Sunday, August 30, 2026
HomeUncategorizedसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी फलटण सज्ज; स्वागताची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी फलटण सज्ज; स्वागताची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात

फलटण | प्रतिनिधी : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवार, दि. १७ जुलै रोजी फलटण मुक्कामी आगमन होणार असून, या पार्श्वभूमीवर फलटण नगरपरिषद प्रशासनाने स्वागताची जय्यत तयारी केली आहे. प्रारंभीची बहुतांश कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे अंतिम टप्प्यात आहेत. पालखी आगमनापूर्वी सर्व तयारी पूर्णत्वास नेण्यात येईल, अशी माहिती नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर आणि मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिली.

पालखी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती, सिमेंट काँक्रीटीकरण, चौकांचे सुशोभीकरण, विद्युत रोषणाई, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य सुविधा तसेच वाहतूक नियोजनाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. नगरपरिषद, विविध शासकीय विभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून ही सर्व कामे वेगाने पूर्ण केली जात आहेत.

फलटण शहरातील महात्मा फुले चौक, सफाई कामगार कॉलनी, शिवाजी नाका, पालखी प्रवेशद्वार, जिंती नाका तसेच पालखी मार्गावरील प्रमुख चौकांचे आकर्षक सुशोभीकरण करण्यात आले आहे. रंगरंगोटी, विद्युत रोषणाई आणि स्वच्छतेमुळे संपूर्ण मार्गाला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले आहे.

वारकऱ्यांच्या सुरक्षित आणि सुलभ प्रवासासाठी पालखी मार्गावरील अतिक्रमणे हटवून रस्ते अधिक प्रशस्त करण्यात आले आहेत. संपूर्ण मार्गावर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, कचरा संकलन, निर्जंतुकीकरण आणि पुरेशा प्रकाश व्यवस्थेची तयारी करण्यात आली आहे. आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून पालखी तळावर आरोग्य पथके, रुग्णवाहिका आणि वैद्यकीय सेवा उपलब्ध राहणार आहेत.

विमानतळ परिसरातील पालखी तळावर वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी मंडप, वीज, पाणी, जलनिस्सारण, सुरक्षा आणि स्वच्छतेसह सर्व मूलभूत सुविधांची उभारणी अंतिम टप्प्यात आली आहे. तसेच यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या भव्य प्रांगणात हजारो वारकऱ्यांना एकाच ठिकाणी निवारा मिळावा यासाठी मोठ्या टेंटची उभारणी करण्यात आली असून पावसाच्या परिस्थितीतही वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे.

महावितरणच्या माध्यमातून पालखी मार्ग व पालखी तळ परिसरात अखंडित वीजपुरवठ्यासाठी स्वतंत्र वीजजाळे, नवीन डीपी, केबल, स्ट्रीटलाईट दुरुस्ती तसेच जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. तांत्रिक अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी विशेष पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत.

पालखी सोहळ्यादरम्यान शहरातील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पोलिस प्रशासनाच्या समन्वयाने स्वतंत्र वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रमुख चौकांमध्ये कडक बंदोबस्त, पार्किंग व्यवस्था आणि वारकऱ्यांच्या सुरक्षित हालचालींसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.

याशिवाय पालखी मार्गाचे अद्ययावतीकरणही वेगाने सुरू असून नव्याने तयार झालेल्या सिमेंट रस्त्यांवर राजेशाही शैलीतील आधुनिक स्ट्रीट लाईट पोल उभारले जात आहेत. पिरॅमिड चौक, गिरवी नाका, कामगार कॉलनी, महात्मा फुले चौक, मालोजीराजे पुतळा आणि रेस्ट हाऊस मार्गावरील आकर्षक प्रकाश व्यवस्था शहराच्या सौंदर्यात भर घालत आहे. भविष्यात संपूर्ण पालखी मार्गावर भूमिगत वीजवाहिन्या आणि आधुनिक प्रकाश व्यवस्था उभारण्यात येणार असल्याने शहर अधिक सुरक्षित आणि देखणे होईल, असा विश्वास नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केला.

नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर आणि मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी नागरिकांना स्वच्छता राखण्याचे, प्रशासनाला सहकार्य करण्याचे आणि पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे आणि लाखो वारकऱ्यांचे स्वागत फलटणकरांच्या परंपरेला साजेशा उत्साहात करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments