ठोस दावा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केला.
फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीतील दणदणीत यशाबद्दल माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करताना गोरे बोलत होते. फलटण येथील सजाई गार्डनमध्ये आयोजित विजयी मेळाव्यात त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
गोरे म्हणाले, “पूर्वी मी फलटणला आलो की काही लोक ‘वरचा आलाय, खालचा आलाय’ अशी हेटाळणी करायचे. मात्र काळ बदलला आहे. आज फलटणच्या प्रथम नागरिकांनीच माझे स्वागत केले आहे.” फलटणमधील राजकीय परिवर्तनाची सुरुवात आमदार सचिन पाटील यांच्या विजयाने झाली आणि नगराध्यक्ष समशेरसिंह निंबाळकर यांनी नगरपालिकेवर विजयाचा झेंडा फडकवून त्यावर शिक्कामोर्तब केले, असे त्यांनी स्पष्ट केले. फलटण नगरपालिकेतील पराभव म्हणजे विरोधकांच्या राजकीय अस्तित्वाचा शेवट असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले.
विरोधकांवर टीका करताना गोरे पुढे म्हणाले, “फलटणमधील पराभवाची धास्ती घेत जिल्ह्यातील काही नेते गेल्या काही दिवसांपासून आघाडी करण्याचे केविलवाणे प्रयत्न करत आहेत. राज्यातील महानगरपालिकांचे निकाल पाहिल्यानंतर असे धाडस कोणी करणार नाही. फलटणच्या राजकीय परिवर्तनाचे पहिले दोन टप्पे आपण पाहिले असून, येणारी निवडणूक हा परिवर्तनाचा अंतिम टप्पा ठरेल.”
ते पुढे म्हणाले, “लबाड बोलून बोलून विरोधकांची दाढी पांढरी झाली आहे. चौधरवाडी शाळेच्या इमारतीसाठी रणजितसिंह निंबाळकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि त्या कामासाठी निधी आम्ही उपलब्ध करून दिला. लबाडीच्या पायावर उभे असलेले राजकारण फार काळ टिकत नाही.”
राजकीय रूपकाचा वापर करत गोरे म्हणाले, “जंगलात वाघ येतो तेव्हा लांडगे अस्तित्वासाठी कळप करतात. उद्या कोणीही आघाडी करा, कोणी कुठेही जाऊ द्या; संघटन मात्र अधिक मजबूत होत जाते. सुकाळ आला की इच्छुकांची संख्या वाढते.”
या कार्यक्रमाला माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह निंबाळकर, प्रल्हाद साळुंखे पाटील, दिलीपसिंह भोसले, बापूराव शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments