पाण्याच्या टाकीवर चढून गोरक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न; सोमवारपर्यंत कारवाईचे आश्वासन
फलटण | प्रतिनिधी | दि. १३ सप्टेंबर २०२६
फलटण नगरपरिषदेच्या मालकीचा कुरेशी नगर (मंगळवार पेठ) येथील कत्तलखाना तातडीने बंद करण्यात यावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाने रविवारी गंभीर वळण घेतले. गोरक्षक अक्षय तावरे यांच्यासह सहकारी गेल्या पाच-सहा दिवसांपासून बेमुदत आमरण उपोषणाला बसले असून, या आंदोलनाला फलटण शहर, तालुका तसेच जिल्ह्यातील विविध भागांतून गोरक्षक व नागरिकांचा पाठिंबा मिळत असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ गोरक्षक सौरभ सोनवले यांनी रविवारी महात्मा फुले चौक येथील पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस व नगरपरिषद प्रशासनाची मोठी धावपळ उडाली.
आश्वासनानंतर सोनवले टाकीवरून खाली
सौरभ सोनवले पाण्याच्या टाकीवर चढल्याची माहिती मिळताच पोलीस अधिकारी व नगरपरिषदेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सोनवले यांच्याशी चर्चा करून त्यांना खाली उतरण्याची विनंती केली. मात्र, केवळ तोंडी आश्वासनांवर विश्वास ठेवण्यास आंदोलकांनी नकार दिला.
यानंतर शिवसेना शहरप्रमुख निलेश तेलखडे यांनी मध्यस्थी करत फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. नगराध्यक्षांनी सोमवारपर्यंत कत्तलखाना बंद करण्याबाबत आश्वासन दिल्यानंतर सौरभ सोनवले सुरक्षितपणे पाण्याच्या टाकीवरून खाली उतरले. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.
मात्र, सोमवारपर्यंत कत्तलखाना बंद न झाल्यास पुन्हा टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
MPCB नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आंदोलकांचा आरोप
कुरेशी नगर येथील कत्तलखान्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) नियमानुसार आवश्यक असलेली सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा अर्थात ईटीपी प्लांट (Effluent Treatment Plant) उपलब्ध नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
नियमांचे पालन होत नसतानाही कत्तलखाना सुरू ठेवण्यात आल्याचा आरोप करत, यामागे राजकीय हस्तक्षेप आहे का, याची चौकशी करण्याची मागणीही गोरक्षकांनी केली आहे. या आरोपांबाबत संबंधित प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.
आरोग्य व स्वच्छता विभागाच्या कारभारावरही प्रश्न
कत्तलखान्यातील घाण, सांडपाणी आणि टाकाऊ पदार्थांची योग्य विल्हेवाट लावली जाते का, याबाबतही आंदोलकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. संबंधित नियमांचे उल्लंघन होत असल्यास नगरपरिषदेचा आरोग्य विभाग, स्वच्छता निरीक्षक आणि संबंधित कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा आढावा घेऊन कत्तलखान्याच्या कामकाजाची तसेच पर्यावरणीय व आरोग्यविषयक नियमांच्या पालनाची सखोल तपासणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
सोमवारच्या निर्णयाकडे फलटणकरांचे लक्ष
कत्तलखाना बंद करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे फलटण नगरपरिषद प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आंदोलनादरम्यान पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न झाल्याने परिस्थिती अधिक संवेदनशील बनली आहे.
नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी दिलेल्या आश्वासनानुसार सोमवारपर्यंत कत्तलखान्याबाबत कोणती कायदेशीर व प्रशासकीय कारवाई केली जाते, याकडे आता संपूर्ण फलटणकरांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आंदोलकांनी आपली भूमिका कायम ठेवत कत्तलखाना बंद करण्याची मागणी ठामपणे लावून धरली आहे.
