Friday, September 4, 2026
Homeसातारारामराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन; अजित पवार...

रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन; अजित पवार यांच्याबरोबर कार्यकर्त्यांची तक्रार

फलटण :- सन्मान यात्रा फलटणमध्ये आली असता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी व स्थानिक नेत्यांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रारी मांडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोरही या त्रासाबद्दल सांगण्यात आले. अजित पवार आणि तटकरे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून या समस्येचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु अद्याप कोणतेही समाधान मिळालेले नाही.

खटके वस्ती, तालुका फलटण येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन आणि बापूराव गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, कार्यकर्त्यांचे प्रश्न अजितदादांना पुन्हा एकदा सांगितले जातील. मात्र, यावर तोडगा निघाला नाही तर दोन दिवसांत कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

मेळाव्यात बोलताना रामराजे म्हणाले, “दुपारपासून मला अनेक वृत्तवाहिन्यांचे फोन येत आहेत की मी अजित पवार यांना सोडून शरद पवार गटात जाणार आहे का? या अफवा पसरवल्या जात आहेत. मला वाटते की विरोधकांनी या बातम्या पसरवल्या आहेत, कारण जर मी शरद पवार गटात गेलो, तर फलटण-कोरेगावची जागा भाजपला सोपी होईल.”

रामराजे पुढे म्हणाले की, “माझा कार्यकर्ता हा माझ्या राजकारणाचा नव्हे तर माझ्या आयुष्याचा केंद्रबिंदू आहे. जर कार्यकर्ते सुरक्षित राहत नसतील, तर विचार करावा लागेल. जर यावर काही फरक पडला नाही, तर दोन दिवसांत कार्यकर्त्यांची चर्चा करून निर्णय घेतला जाईल.”

या मेळाव्यात आमदार दीपक चव्हाण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments