अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सातारा प्रशासन अलर्ट; संवेदनशील भागातील नागरिकांचे तात्काळ स्थलांतर करा : पालकमंत्री शंभूराज देसाई

0
4
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सातारा प्रशासन अलर्ट; संवेदनशील भागातील नागरिकांचे तात्काळ स्थलांतर करा : पालकमंत्री शंभूराज देसाई

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सातारा प्रशासन अलर्ट; संवेदनशील भागातील नागरिकांचे तात्काळ स्थलांतर करा : पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा | प्रतिनिधी :  राज्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासनाने अधिक सतर्क राहून आपत्ती व्यवस्थापनाची सर्व यंत्रणा सज्ज ठेवावी, तसेच दरडप्रवण व पूरग्रस्त भागातील नागरिकांचे कोणताही धोका न पत्करता तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे स्पष्ट निर्देश सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेऊन पालकमंत्री देसाई यांनी रविवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे तालुकानिहाय प्रशासनाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभय काटकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की, ज्या भागांमध्ये दरड कोसळण्याचा किंवा पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे, त्या ठिकाणच्या नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे. स्थलांतरित नागरिकांना अन्न, शुद्ध पिण्याचे पाणी, पांघरूण, शौचालय आणि इतर मूलभूत सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यात याव्यात. डोंगराळ भागातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी पोलिसांनी रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रशासकीय यंत्रणेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी उपस्थित राहणे बंधनकारक असून, २४x७ सेवा देण्यासाठी संपर्क क्रमांक कार्यरत ठेवावेत, असे निर्देशही त्यांनी दिले. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गावोगावी जाऊन नागरिकांशी संवाद साधावा, अफवांना आळा घालावा आणि गरज पडल्यास तात्काळ मदत पोहोचवावी, असेही त्यांनी सांगितले.

महाबळेश्वरप्रमाणेच पाटण तालुक्यातील हेळवाक, नवाजा, कोयनानगर, आटोली, बामणेवाडी यांसारख्या भागांमध्ये मुसळधार पावसामुळे दरडी कोसळणे, घरांमध्ये पाणी शिरणे व भिंती पडण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे क्षेत्रीय यंत्रणांनी सातत्याने गस्त ठेवून जीवितहानी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. दरडप्रवण भागातील नागरिकांच्या स्थलांतरासाठी आवश्यक व्यवस्था तत्काळ उभी करावी. तसेच कोयना वसाहतीतील जलसंपदा विभागाची शासकीय निवासस्थाने स्वच्छ व सुस्थितीत ठेवून गरज भासल्यास त्याठिकाणी नागरिकांना हलविण्याची तयारी ठेवावी, असेही निर्देश देण्यात आले.

पावसाळ्यात सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्याने प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, असे सांगताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सडावाघापूरचा उलटा धबधबा, ओझर्डे धबधबा, लिंगमळा धबधबा, ठोसेघर तसेच महाबळेश्वरमधील एलिफंट पॉईंट आणि आर्थर सीट पॉईंट परिसरात चिखल व निसरडी परिस्थिती निर्माण होत असल्याने पर्यटकांना धोकादायक ठिकाणी जाण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक आदेश जारी करण्याचे निर्देश दिले. सखोल पाण्यात हुल्लडबाजी करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

पावसामुळे रस्ते खचणे, दरडी कोसळणे यांसारख्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबी ऑपरेटरची अद्ययावत यादी शाखा अभियंते व सरपंचांना उपलब्ध करून द्यावी. महावितरणने नादुरुस्त वीजतारा, खांब व डीपीची तातडीने दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत ठेवावा. आरोग्य विभागाने ग्रामीण भागात पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवण्याबरोबरच रुग्णवाहिका सज्ज ठेवाव्यात. पावसाळ्यात डोंगराळ भागात वाढणाऱ्या सर्पदंशाच्या घटनांचा विचार करून आवश्यक लस उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जिल्ह्यातील सद्यस्थितीची माहिती देताना सांगितले की, महाबळेश्वर तालुक्यातील ११ तर वाई तालुक्यातील १७ नागरिकांचे सुरक्षितस्थळी किंवा नातेवाईकांकडे स्थलांतर करण्यात आले आहे. पाटण, सातारा आणि खंडाळा तालुक्यांमध्ये एकूण २४ घरांची पडझड झाली आहे. ताथवडे घाटात दगड वाहनावर कोसळल्याने फलटण तालुक्यातील एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून खंडाळा तालुक्यात दोन शेळ्यांचा मृत्यू झाला आहे.

संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (NDRF) पथक कराड येथे तैनात करण्यात आले असून पश्चिम घाटातील पाच तालुक्यांतील तहसीलदारांसह सर्व यंत्रणा प्रत्यक्ष फिल्डवर कार्यरत आहे. दरडप्रवण भागातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.

जिल्ह्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.