
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सातारा प्रशासन सतर्क; पाच तालुक्यांतील शाळांना सुट्टी, एनडीआरएफ कराडमध्ये तैनात
सातारा | प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या संभाव्य पूर व दरडसंकटाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित विभागांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. पर्यटकांनी धबधबे, ओढे, नाले तसेच चिखलयुक्त व निसरड्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच सखोल पाण्यात हुल्लडबाजी अथवा जीव धोक्यात घालणारे प्रकार होऊ नयेत यासाठी प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पावसाळ्यात रस्ते खचणे, दरडी कोसळणे व वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाला जेसीबी ऑपरेटरची संपर्क क्रमांकासह अद्ययावत यादी तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही यादी संबंधित शाखा अभियंते व सरपंचांना उपलब्ध करून देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
महावितरण कंपनीने नादुरुस्त विद्युत तारा, खांब व डीपीची तातडीने दुरुस्ती करून अखंडित वीजपुरवठा राखण्याची जबाबदारी पार पाडावी, असे सांगण्यात आले. वायरमन व तांत्रिक कर्मचाऱ्यांनी आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
आरोग्य विभागाने ग्रामीण भागात पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा, सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी नियुक्तीच्या ठिकाणी उपस्थित राहावे तसेच रुग्णवाहिका पूर्णपणे सुसज्ज ठेवाव्यात, असे निर्देश देण्यात आले. डोंगराळ भागात साप चावण्याच्या घटना वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक प्रतिलस (अँटी स्नेक व्हेनम) उपलब्ध ठेवण्यावरही भर देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर तालुक्यातील ११ आणि वाई तालुक्यातील १७ नागरिकांचे सुरक्षिततेच्या दृष्टीने नातेवाईकांकडे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच पाटण, सातारा आणि खंडाळा तालुक्यातील एकूण २४ घरांचे नुकसान झाले असून, ताथवडे घाटात सैल झालेला दगड वाहनावर कोसळल्याने फलटण तालुक्यातील एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. खंडाळा तालुक्यात दोन शेळ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहितीही प्रशासनाने दिली.
संभाव्य अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफचे पथक कराड येथे सज्ज ठेवण्यात आले असून, पश्चिम घाटातील पाटण, सातारा, महाबळेश्वर, वाई आणि जावली या भागांतील तहसीलदारांसह सर्व यंत्रणा प्रत्यक्ष फिल्डवर कार्यरत आहे. दरडप्रवण भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून सातारा, पाटण, महाबळेश्वर, वाई आणि जावली या पाच तालुक्यांतील सर्व शाळांना सोमवार, ६ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.










