साताऱ्यात अतिवृष्टीचा कहर; पाच तालुक्यांतील शाळांना आज सुट्टी जाहीर

0
7
साताऱ्यात अतिवृष्टीचा कहर; पाच तालुक्यांतील शाळांना आज सुट्टी जाहीर

सातारा | प्रतिनिधी :- सातारा जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सातारा, पाटण, महाबळेश्वर, जावली आणि वाई या पाच तालुक्यांतील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू असून नद्या, ओढे आणि धबधबे दुथडी भरून वाहत आहेत. काही भागांत पाणी साचल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांतही जोरदार पावसाची शक्यता वर्तविल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांनीही अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच नदी, नाले, पूल आणि धोकादायक ठिकाणांपासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्हा प्रशासन, महसूल विभाग, पोलीस तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.