कोयना पाणलोट क्षेत्रात १२ तासांत तब्बल ७८७ मिमी पाऊस; धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ, नावली गावात भूस्खलन

0
3
कोयना पाणलोट क्षेत्रात १२ तासांत तब्बल ७८७ मिमी पाऊस; धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ, नावली गावात भूस्खलन

पाटण | प्रतिनिधी कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या १२ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाटण, कोयना, नवजा आणि महाबळेश्वर परिसर अक्षरशः जलमय झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पश्चिम घाटात पावसाने जोरदार हजेरी लावत अनेक भागांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

कोयना, नवजा आणि महाबळेश्वर या पाणलोट क्षेत्रात गेल्या १२ तासांत एकूण ७८७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामध्ये कोयना येथे २३१ मिमी, नवजा येथे २६१ मिमी, तर महाबळेश्वर येथे २९५ मिमी पाऊस झाला. एक जूनपासून आजपर्यंत कोयना येथे ६६४ मिमी, नवजा येथे ९२४ मिमी आणि महाबळेश्वर येथे ९३४ मिमी पावसाची नोंद झाली असून, पाणलोट क्षेत्रातील एकूण पाऊस २,५२२ मिलिमीटर इतका झाला आहे.

सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणात २९ हजार १६४ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू असून, धरणातील पाणीसाठा १४ टीएमसीपर्यंत पोहोचला आहे. तसेच पाटण तालुक्यातील मोरणा गुरेघर, साखरी-चिट्टेघर आणि बिबी या लघुपाटबंधारे प्रकल्पांमध्येही जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. डोंगराळ भागातील अनेक लहान-मोठे ओढे आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत.

दरम्यान, महाबळेश्वर तालुक्यातील नावली गावात अतिवृष्टीमुळे भूस्खलनाची घटना घडली. गावाच्या वरच्या बाजूचा काही भाग झाडांसह रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत मलबा हटविण्याचे काम सुरू केले आहे.

भूस्खलन झालेल्या ठिकाणाजवळ चार घरे असून, त्यापैकी एक घर बंद आहे. उर्वरित तीन घरांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. गावातील पाण्याची टाकीही याच परिसरात असल्याने प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

तहसीलदार सचिन म्हस्के यांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.