
सातारा | प्रतिनिधी :- श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच लाखो वारकरी व भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी 15 ते 19 जुलै 2026 या कालावधीत पालखी मार्गावरील सर्व प्रकारची दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार देशी दारू विक्री (सीएल-3), विदेशी मद्य विक्री (एफएल-3), बिअर विक्री परवाने (एफएल/बीआर-3), बिअर बार (फॉर्म ई) तसेच ताडी विक्रीची दुकाने संबंधित मार्गावरील ठिकाणी पूर्णपणे बंद राहणार आहेत.
ड्राय डेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे :
- 15 जुलै : पाडेगाव, बाळ पाटलांची वाडी आणि लोणंद शहर.
- 16 जुलै : लोणंद शहर व परिसर (पालखी तरडगाव येथे पोहोचेपर्यंत दुकाने बंद राहतील).
- 17 जुलै : तरडगाव ते फलटण मार्ग, फलटण शहर व परिसर, काळज, सुरवडी, निंभोरे ओढा आणि वडजल.
- 18 जुलै : फलटण ते बरड मार्ग, बरड, विडणी, पिंपरद आणि निंभळक फाटा.
- 19 जुलै : साधुबुवाचा ओढा, धर्मपुरी, बरड आणि राजुरी पानसकरवाडी (पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेपर्यंत दुकाने बंद राहतील).
जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या परवानाधारकांविरुद्ध मुंबई मद्यनिषेध कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच, दुकान बंद ठेवण्याच्या कालावधीसाठी कोणतीही नुकसानभरपाई दिली जाणार नसल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.










