Monday, September 14, 2026
Homeसातारारामराजेंच्या विकासकामांना शरद पवारांचा सलाम; सत्ताबदलासाठी दीपक चव्हाण यांना निवडून आणण्याचे आवाहन

रामराजेंच्या विकासकामांना शरद पवारांचा सलाम; सत्ताबदलासाठी दीपक चव्हाण यांना निवडून आणण्याचे आवाहन

फलटण :-“रामराजे नाईक निंबाळकर हे आपल्या घराण्याच्या सेवेसाठी राजकारणात उतरले. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी स्वतःच्या हिंमतीवर विजय मिळवला आणि कृष्णा खोरे प्रकल्पाला चालना दिली,” असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले.

ते महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार दीपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ फलटणच्या गजानन चौकातील सभेत बोलत होते. या सभेसाठी श्रीमंत रघुनाथराजे, श्रीमंत संजीवराजे, अनिकेतराजे, विश्वजीतराजे नाईक निंबाळकर तसेच सह्याद्री कदम, महेंद्र सूर्यवंशी व महाविकास आघाडीतील नेते उपस्थित होते.

अजित पवारांवर खोचक टिका

“साखरवाडीच्या सभेत एका नेत्याने रामराजेंना आमदार बनवल्याचा दावा केला. पण पक्षाचा अध्यक्ष मी होतो, निर्णय माझा होता. त्यांनाही मीच आमदार केलं, आणि माझं नशीब चांगलं नाहीतर त्यांनी मलाच आमदार केल्याचंही सांगितलं असतं!” अशा शब्दांत शरद पवार यांनी अजित पवारांना टोला लगावला.

“राजकीय मतभेद असले तरी व्यक्ती व पदाचा सन्मान राखावा लागतो. चुकीची टीका लोकांना आवडत नाही,” असेही त्यांनी सुनावले.

शेतकरी आत्महत्या आणि रोजगारावर भाष्य

“महिलांच्या संरक्षणाची आवश्यकता आहे. या सरकारच्या काळात 20,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मुलांना रोजगार मिळत नाही आणि त्यामुळे तरुणांमध्ये निराशा आहे,” असे पवार यांनी सरकारच्या धोरणांवर टीका करत अधोरेखित केले.

फलटण-बारामतीचे ऐतिहासिक नाते

“फलटण आणि बारामतीचा संबंध जुना आहे. 1845 च्या दुष्काळात निरा डावा-उजवा कालव्यामुळे परिस्थिती सुधारली. स्वातंत्र्यानंतरच्या काळात श्रीमंत मालोजीराजे यांनी भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणला,” असे शरद पवार यांनी मालोजीराजेंच्या योगदानाचा उल्लेख करत सांगितले.

“सत्तेचा पर्याय बदलावा”

“लोकसभेनंतर आता विधानसभेची निवडणूक आहे. महाराष्ट्राच्या सत्तेसाठी बदल करण्याची ही संधी आहे. दीपक चव्हाण यांना विजयी करून महाराष्ट्राच्या प्रगतीला गती द्या,” असे आवाहन शरद पवार यांनी शेवटी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments