Sunday, October 25, 2026
Homeफलटणमांगोबामाळ ते समता नगर : धम्मभूमीकडे आश्वासक वाटचाल

मांगोबामाळ ते समता नगर : धम्मभूमीकडे आश्वासक वाटचाल

वर्षावास प्रवचनमालिकेपासून बुद्धमूर्ती प्रतिष्ठापनेपर्यंतचा परिवर्तनशील प्रवास

फलटण प्रतिनिधी :- मौजे विडणीअंतर्गत येणारी २५ ते ३० कुटुंबांची मांगोबामाळ ही वस्ती. काही कुटुंबे मूळ विडणी गावातून येथे स्थायिक झालेली, तर काही रोजगाराच्या निमित्ताने येऊन इथेच रमलेली. गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ या वस्तीचा सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक प्रवास जवळून पाहत असताना एका छोट्या वस्तीचे समता नगरमध्ये झालेले परिवर्तन अनुभवता आले.

एकेकाळी येथे बुद्धविहार किंवा समाजमंदिर नव्हते. महामानवांच्या जयंतीचे कार्यक्रम जिल्हा परिषद शाळेच्या वरांड्यात आयोजित केले जात. पुढे पक्की इमारत उभी राहिली आणि भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून धम्मप्रचाराला सुरुवात झाली. श्रामणेर व भिक्षुसंघाचे स्वागत, जयंती उत्सव आणि प्रबोधनपर कार्यक्रम यांमधून महिलांमध्ये जागृती निर्माण झाली; तरुण कार्यकर्तेही धम्मचळवळीत सहभागी होऊ लागले. अशा प्रयत्नांतून मांगोबामाळची ओळख हळूहळू समता नगर म्हणून दृढ होत गेली.

वर्षावासातून बुद्धमूर्ती प्रतिष्ठापनेपर्यंत

या परिवर्तनाला अधिक गती मिळाली ती गेल्या दोन वर्षांतील धम्मकार्यामुळे. गतवर्षीप्रमाणे यंदाही आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका माजी कार्यकारणी आणि भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्व यांच्या माध्यमातून सलग तीन महिने वर्षावास प्रवचनमालिका राबविण्यात आली. या उपक्रमामुळे समता नगरमधील धम्मचळवळीला सातत्य मिळाले.

या कार्याची दखल घेत भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका माजी कार्यकारणी अर्थात BBM Family आणि न्यू पंचशील तरुण मित्र मंडळाच्या वतीने सुरवडीचे सुपुत्र, समाजभूषण आयु. तुषार मोहिते साहेब, अतिरिक्त आयुक्त, आयकर विभाग, मुंबई यांची भेट घेण्यात आली. समता नगरमधील धम्मचळवळीचा आढावा देऊन बुद्धमूर्तीसाठी विनंती करण्यात आली. मोहिते साहेबांनी समता नगरसह निरगुडी येथेही बुद्धमूर्ती देण्याचे मान्य केले.

यानंतर न्यू पंचशील तरुण मित्र मंडळाने वर्षावासाच्या समारोपप्रसंगी बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना आणि बुद्धविहार नामकरणाचा संकल्प केला. मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अनेक महिने मेहनत घेऊन कार्यक्रमाचे नियोजन केले. समाजबांधवांनी उत्स्फूर्त सहकार्य केले, तर BBM Familyनेही तन-मन-धनाने या उपक्रमाला हातभार लावला.

२५ ऑक्टोबर २०२६ रोजी भंते कश्यपजी, नालासोपारा, मुंबई यांच्या शुभहस्ते समता नगर येथील बुद्धविहारात बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना आणि नामकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा स्वीकारून सत्तर वर्षे पूर्ण होत असताना घडणारी ही घटना समता नगरच्या धम्मचळवळीतील महत्त्वाचा टप्पा ठरते.

बुद्धविहार : नव्या जबाबदारीची सुरुवात

बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना म्हणजे धम्मकार्याची सांगता नव्हे, तर त्याच्या व्यापक वाटचालीची सुरुवात आहे. आयु. तुषार मोहिते साहेबांनी येथे नियमित बुद्धवंदना, ध्यानसाधना आणि प्रशस्त ग्रंथालय उभारण्याची दिशा सुचविली आहे. त्यानुसार बुद्धविहार हे केवळ धार्मिक कार्यक्रमांचे ठिकाण न राहता धम्मअभ्यास, वाचन, प्रबोधन आणि सामाजिक परिवर्तनाचे केंद्र बनणे आवश्यक आहे.

यासाठी नियमित धम्मवर्ग, श्रामणेर शिबिरे आणि भारतीय बौद्ध महासभेच्या विविध प्रशिक्षण उपक्रमांचे आयोजन व्हावे. महिला, तरुण आणि बालक-बालिकांचा सहभाग वाढावा. बुद्धांचा प्रज्ञा, करुणा आणि समतेचा विचार दैनंदिन जीवनात रुजावा. हीच या बुद्धविहाराची खरी फलश्रुती ठरेल.

या प्रवासाचे यश कोणत्याही एका व्यक्तीचे नसून अनेक वर्षे प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांचे, सहकार्य करणाऱ्या समाजबांधवांचे आणि धम्मचळवळीला बळ देणाऱ्या सर्वांचे सामूहिक योगदान आहे. न्यू पंचशील तरुण मित्र मंडळाने घेतलेले परिश्रम आणि समता नगरवासीयांनी दिलेली साथ निश्चितच अभिनंदनीय आहे.

मांगोबामाळ ते समता नगर हा जागृतीचा प्रवास आहे; आता समता नगर ते धम्मभूमी हा संकल्प आहे. बुद्धविहारातून ज्ञानाची दारे खुली झाली, धम्मविचाराला आचरणाची जोड मिळाली आणि समतेची मूल्ये समाजजीवनात रुजली, तर ही छोटीशी वस्ती प्रज्ञा, करुणा, समता आणि बंधुतेची प्रेरणादायी धम्मभूमी बनेल.

न्यू पंचशील तरुण मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आणि समता नगरमधील सर्व उपासक-उपासिका, माता-भगिनी, तरुण व बालक-बालिकांना या मंगल कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

मांगोबामाळच्या परिवर्तनाला समता नगरने नवी ओळख दिली; आता धम्माचरणातून या भूमीला नवी दिशा देऊया!

नमो बुद्धाय! सविनय जयभीम!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments