Saturday, September 12, 2026
Homeफलटणमाजी विद्यार्थ्यांच्या ऋणानुबंधातून मुधोजी महाविद्यालयाच्या विकासाला बळ द्यावे

माजी विद्यार्थ्यांच्या ऋणानुबंधातून मुधोजी महाविद्यालयाच्या विकासाला बळ द्यावे

श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर; माजी विद्यार्थी मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

फलटण | प्रतिनिधी

महाविद्यालयातून शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे संस्कार घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करीत आहेत. या माजी विद्यार्थ्यांशी महाविद्यालयाने असलेले ऋणानुबंध अधिक दृढ करून त्यांच्या अनुभवाचा, ज्ञानाचा, योगदानाचा आणि सहकार्याचा महाविद्यालयाच्या विकासासाठी उपयोग करून घ्यावा, असे प्रतिपादन माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष तथा फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे माजी विद्यार्थी मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानावरून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी माजी विद्यार्थी आमदार दीपक चव्हाण तसेच फलटण एज्युकेशन सोसायटीचे सदस्य डॉ. पार्श्वनाथ वैद्य प्रमुख उपस्थित होते.

श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी महाविद्यालयाची स्थापना रयतसेवक श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी १९५७ मध्ये केली. स्थापनेपासून आजपर्यंत या महाविद्यालयातून दोन लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत कार्यरत झाले आहेत. या सर्व माजी विद्यार्थ्यांची व्यापक स्वरूपात सदस्य नोंदणी झाल्यास महाविद्यालयाच्या पाठीशी मोठी बौद्धिक, सामाजिक आणि आर्थिक शक्ती उभी राहू शकते.

माजी विद्यार्थ्यांपैकी अनेक जण विविध उच्च पदांवर कार्यरत असून शिक्षण, प्रशासन, उद्योग, सामाजिक कार्य यांसह अनेक क्षेत्रांत समाजासाठी योगदान देत आहेत. काही माजी विद्यार्थी आज हयात नसले तरी त्यांनी महाविद्यालयाशी जपलेले नाते आणि दिलेले योगदान हे महाविद्यालयासाठी कायम प्रेरणादायी आहे. त्यामुळे शिक्षण, ज्ञान आणि समाजाप्रती योगदान देणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या ऋणानुबंधाला आगामी काळात अधिक महत्त्व देऊन महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे वाटचाल करणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच माजी विद्यार्थी मंडळाच्या वार्षिक अहवालाचे वाचन मंडळाचे सचिव डॉ. संजय दीक्षित यांनी केले. प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी उपस्थित काही माजी विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयीन आठवणींना उजाळा देत मनोगते व्यक्त केली.

सभेस सातारा जिल्हा परिषद सदस्या सौ. वैशाली कांबळे, प्रा. डॉ. बाळासाहेब कांबळे, माजी विद्यार्थी मंडळाचे खजिनदार पांडुरंग जाधव, वसंत मुळीक यांच्यासह मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक-प्राध्यापिका आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शेवटी मुधोजी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. एन. के. रासकर यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments