Sunday, September 13, 2026
Homeसातारामिशन २५च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी एकजुटीने काम करा : दादासाहेब भोसले

मिशन २५च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी एकजुटीने काम करा : दादासाहेब भोसले

भारतीय बौद्ध महासभा सातारा पूर्व जिल्हा कार्यकारिणीची मासिक बैठक दहिवडीत संपन्न; महाड शताब्दीनिमित्त समता सैनिक दलाच्या प्रशिक्षणाला गती देण्याचे आवाहन

दहिवडी : भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा (पूर्व) कार्यकारिणीची मासिक बैठक दहिवडी, ता. माण येथील बुद्ध विहारात शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी संपन्न झाली. बीएसआय मिशन २५ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने, समन्वयाने आणि कृतीशील नियोजनातून काम करावे, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक तथा सातारा व पुणे जिल्हा प्रभारी आणि समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर आयु. दादासाहेब भोसले यांनी केले.

बैठकीच्या प्रारंभी उपस्थित मान्यवर व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते महामानवांच्या आदर्शांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा सरचिटणीस आयु. सुनील कदम यांनी प्रास्ताविक करून बैठकीची विषयपत्रिका व कामकाजाचे नियोजन मांडले. जिल्हा संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे यांनी मांडलेल्या प्रस्तावास संघटक आयु. अर्जुन ननावरे यांनी अनुमोदन दिल्यानंतर जिल्हाध्यक्ष आयु. नानासो मोहिते यांनी अध्यक्षपद स्वीकारले.

मिशन २५ची उद्दिष्टपूर्ती कृतीतून करण्याचे आवाहन

दादासाहेब भोसले यांनी राज्य कार्यकारिणीकडून प्राप्त झालेल्या विविध सूचनांची माहिती देताना सांगितले की, मिशन २५ अंतर्गत निर्धारित करण्यात आलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी केवळ चर्चा न करता तालुका व ग्रामस्तरावर ठोस कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

ग्रामशाखा निर्मिती, सभासद नोंदणी, विविध धम्म प्रशिक्षण शिबिरे, वर्षावास प्रवचनमालिका, धम्म पर्यटन, समता सैनिक दलाची बांधणी, महिला उपासिका व उद्योजकता उपक्रम, तसेच संविधान जनजागृती आदी उपक्रमांना गती देण्याचे त्यांनी आवाहन केले.

“संस्थेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी पदाधिकाऱ्यांनी आपापसातील मतभेद विसरून एकत्रितपणे काम करणे ही काळाची गरज आहे,” असे सांगून त्यांनी संघटनात्मक एकजुटीवर विशेष भर दिला. केलेल्या कामाचा दर तीन महिन्यांनी आढावा घेऊन त्याचा अहवाल राज्य व केंद्र स्तरावर पाठविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

महाड शताब्दीनिमित्त समता सैनिक दलाची व्यापक तयारी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ रोजी केलेल्या महाड चवदार तळे सत्याग्रहाला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर समता सैनिक दलाच्या प्रशिक्षणाला विशेष गती देण्याचे आवाहन दादासाहेब भोसले यांनी केले.

दि. २० मार्च २०२७ रोजी महाड येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने समता सैनिक सहभागी व्हावेत, यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर अधिकाधिक प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून प्रशिक्षित सैनिकांची फळी उभी करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

वर्षावास प्रवचनमालिकेला व्यापक जनसहभाग मिळविण्याचे आवाहन

जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये वर्षावास प्रवचनमालिकेला अपेक्षित उपस्थिती नसल्याचे निदर्शनास आणून देत, प्रवचनमालिकेचा व्यापक प्रचार-प्रसार करून जास्तीत जास्त उपासक-उपासिकांना सहभागी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमांचे पूर्वनियोजन आणि ग्रामस्तरावर प्रभावी संपर्क वाढविण्यावर त्यांनी भर दिला.

धम्मकार्याला व्यापक संघटनात्मक दिशा

विविध स्तरांवर धम्मकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना दूर न करता त्यांच्याशी समन्वय साधून भारतीय बौद्ध महासभेच्या व्यापक धम्मकार्याशी जोडून घेण्याची भूमिका दादासाहेब भोसले यांनी मांडली. व्यक्ती किंवा गटापेक्षा धम्मसंस्था आणि धम्मकार्याला प्राधान्य देऊन सामूहिक प्रयत्नातून संघटन मजबूत करावे, असे त्यांनी सांगितले.

मिशन २५साठी गावपातळीवर कृतीशील नियोजन

जिल्हा संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे यांनी मिशन २५च्या २५ कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी ग्रामशाखा निर्मिती, सभासद नोंदणी, विविध शिबिरांचे आयोजन, धम्म पर्यटन, महिला उपक्रम, सामुदायिक विवाह, महापुरुषांच्या जयंती-स्मृतिदिनांचे आयोजन, संविधान जनजागृती तसेच ‘गाव तिथे शाखा, गाव तिथे बौद्धाचार्य आणि गाव तिथे समता सैनिक दल’ या दिशेने काम करण्याबाबत मार्गदर्शन केले.

धम्म सहलीला २५ सहभागी; बुद्धगया सहलीचे नियोजन

प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आयु. दिलीप टिळक यांनी बुद्धगया व अन्य बौद्ध धम्मस्थळांच्या प्रस्तावित धम्म सहलीची माहिती दिली. आतापर्यंत २५ सहभागी तयार झाले असून धम्म सहलीची माहिती केवळ मोबाईलवर न पाठविता अधिकृत परिपत्रकाच्या माध्यमातून ग्रामस्तरापर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

समता सैनिक प्रशिक्षणासाठी तालुक्यांनी मागणी करावी

जिल्हा संरक्षण उपाध्यक्ष आयु. संपत भोसले यांनी समता सैनिक दलाच्या माध्यमातून आतापर्यंत घेण्यात आलेल्या प्रशिक्षणाचा आढावा दिला. सातारा जिल्हा पूर्व अंतर्गत येणाऱ्या पाचही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यासाठी तालुका संरक्षण विभागाशी संपर्क साधण्यात आला असून, आवश्यक प्रशिक्षणासाठी तालुका कार्यकारिणींनी जिल्हा संरक्षण विभागाकडे मागणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

बौद्धाचार्यांच्या कामात सुसूत्रतेची गरज

प्रचार व पर्यटन सचिव आयु. सुनील भोसले यांनी बौद्धाचार्य म्हणून कार्य करताना येणाऱ्या विविध अडचणी मांडल्या. संस्कार विधी करताना काही ठिकाणी आढळणारी पद्धतीतील विसंगती आणि संस्थेच्या विहित पद्धतीनुसार विधी होण्याची आवश्यकता याबाबत त्यांनी वरिष्ठ स्तरावरून स्पष्ट मार्गदर्शन मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

बौद्धाचार्य ओळखपत्रांचे वितरण

बैठकीचे संयोजन व सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस आयु. सुनील कदम यांनी केले. यावेळी सातारा जिल्हा (पूर्व) अंतर्गत येणाऱ्या पाचही तालुक्यांतील बौद्धाचार्यांच्या ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच तालुका पदाधिकाऱ्यांनी आवश्यक स्टेशनरी व सभासद पावती पुस्तके घेऊन जास्तीत जास्त सभासद नोंदणी व ग्रामशाखा निर्मितीवर भर द्यावा, असे आवाहन करण्यात आले.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष आयु. नानासो मोहिते यांनीही मिशन २५च्या उद्दिष्टपूर्तीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून धम्मप्रचार, धम्मप्रसार व सामाजिक परिवर्तनाचे कार्य अधिक व्यापक करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सर्वच तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आपापसातील मतभेद विसरून भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून धम्माचा प्रचार व प्रसाराचे काम गतिमान करा. अनेक तालुक्यांमध्ये भारतीय बौद्ध महासभा व्यतिरिक्त इतर काही संघटना काम करत आहेत त्यांना प्रतिबंध करून किंवा सोबत घेऊन भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून काम करा. राज्याचे संघटक यांनी उपस्थित केलेला मुद्दा हा चुकीचा असून कमी अधिक प्रमाणात सर्वच तालुक्यांमध्ये काम सुरू आहे. सर्वच तालुक्यांना सूचना आहेत की आपण आपल्या तालुक्यात सुरू असणाऱ्या कामाचा अहवाल जिल्ह्याकडे वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून द्यावा. जेणेकरून सदर अहवाल राज्याकडे वेळेत पाठवता येईल.

बैठकीस राज्य संघटक तथा सातारा-पुणे जिल्हा प्रभारी आयु. दादासाहेब भोसले, जिल्हाध्यक्ष आयु. नानासो मोहिते, सरचिटणीस आयु. सुनील कदम, कोषाध्यक्ष आयु. नंदकुमार शिंदे, संरक्षण उपाध्यक्ष आयु. संपत भोसले, संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे, प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आयु. दिलीप टिळक, संघटक आयु. अर्जुन ननावरे, आयु. सुधाकर शीलवंत, आयु. संदीप खरात, आयु. सुनील भोसले, आयु. मधुकर बनसोडे, फलटण तालुका अध्यक्ष आयु. भीमराव लोंढे, कोषाध्यक्ष आयु. राजकुमार रणवरे, माण तालुका अध्यक्ष आयु. अरविंद बनसोडे, कोषाध्यक्ष आयु. बाळासो सरतापे, संस्कार सचिव आयु. सिद्धार्थ बनसोडे, संघटक आयु. कुमार सरतापे तसेच आयु. शामराव सावंत, आयु. पोपट खरात, आयु. उमेश गायकवाड, आयु. वसंत सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शेवटी जिल्हा कोषाध्यक्ष आयु. नंदकुमार शिंदे यांनी माण तालुक्यातील धम्मप्रचार व प्रसाराच्या कार्याची माहिती देऊन उपस्थितांचे आभार मानले.

मिशन २५ची प्रभावी अंमलबजावणी, संघटनात्मक एकजूट, ग्रामशाखा निर्मिती, सभासद नोंदणी आणि समता सैनिक दलाची सक्षम बांधणी या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभेचे धम्मकार्य गावागावांत पोहोचविण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments