Monday, September 14, 2026
Homeफलटणकुरेशीनगर कत्तलखाना बंद करण्याच्या मागणीवरून फलटणमध्ये आंदोलन तीव्र

कुरेशीनगर कत्तलखाना बंद करण्याच्या मागणीवरून फलटणमध्ये आंदोलन तीव्र

नगराध्यक्षांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित; निर्णय न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा

फलटण | प्रतिनिधी

फलटण शहरातील कुरेशीनगर येथील कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करण्यात यावा, या मागणीसाठी राष्ट्रीय गोरक्षा वाहिनीच्या फलटण तालुका विभागाच्या वतीने गेल्या आठ दिवसांपासून आंदोलन सुरू होते. प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घ्यावी, यासाठी गोसेवक सौरभ सोनवले यांनी महात्मा फुले चौकातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.

कत्तलखाना तातडीने बंद करण्याबरोबरच याबाबत ठोस निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. लेखी स्वरूपात स्पष्ट आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली होती.

दरम्यान, फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी दूरध्वनीवरून आंदोलकांशी संपर्क साधत कत्तलखाना बंद करण्याच्या विषयावर विशेष बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सध्या सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, प्रशासनाकडून अपेक्षित निर्णय झाला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

मंगळवारी फलटण बंदचे आवाहन

कत्तलखान्याच्या प्रश्नावर प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी, या मागणीसाठी गोरक्षकांच्या वतीने मंगळवारी फलटण शहर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे या बंदला नागरिकांचा प्रतिसाद कसा मिळतो आणि प्रशासनाकडून पुढील कोणती कार्यवाही केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

ईटीपी यंत्रणेच्या उपलब्धतेवरही आक्षेप

दरम्यान, माहिती अधिकारातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, २०१९ ते २०२५ या कालावधीत कुरेशीनगर येथील बीफ मार्केटमध्ये सुमारे तीन हजार जनावरांची कत्तल झाल्याचा दावा आंदोलकांकडून करण्यात आला आहे. कत्तलीदरम्यान निर्माण होणारे रक्त, दूषित पाणी तसेच टाकाऊ अवशेष यांच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या ईटीपी यंत्रणेच्या उपलब्धतेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. यासंदर्भात नगरपालिकेकडे तक्रार करण्यात आल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

मिलिंद एकबोटे यांची आंदोलनस्थळी भेट

आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते मिलिंद एकबोटे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. गेल्या आठ दिवसांपासून आंदोलन सुरू असतानाही पोलीस आणि पालिका प्रशासनाने अपेक्षित गांभीर्याने दखल घेतली नसल्याचा आरोप यावेळी आंदोलकांकडून करण्यात आला.

नगराध्यक्षांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन तूर्तास स्थगित झाले असले, तरी कुरेशीनगर कत्तलखान्याबाबत प्रशासन प्रत्यक्षात कोणता निर्णय घेणार, याकडे आता फलटण शहराचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments