
अकलूज प्रतिनिधी . दलित पँथर चळवळीच्या स्वाभिमानी विचारांचा प्रचार-प्रसार आपल्या शाहिरी, लेखणी आणि सामाजिक कार्यातून सातत्याने करणारे ज्येष्ठ शाहीर राजेंद्र कांबळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा होत असून विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दलित पँथर ही केवळ एक संघटना नव्हती, तर शोषित, वंचित आणि अन्यायग्रस्त समाजाच्या स्वाभिमानाची बुलंद चळवळ होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, न्याय आणि बंधुत्वाच्या विचारांनी प्रेरित झालेल्या या चळवळीने समाजात नवचैतन्य निर्माण केले. त्या विचारांचा वारसा आजही जिवंत ठेवण्याचे कार्य शाहीर राजेंद्र कांबळे सातत्याने करत आहेत.
राजेंद्र कांबळे आपल्या संदेशात म्हणतात, “पँथर म्हणजे स्वाभिमान… पँथर म्हणजे विद्रोह… पँथर म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांची रस्त्यावर उतरलेली ताकद… जिथे अन्याय दिसला तिथे पँथर उभा राहिला, जिथे अत्याचार झाला तिथे पँथर गर्जला.” त्यांच्या या शब्दांतून दलित पँथर चळवळीचा इतिहास, संघर्ष आणि सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा स्पष्टपणे दिसून येते.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे निकटवर्तीय आणि समर्थक म्हणूनही शाहीर राजेंद्र कांबळे यांची ओळख आहे. आपल्या डफाच्या ठेक्यावर, शाहिरी आणि लेखणीच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक समता, संविधानिक मूल्ये आणि अन्यायाविरोधातील संघर्षाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला आहे.
आजच्या तरुण पिढीनेही पँथरच्या विचारांचा वारसा जपावा, असे आवाहन करताना ते म्हणतात, “आजही त्या निळ्या वादळाची ऊर्जा तरुणांच्या रक्तात धावते. पँथर म्हणजे न्याय, समता आणि बंधुत्वाची शपथ. या चळवळीचा आणि तिच्या विचारांचा वारसदार असल्याचा मला अभिमान आहे.”
त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक, सांस्कृतिक आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांकडून त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सामाजिक कार्यासाठी अखंड ऊर्जा लाभावी, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.










